Sunday 9 December 2018

आवर्जून पाहावा असा चित्रपट - अचानक (१९७३)

गुलजार यांनी लिहिलेली चित्रपट गीते आवडत नाहीत असे चित्रपट रसिक खूपच कमी, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतील. त्यांचे चित्रपट दिग्दर्शनही अनेकांना आवडत असेल. बरेच चित्रपट असे आहेत ज्यात त्यांचे दिग्दर्शन आणि गीतलेखन दोन्ही आहेत. तरीही इथे उल्लेख करावासा वाटतो तो त्या एका चित्रपटाचा ज्याचे दिग्दर्शक गुलजार साहेब आहेतच पण स्वत: गीतकार असूनही त्यांच्या या चित्रपटात एकही गाणे नाहीये! होय, नुकताच पाहण्यात आलेला हा चित्रपट म्हणजे १९७३ साली प्रदर्शित झालेला, स्वर्गीय अभिनेते आणि सांसद विनोद खन्ना यांची प्रमुख भुमिका असलेला चित्रपट अचानक. 

दिग्दर्शक गुलजार असूनही त्यांनीच रचलेली गाणी या चित्रपटात नाहीत हे जसे या चित्रपटाचे वेगळेपण आहे तसेच साधारणपणे अडीच तीन तास कालावधीचे चित्रपट बनत असण्याच्या काळातला हा चित्रपट फक्त दीड तास कालावधीचा आहे हे ही या चित्रपटाचे वेगळेपण आहे! तसे म्हणायला गुलजार यांनीच दिगदर्शित केलेल्या आणि विनोद खन्ना यांचीच प्रमुख भूमिका असलेल्या मेरे अपने या चित्रपटातले स्वर्गीय किशोर कुमार यांच्या आवाजातले "कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते" हे गीत पार्श्वसंगीताच्या स्वरूपात चित्रपटाच्या शेवटी वाजते. पण "अचानक" या चित्रपटाची स्वतःची अशी गाणी नाहीत. चित्रपटातील अन्य प्रमुख कलाकार म्हणजे स्वर्गीय इफ्तेकार, स्वर्गीय ओम शिवपुरी, लिली चक्रवर्ती, असरानी, फरीदा जलाल आणि इतर. 

विनोद खन्ना यांनी साकारलेला लष्करातील अधिकारी मेजर रणजीत खन्ना याची ही कथा आहे. इफ्तेकार यांनी साकारलेला कर्नल बक्षी आणि मेजर रणजीत यांच्या फ्लॅशबॅक मधून प्रेक्षकांच्या समोर येते. कारण चित्रपाटातल्या प्रमुख घटनांचे हे दोघेच मुख्य साक्षीदार आहेत. रणजीत खन्ना लष्करातील अधिकारी होण्याचे प्रशिक्षण घेत असताना त्याची वाग्दत्त वधू पुष्पा बक्षी त्याला लेखी पत्र पाठवण्याऐवजी ऑडिओ कॅसेटवर रेकॉर्ड करून पत्र पाठवत असे. अभिनेत्री लिली चक्रवर्ती यांनी ही भूमिका अतिशय ताकदीने साकारलेली आहे. त्या पत्रात एकदा पुष्पाने स्वतः गायलेले एक गीत असते जे परेडच्या वेळी ऐकत असताना तो पकडला जातो. त्यामुळे त्याला कर्नल बक्षी यांच्याकडून शिक्षाही भोगावी लागते आणि, "तू अशाच चुका करत राहिलास तर तुझे पुष्पाबरोबर ठरलेले लग्न तोडावे लागेल!" अशी धमकीही मिळते रणजितला. पुष्पा कर्नल बक्षीचीच मुलगी होती हा उलगडा प्रेक्षकांना तेव्हा होतो जेव्हा कर्नल बक्षी हे ओम शिवपुरी यांनी साकारलेल्या डॉक्टर चौधरी यांना मेजर रणजीत बद्दल सांगत असतो, "मी त्याला शिक्षा करत असे पण त्याचे उदाहरण अन्य प्रशिक्षणार्थींना देत असे." असे सांगताना कर्नल बक्षी यांना आनंद आणि दु:ख दोन्ही होत असते. "शत्रूला ठार मारण्यासाठी ज्या पद्धती मेजर रणजित शिकला त्याच पद्धती आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींना मारण्यासाठी त्याला वापराव्या लागल्या." हे सांगताना हतबल झालेला कर्नल बक्षी इफ्तेकार यांनीच सादर करावा!

