Wednesday, 30 August 2017

Spirit of Mumbai मुंबई मेरी जान


दिनांक २९/०८/२०१७ या दिवशी मुंबईत आणि उपनगरांत  तुफानी पाऊस पडला त्या निमित्त........ 

प्रत्येक नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीच्या दरम्यान आणि त्यानंतर मुंबईतील जनसामान्य काही वाक्ये हमखास बोलतात आणि ती म्हणजे "मुंबईचे स्पिरिट खूप उत्तम आहे!" "मुंबई मेरी जान है!" बऱ्याच अंशी हे खरे आहे. 

उपनगरी गाडीतील प्रवाशांना दिलासा देणारे पोलीस

उपनगरी गाडीतील प्रवाशांना दिलासा देणारे पोलीस

पावसामुळे लोहमार्गावर पाणी साचून उपनगरीय गाडी अडकली असेल तर बरेचदा गाडीतला विद्युत पुरवठा खंडीत होऊन दिवे पंखे बंद पडतात. अशा वेळेस त्यातील प्रवाशांच्या मदतीसाठी आजूबाजूच्या वसाहतींतले रहिवासी धावून येतात, चहा बिस्किटे वगैरे देतात. ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि ही मंडळी अतिशय नि:स्वार्थपणे हे काम करत असतात. या चहा बिक्सिटांच्या बदल्यात त्यांची काहीही अपेक्षा नसते. इथे एकाच जात असते, एकाच धर्म असतो: माणुसकी! 

खोळंबलेली वहातुक
रस्त्यावर पाणी तुंबून वाहतुकीचे बारा वाजतात. त्यात सर्व प्रकारची वाहने अडकून पडतात. बस, ट्रक आणि अन्य खाजगी वाहनांत अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात छातीपर्यंत आलेल्याला पाण्यात पोलिसांबरोबर हीच "माणुसकी" पुढे असते. 

रेल्वेचे दूरध्वनी क्रमांक

सेवाभावी संस्थांचे दूरध्वनी क्रमांक
समाज माध्यमांवर काल खूप सारे संदेश आले, प्रकाशचित्रे आणि चलचित्रे प्रसारित झाली, ज्यांतूनही या माणुसकीचे दर्शन घडले. मुंबईच्या विविध भागांत राहाणाऱ्या नागरिकांनी फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटसॅप द्वारे संदेश पाठवून आपापल्या मनांबरोबरच घरांचीही दारे उघडली आणि पावसात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरीच येण्याचे आवाहन केले. याला किती प्रतिसाद मिळाला शोध घ्यावा लागेल पण हा प्रकार या आधीच्या काही प्रसंगांपेक्षा वेगळा होता. त्याच जोडीला काही रुग्णालये, सामाजिक संस्था यांनीही सामाज माध्यमांचा आधार घेत त्यांचे दूरध्वनी क्रमांक जाहीर केले. त्याच बरोबर रेल्वेनेही आपापल्या दूरध्वनी क्रमांकांची माहिती समाज माध्यमांवर दिली. या माहिती आधारेही अनेक जण सुरक्षित स्थळी पोहोचू शकले असतील, सुस्थितीत राहू शकले असतील. 

सदर चलचित्र हे काल समाज माध्यमांवर आलेल्या चलचित्रांचे संकलन आहे.  

अशा आपत्कालीन स्थितीत मदतीचा हात पुढे करणारे सामान्य मुंबईकर नागरिक, संस्था यांच्याबरोबरच काही हॉटेलही अवाजवी दर न लावता पावसात अडकलेल्या नागरिकांना अन्न व पाणी पुरवठा करत होते. मुलुंड स्थानकावर धबधब्यासारखे वाहणारे पाणी ओसरल्यावर काही तरुणांनी अन्न पुरवठा केला होता, त्याची प्रकाशचित्रे सर्व समाज माध्यमांवर दिसली. 

ही काही प्रातिनिधीक उदाहरणे आहेत ज्याद्वारे मुंबईकरांची अशा आस्मानी संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याची सहज वृत्ती दिसून येते. ही वृत्ती कालही दिसली आणि २६/०७/२००५ या काळ्या दिवशीही दिसली होती! यालाच कदाचित "स्पिरिट ऑफ मुंबई" म्हणत असावेत, जे अशा नैसर्गिक आणि आणि अनैसर्गिक आपत्तीच्या वेळेस मुंबईकरांनी अनुभवले आहे. २००६ सालच्या अशाच एका अनैसर्गिक आपत्ती नंतर (कोणती आपत्ती हे चतुर वाचकांनी ओळखलं असेल!) याच "स्पिरिट ऑफ मुंबई"ला अधोरेखित करणारा एक हिंदी चित्रपट आला होता आणि तो तेव्हा खूप गाजलाही होता. 

परंतु प्रश्न हे राहातात की मुंबईचा हा आत्मा, हे स्पिरिट, याला का पुढे  यावे लागते अशा आपत्तीच्या वेळेस? मुळात मुसळधार पाऊस ही नैसर्गिक गोष्ट आपत्तीमध्ये का रुपांतरीत होते? हवामान खाते योग्य वेळेस अशा आपत्तीजनक पावसाचा पूर्व अंदाज बांधून प्रशासनाला, व्यवस्थापनाला इशारे देते का नाही? आणि प्रशासनाला हवामान खात्याकडून इशारे वेळेवर मिळत असतील तर त्या बद्दल सामान्य जनतेला वेळेआधी जागृत केले जाते का नाही? 