एका काल्पनिक युद्धात "खडकाली चौकी"चे संरक्षण करताना शत्रूच्या अनेक सैनिकांना कंठस्नान घातल्याबद्दल मेजर रणजितला "वीर चक्र" हा सन्मान दिला जातो. ते पदक महू येथे कर्नल बक्षी यांना दाखवून मेजर रणजित आपल्या घरी जातो. तिथे त्याला कळते की पुष्पा त्याचा मित्र प्रकाशबरोबर, ज्याचा उल्लेख मेजर रणजित नेहमी "सिव्हिलियन" असा करत असतो, प्रकाशाच्याच बोट हाऊसवर मासे पकडण्यासाठी गेलेली असते. अभिनेते रवी राज यांनी ही छोटीशी भूमिका चोख बजावली आहे. त्या बोट हाऊसपाशी गेल्यावर मेजर रणजीतला पुष्पा आणि प्रकाश यांच्यातील विवाहबाह्य संबंधांबद्दल कळते आणि तो अतिशय दु:खी होतो. त्या रागात मेजर रणजित प्रकाशाची कदाचित दुसऱ्या दिवशी प्रकाशच्याच बोट हाऊसवर स्वतःच्या घरातल्याच एका चाकूने हत्या करतो आणि त्याच रात्री पत्नी पुष्पाला गळा आवळून ठार मारतो. या दोन्ही हत्या करतानाची दृष्ये चित्रपटात नाहीत. प्रकाशला मारल्यानंतर चाकू पाण्यात फेकून दिलेला आणि आजूबाजूचे पाणी लाल झालेले दाखवले आहे. तर पुष्पाला मारताना फक्त तिच्या गळ्याभोवती हात आवळलेला दाखवला आहे. आणि ही गुलजार यांच्या दिग्दर्शनाची जमेची बाजू आहे. कोणतीही हिंसा प्रत्यक्ष न दाखवता या दोन्ही हत्या करतानाचा मेजर रणजित याचा उद्वेग आणि राग प्रेक्षकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचतो आणि अपेक्षीत परिणामही साधतो. तरीही या प्रसंगांचे संकलन अर्थात एडिटिंग अजून चांगले होऊ शकले असते असे मला वाटते. 

यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गणवेषधारी मेजर रणजित मृत पत्नी पुष्पांचे डोके मांडीवर घेऊन पलंगावर बसलेला दाखवला आहे आणि सैन्यातले त्याचे वरिष्ठ अधिकारी त्याच्या घरी येतात आणि आपली टोपी, पदके आणि कंबर पट्टा त्यांच्या हवाली करून शरण आलेला मेजर रणजित त्यांच्या बरोबर निघून जातो. इथेही मेजर रणजित त्याच्या वरिष्ठांकडे त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली देत आहे असे दाखवण्यात चित्रपटाची रिळे आणि प्रेक्षकांचा वेळ वाया न घालवता चित्रपटाचा वेग कायम राखला गेला आहे. नंतर न्यायालयात दोन हत्या केल्याबद्दल मेजर रणजितला देहदंडाची शिक्षा ठोठावली जाते तेव्हा अत्यंत दु:खी झालेला मेजर रणजित तुरुंगात जाण्याआधी स्वतः:च्या घरी जाऊन पत्नीच्या आत्म्यास सद्गती मिळावी याची प्रार्थना करण्याचे परवानगी न्यायाधीशांकडे मागतो, जी त्याला मिळते. 

ज्याला "डेकोरेटेड आर्मि ऑफिसर" म्हणतात असा मेजर रणजित असल्यामुळे असेल कदाचित, पण पोलिसांबरोबर स्वतःच्या घरी जाताना त्याच्या हातात बेड्या नसतात. याचा फायदा घेऊन पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरच्या घरातच्या खिडकीतून पडद्याच्या साहायाने खाली उतरून मेजर रणजित तिथून पळून जातो. असे पळून जाण्याचे कारणही प्रेक्षकांना फ्लॅशबॅकच्याच स्वरुपात कळते. मेजर रणजित पुष्पाबरोबर गप्पा मारत असताना ती तिच्या मृत्यूनंतर तिचे मंगळसूत्र गंगेत विसर्जित करावे अशी इच्छा ती व्यक्त करते. ते तिचे मंगळसूत्र रणजितला पलंगावर उशीखाली सापडते. आणि ते गंगेत विसर्जित करण्यासाठी तो पोलिसांना गुंगारा देऊन घरातून पळून जातो. पण पळून जाताना रणजितचे बुट तिथेच, त्याच खोलीत रहातात.

नंतर सुरू होतो तो एक जीवघेणा पाठलाग ज्यात वासावरून माग काढणारे कुत्रे अर्थात स्निफर डॉग्ज बरोबर घेऊन पोलीस रणजितचा जंगलातून पाठलाग करायला लागतात. घरात राहिलेले रणजीतचे बुट बरोबर घेऊन पोलीस त्याचा पाठलाग सुरू करतात. हा सगळा पाठलाग जंगलातून झालेला दाखवला आहे. त्यामुळे अनवाणी घावल्यामुळे रणजितच्या तळपायाला झालेल्या जखमासुद्धा त्याला थांबवत नाहीत. असं जंगलातून अनवाणी धावताना रणजितला त्याच्या  एका सहकाऱ्याबरोबर झालेला त्याचा संवाद आठवतो आणि तिथे असलेल्या दोन झाडांभोवती रणजित इंग्रजी 8 या आकारात धावतो जेणेकरून वासावरून माग काढणारे कुत्रे अडखळतात आणि तिथेच तिथेच फिरत बसतात. पुढे धावत जाताना रणजित एका टेकाडावर चढत असताना पाठलाग करणाऱ्या पोलीसांना तो दिसतो आणि त्या टेकडीच्या सर्वात वरच्या भागावर पोहोचल्यावर पोलीस रणजितवर गोळी झाडतात, जी त्याच्या छातीतून आरपार जाते! इथे असे दाखवले आहे की मेजर बक्षीच्या हातात त्याच्या दिवंगत पत्नीचे मंगळसूत्र आहे आणि समोर गंगा नदीचा किनारा आहे. . . . . . . . . . . 

मगाशी सांगितल्याप्रमाणे इथपर्यंतची कथा ही कर्नल बक्षी आणि मेजर खन्ना या दोघांच्या फ्लॅशबॅकमधून प्रेक्षकांच्या समोर येते. कर्नल बक्षींकडून हे सगळे ऐकत असताना डॉक्टर चौधरीसुद्धा भावूक झालेले दाखवले आहेत. कमलदीप या अभिनेत्याने पोलीस सुपरिटेंडंटन्ट गुप्ता यांची छोटीशी भूमिका केली आहे. डॉक्टर चौधरी त्यांच्याबरोबर बोलताना त्यांचा उल्लेख फक्त "मिस्टर गुप्ता" असा करत असतात. पण ते पोलीस सुपरिटेंडंटन्ट आहेत हे प्रेक्षकांना शेवटीच समजते. गुप्ता आणि डॉक्टर चौधरी यांच्या संवादाचा मुद्दा हा असतो, "हृदयाच्या इतक्या जवळून, एका फुफ्फुसाला अर्धे अधिक नष्ट करून बंदुकीची गोळी आरपार गेली तरीही हा माणूस (मेजर खन्ना) जिवंत कसा काय?"

दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसांनी रणजित पूर्ण बरा होतो. या कालावधीत ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी साकारलेला डॉक्टर कैलाश आणि ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांनी साकारलेली परिचारिका राधा यांच्याबरोबर रणजिताचे चांगले स्नेह संबंध जुळतात आणि ते वेगवेगळ्या लहान मोठ्या प्रसंगातून प्रेक्षकांच्या समोर येतात. बंदुकीच्या गोळीमुले झालेल्या जखमेतून आणि त्या बरोबर झालेल्या अन्य गुंतागुंतीमधून बरे होताना त्या रुग्णालयात रणजितची परत एकदा पूर्ण तपासनी होते ज्याचे अहवाल एकदम योग्य असे येतात. त्यानंतर डॉक्टर चौधरी रणजितच्या खोलीत त्याच्या तब्येतीची चौकशी करतात आणि रणजितला बरे वाटत आहे हे कळल्यावर म्हणतात, "आता मला एक अतिशय वाईट काम करायला लागणार आहे!" असे म्हणून ते पोलीस अधिकारी गुप्ता यांना हाक मारतात. या आधी डॉक्टर चौधरींबरोबर रणजित विषयी चर्चा करताना ते गणवेशात नसतात परंतु इथे रणजितला परत अटक करायला आलेले पोलीस सुपरिटेंडंटन्ट गुप्ता हे गणवेशात समोर येतात आणि रणजितला पुन्हा अटक करून नेतात. रुग्णालयाच्या "प्रिझनर्स वॉर्ड"मधून बाहेर पडताना रणजितची डॉक्टर कैलास बरोबर फक्त एक अस्वस्थ नजारा नजर होते आणि सगळे तितून बाहेर पडतात. रुग्णालयाच्या बाहेर कर्नल बक्षी दिसतात तेव्हा त्यांना एक मानवंदना द्यायला अर्थात सॅल्यूट करायला रणजित विसरत नाही!

इकडे डॉक्टर कैलाश रुग्णालयाच्या "प्रिझनर्स वॉर्ड"मध्ये तुरुंगातून पाळताना डोक्यात पोलिसांची गोळी लागलेला अजून एक रुग्ण आल्याची माहिती डॉक्टर चौधरींना देतो आणि अत्यंत दु:खी झालेले डॉक्टर चौधरी राजीनामा देण्याच्या विचारात असतानाच, डॉक्टर म्हणून असलेल्या त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव होते आणि ते पुन्हा कैदी रुग्णाची शस्त्रक्रिया करायला डॉक्टर कैलाश आणि परिचारिका राधा यांच्याबरोबर जातात आणि दुसरीकडे रणजितला फाशी देतात. . . . . . . .

नौदल अधिकारी कावस माणेकशॉ नानावटी यांनी सन १९५९ मध्ये, मुळची ब्रिटिश असलेली आपली पत्नी सिल्व्हियाचा प्रियकर प्रेम भगवान अहुजा याची हत्या केली होती आणि ते त्यातून तेव्हा निर्दोष मुक्त झाले होते. या मुळ घडामोडी नौदल अधिकाऱ्याच्या आयुष्यात घडल्या होत्या परंतु अचानक या चित्रपटाची कथा बांधताना काही प्रमुख बदल केले आहेत ते म्हणजे मेजर रणजित सैन्यातला अधिकारी दाखवला आहे आणि कर्नल बक्षी त्याचे सासरे दाखवले आहेत. 

अनेक हिंदी चित्रपटांचे व्हिडिओ वितरणाचे हक्क ज्यांच्याकडे आहेत त्या शेमारू व्हिडिओच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हा चित्रपट HD स्वरूपात उपलब्ध आहे. रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा.

अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला २०१६ मध्ये आलेला रुस्तोम हा चित्रपट याच घटनांवर बेतलेला होता रसिकांना आठवत असेलच. नसेल तर तशी आठवण करून देऊन आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो.

दिवस तीनशे त्रेचाळीसवा. पान तीनशे त्रेचाळीसवे.

मुलुंड मुंबई
०९/१२/२०१८ 

































 

Thursday 29 March 2018

स्त्री परिक्रमा - Journey of Woman

ही blog post लेखनाचा उद्योग मध्ये लिहावी का प्रकाशचित्रणाचा उद्योग मध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आजचा दिवस गेला! मुळात हा प्रश्न पाडण्याचं कारण म्हणजे "स्त्री परिक्रमा - Journey of Woman" या नाट्याविष्काराचं प्रकाशचित्रण मी केलं आणि याबद्दल व्यक्त व्हावं ते शब्दांतून का प्रकाशचित्रांच्या माध्यमातून हे ठरवावं लागलं, आणि म्हणूनच हा प्रश्न पडला. प्रकाशचित्रणाच्या तांत्रिक बाबींबद्दल लिहिण्यासारखं इथे काही नाहीये, किंबहुना तो हेतूही नाहीये. लिहायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे ते या नाट्याविष्काराबद्दल, हे ठरवल्यावर हा लेखनाचा उद्योग सुरू केला!