पावसाळ्याआधी सर्व नाले, पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारेसाफ करण्याचा उद्योग दरवर्षी होतो. पण तो कधीच परिणामकारक का नसतो? दक्षिण मुंबईतल्या हिंदमाता, परळ, लालबाग, याच ठिकाणी वर्षानुवर्षे पाणी साचण्याच्या घटना घडूनही काहीच कार्यवाही होताना दिसत नाही. या सर्व प्रश्नांना एक सार्वकालीन उत्तर दिले जाते ते म्हणजे "बहुतेक गटारे ही इंग्रजकालीन असून आता त्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता संपली आहे!" जणूकाही नवीन जास्त क्षमतेची गटारे बांधायला या "स्पिरिट ऑफ मुंबई"नेच आडकाठी केलीय!

दादर पूर्व येथील खोदादाद सर्कल
याच बरोबर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना गेल्याकाही वर्षांत फक्त दक्षिण मुंबईपुरत्या मर्यादित न राहाता मध्य मुंबईकडे आणि उपनगरांकडेही सरकल्या आहेत. दादर, माटुंगा आणि शीव येथील वाहतूक बेटे ही कालच्या पावसात खरोखरीच्या बेटांसारखी दिसत होती! पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही काही ठिकाणी पाणी साठण्याचे आणि नाल्यांना पूर येण्याचे प्रकार घडले आहेत, ज्याची चलचित्रे काल समाज माध्यमांवर आली होती. 

सर्व मिळून ही काही चांगली लक्षणे नाहीत. आणि या परिस्थितीला प्रशासनाबरोबरच सर्वसामान्य नागरिकही जबाबदार आहेत. प्रशासनाचे डोळे उघडतील आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसतील अशी आशा करायला हरकत नाही. परंतु आपण सामान्य नागरिकांनी त्या दिवसाची वाट पाहत थांबण्यापेक्षा काही सोपे उपाय केले तर या संकटांची तीव्रता कदाचित थोडी कमी होईल. 

सगळयात महत्वाचा आणि कदाचित सहज शक्य असलेला उपाय जो कोणीही सांगू शकेल, तो म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करणे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्ण बंद करणे शक्य नाही हे सत्य आहे. या पिशव्याच गटारे आणि नाले तुंबण्याचे मुख्य कारण आहे हे लहान मुलांनाही समजेल. केर कचरा या पिशव्यांत भरून नाल्यात टाकणे ही एक वाईट खोड आहे आणि ती समूळ नष्ट केली पाहिजे! केर कचरा हा केराच्या कुंडीतच टाकला गेला पाहिजे. गटारे, नाले ही पाणी वाहून नेण्यासाठी असतात, घनकचरा वाहून नेण्यासाठी नाही. असहा प्रकारे जर घन काचरा पावसाळी गटारात आणि नाल्यात गेला नाही तर पाण्याला वाहून जायला मार्ग मिळेल आणि मुंबईची (काही प्रसार माध्यमे म्हणतात त्याप्रमाणे) तुंबई होणे कमी होईल. हा एक सोपा उपाय, जो खरोकर प्रत्येकाला शक्य आहे, केला तरी पूर नियंत्रण करणाऱ्या यंत्रणांचे अर्धी अधिक काम सोपे होईल. अन्य उपायांबद्दल परत कधी तरी सविस्तर चर्चा करू. 

थोड्या कठोर शब्दांत बोलायचे झाले तर मुंबईकरांना आता कदाचित प्रशासन उशीरा जागे होण्याची सवय झाली आहे आणि त्यामुळे अशा नैसर्गिक किंवा अनैसर्गिक आपत्तीमध्ये आणि त्यानंतर प्रशासन मदतीला येण्या आधी हे मुंबईचे स्पिरिट, हा मुंबईचा आत्मा जागृत होतो आणि सर्वसामान्य माणसांच्या रूपात बाधित लोकांना मदत करतो. कधी पाण्यात फसलेल्या गाडीतल्या प्रवाशांना वाचवतो तर कधी होडीतून जाऊन एखाद्या बंद पडलेल्या बसच्या टपावरच्या लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवतो, कधी जखमींना रुग्णालयात भरती करताना त्यांच्या आप्तजनांना त्यांच्या सुरक्षित असण्या बद्दल सूचित करतो. आणि कधी कधी या क्षणकालच्या संबंधांमधूनच आयुष्यभराचे मैत्र मिळतात, आणि हे मुंबईचे स्पिरिट जागृत ठेवतात!

गणपती बाप्पा मोरया


हा मुंबईचा आत्मा, मुंबईचे स्पिरिट आणि प्रशासन एकत्रपणे राबून एकमेकांना नेहमीच पूरक ठरतील आणि गणपती बाप्पा अशीच कृपा दृष्टी ठेवतील अशी अपेक्षा ठेवून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता थांबवतो. 

दिवस दोनशे बेचाळिसावा पान दोनशे बेचाळिसावे

३०/०८/२०१७ 
मुलुंड, मुंबई