मुलुंड पश्चिम येथील महाराष्ट्र सेवा संघ इथे हा नाट्याविष्कार दिनांक २८/०३/२०१८ रोजी सादर झाला. सादरकर्ते होते सरस्वती नृत्य कला मंदिर आणि महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड. याला पार्श्वभूमी होती नुकत्याच साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची. मेधा दिवेकर यांची ही संकल्पना. त्यांच्यासोबत ८ वर्षे ते ५० वर्षे वर्षे वयाच्या ३३ अन्य स्त्री कलाकारांनी हा जवळ जवळ दोन तासांचा नाट्याविष्कार सादर केला. मुलुंडमधील सुप्रसिद्ध संस्कृत भाषा तज्ज्ञ् पंडित प्रभाकर भातखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा नाट्याविष्कार साकारला गेला आहे. कथक नृत्य, जोडीला मुद्राभिनय आणि साजेसं पार्श्वसंगीत अशी काहीशी या नाट्याविष्काराची मांडणी होती. वेदकालापासून एकविसाव्या शतकापर्यंतचा स्त्रीचा प्रवास म्हणजेच हा "स्त्री परिक्रमा - Journey of Woman" हा नाट्याविष्कार!

हो, नाट्याविष्कारच. कारण हजारो वर्षांपासून स्त्रियांचं भारतीय समाजात काय स्थान होतं आणि ते काळानुसार कसं बदलत गेलं, स्त्रियांना कोणकोणत्या स्थित्यंतरातून जावं लागलं, त्यांच्यावर कसे अत्याचार झाले, त्या अत्याचारांचा प्रतिकार स्त्रियांनी कसा केला हे सर्व आयाम दोन घटिकांमध्ये सादर करायचं तर त्यात नाट्य हे येणारच! मग या नाट्याविष्काराची मांडणी ठरली, शे दोनशे आसनक्षमतेच्या प्रेक्षागृहात हा नाट्याविष्कार कसा सादर करायचा हे ठरलं, प्रकाशयोजना ठरली, नेपथ्य ठरलं आणि जोडीला अविरत सुरू होत्या तालिमी. या सर्व कलाकार मुली आणि स्त्रिया आपापली घरं, शाळा, महाविद्यालये, परीक्षा, नोकरी-व्यवसाय हे सर्व लीलया सांभाळून रोज रात्री सराव करत होत्या. माझ्या एका मित्राच्या मुलीनेही यात सहभाग घेतला होता. त्यानेच photographyसाठी माझे नाव मेधाताईंना सांगितले. नाहीतर मला असा काही कार्यक्रम आहे हे मला कळण्याचा काहीच मार्ग नव्हता! आणि कळलं असत. तरी कदाचित एक प्रेक्षक म्हणून माझी हजेरी लागली असती. या मित्राच्या सांगण्यावरूनच मी यांच्या तालिमींचेही प्रकाशचित्रण केले आणि मुख्य कार्यक्रमाचेही. आणि म्हणूनच मला हा कार्यक्रम जवळून पहाता आला, ही संकल्पना अनुभवता आली. 

ही नृत्य नाटिका सुरू होते ती पार्वतीने समकालीन स्त्रियांना नृत्यकला शिकवली या प्रसंगाने. आणि पुढे रामायण, महाभारत असा कालप्रवास करून हा नाट्याविष्कार येतो भारतावर झालेल्या परकीय आक्रमणांच्या काळाकडे.

रामायणकाळातला सर्वात उत्तम सादर झालेला प्रसंग म्हणजे सीता भूगर्भात विलीन होते तो. आता रंगमंच दुभंगणे शक्य नव्हते. मग रंगमंचाच्या दोन्ही बाजूंनी काही कलाकार एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांच्या मध्ये सीता लुप्त होते अशा प्रकारे हा प्रसंग सादर केला आहे आणि तो बघणे हा एक सुंदर अनुभव आहे!



सीता भूगर्भात विलीन होते

त्यानंतर हा नाट्याविष्कार पुढे सरकतो महाभारत काळाकडे. यात महाभारतीय युद्धानंतर कुंती आणि गांधारीबरोबर द्रौपदी चर्चा करत आहे अशा प्रकारे हा कालखंड सादर केला आहे. 


गांधारी आणि कुंती महाभारतीय युद्धानंतर

हे युद्ध का घडलं, टाळता आलं असतं का असे काही प्रश्न विचारून, प्रेक्षकांना विचाराधीन करून नाट्याविष्कार पुढे सरकतो तो भारतावर झालेल्या परकीयांच्या आक्रमणाकड़े. घोड्यांच्या टापांच्या पार्श्वसंगीताच्या ठेक्यावर प्रेक्षागृहातूनच या कलाकार रंगमंचावर प्रवेश करतात. हा प्रसंग पाहताना, अनुभवताना अंगावर अक्षरश: काटा येतो!



परकीय आक्रमक येतात त्या प्रसंगात कलाकार प्रेक्षागृहातून प्रवेश करतात

या नंतरच्या भागात पुरुषसत्ताक कालखंडात स्त्रियांवर होणारे अत्याचार फारच प्रभावीपणे सादर केले आहेत. घरात 'कुलदीपक' अर्थात मुलगा जन्माला आल्यानंतर त्या मुलाचे होणारे कौतुक आणि त्याच्या आईची आणि त्या आईच्या मोठ्या मुलीची होणारी हेटाळणी, पतीच्या निधनानंतर पत्नी सती जाणे, जरठ-कुमारी विवाह हे प्रसंग लक्षात राहातात. या भागात रंगमंचावर इतके प्रसंग एका वेळी घडत असतात की प्रेक्षकांना सगळीकडे लक्ष ठेवावे लागते! 


स्त्री शक्ती

पुढे मग सुधारणांचा काळ येतो. यात शिक्षणापासून वंचित राहिलेल्या स्त्रियांना शिकून समृद्ध आणि सक्षम होताना दर्शवलं आहे. क्रीडा, चित्रपट, व्यवसाय यासह सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया सहभागी होतात, कदाचित एक पाऊल पुढेच असतात; घर, मुले, त्यांचं शिक्षण या सर्व आघाड्या सांभाळून स्वतःच्या कारकिर्दीलाही आकार देतात हे दर्शविताना व्यसनाधीनतेकडे आकृष्ट होतानाही दिसतात! पण अन्य स्त्रियाच त्यांना यापासून परावृत्त करतात हा संदेशही दिला आहे. 

अशापराकारे हजारो वर्षांचा कालखंड केवळ दोन तासांत दर्शवणे हे एक मोठे आव्हान आहे आणि ते या सर्व ३३ कलाकारांनी अतिशय उत्तम प्रकारे पेललं आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडून वहातांना दिसत होतं. सर्व कलाकारांची महिना दोन महिन्यांची मेहनत कामी आली होती हे कळत होतं त्यांच्याकडे पाहून.

या नाट्याविष्काराच्या तालिमींचे आणि प्रत्यक्ष सादरीकरणाचे प्रकाशचित्रण करणे हा एक समृद्ध करणारा अनुभव होता. असे नाट्याविष्कार घडत असताना कलाकारांना आणि सर्व चमूला काय मेहनत घ्यावी लागते हे जाणून घेता आलं. दिग्दर्शिकेला काय अभिप्रेत आहे आणि कलाकारांनी ते कशाप्रकारे सादर केलं पाहिजे हे कळलं. या अनुभावाचा पुढे काय आणि कसा उपायोग होईल ते काळच ठरवेल. परंतु प्रकाशचित्रणाच्या काही वेगळ्या आयामांकडे लक्ष देता आलं हे माझ्यासाठी खासच आहे. 

अशा नाट्याविष्कारांचा भाग होण्याच्या संधीबरोबरच, अशा सादरीकरणाचे बारकावे जाणून घेण्याची आणि जोडीला प्रकाशचित्रणाचीही संधी मला वारंवार मिळेल अशी अपेक्षा करून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो. 

दिवस अठ्ठ्याऐंशीवा पान अठ्ठ्याऐंशीवे 

मुलुंड मुंबई 
२९/०३/२०१८