Tuesday 27 February 2018

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी

विष्णु वामन शिरवाडकर अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या मराठी साहित्यातल्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांना १९८७ साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तेव्हापासून २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस, मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

मराठी ही माझी मातृभाषा आणि पितृभाषाही असल्यामुळे शुद्ध (शुध्द नाही) मराठी लिहिण्याकडे आणि बोलण्याकडे माझा कल असतो. म्हणूनच हा लेखनाचा उद्योग मराठीत चालू केला. 

आणि , आणि , आणि , आणि या अक्षरांचा उच्चार आणि लिखाणातला वापर हा बरोबरच असायला हवा. यांची अदलाबदल झाली तर भलताच अर्थ होतो! 'आणि'मधला णि ऱ्ह्स्व (इथे माझ्या संगणकावर र्हस्व असे लिहिले जात होते, जे बरोबर नाही. म्हणून mobileवर लिहून हा शब्द इथे आणला) असतो, पाणी मधला णी दीर्घ असतो हे भान ठेवायला हवे. इथे पाणी ऐवजी पाणि झाले तर जल ऐवजी हात असा अर्थ होतो. लग्नात नवरदेव वधूचे पाणिग्रहण करतो, पाणीग्रहण नाही! एकदा एका शाळेत मराठीच्या परीक्षेत प्रश्न विचारला गेला, "पाच वहाणांची नावे लिहा" हा प्रश्न वाचून बहुतेक विद्यार्थ्यांनी चपला बनवणाऱ्या आस्थापनांची (companiesची) नावे लिहिली. त्या सर्व मुलांना या प्रश्नात शून्य गुण मिळालेले पाहून सगळे पालक हादरले आणि शिक्षकांकडे गेले. तेव्हा ते शिक्षक म्हणाले, "मुलांना पाच गाड्यांची नावे (वाहनांची नावे) लिहायला सांगितली होती. त्यांनी चपलांची नावे लिहिली!" अशा प्रकारच्या चुका टाळल्याच पाहिजेत. परीक्षेत विचारलेला हा प्रश्न व्याकरणदृष्ट्या कदाचित बरोबर असेल पण अशुद्ध नक्कीच आहे. तसेच अशा चुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्याला कोण जबाबदार आहे? 

मराठीत बोलताना आणि लिहिताना अजून काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या अशा: 

आपल्याला माणूस भेटतो, मिळत नाही. हरवलेली वस्तू मिळते किंवा सापडते, भेटत नाही. गाणे म्हणतात किंवा गातात, बोलत नाहीत. "चहा घेतला" असे म्हणतात, "चहा घेतली" असे नाही. 

काही इंग्रजी शब्द मराठीत वापरताना त्या शब्दाचे लिंग अर्थात gender बरोबरच लिहिले पाहिजे उदाहरणार्थ ते पेन, तो पेन नाही. कारण इंग्रजीत It is a pen असे म्हणतात आणि लिहितात, He is a pen असे नाही. किंवा सरळ लेखणी हा शब्द वापरावा! अशी अजून अनेक उदाहरणे देता येतील.  

आता इंग्रजीतले काही शब्द मराठीत बेमालूमपणे मिळसळले गेले आहे. Cup या शब्दाला पेला हा शब्द आहे पण बशी पेल्याबरोबरही छान दिसते आणि कपाबरोबरही!

काही वर्षांपूर्वी संगणकावर Unicode मध्ये देवनागरीत टंकलेखन उपलब्ध झाले, पाठोपाठच भ्रमणध्वनीवर म्हणजेच mobile phoneवरही सहज देवानागरीत टंकलेखन शक्य झाले. तोपर्यंत मराठीत लिहायचे असेल तर roman लिपीमधेच लिहावे लागायचे आणि त्यातूनही काही मजेशीर चुका घडत. समाजमाध्यमांवर फिरत असलेला हा विनोद वाचनात आला असेलच:

===========
एका मैत्रिणीची बायपास झाली. तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला:
"Ata tula udya marayala harakat nahi."
बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं कारण तिने वाचलं "आता तुला उद्या मरायला हरकत नाही!" बिचारी नुकतीच एका जीवघेण्या आजारातून बरी झाली होती, त्यात असे काही वाचल्यावर परत तिच्या हृदयाचे ठोके चुकले असते. संदेश पाठवणारीला लिहायचे होते "आता तुला उड्या मारायला हरकत नाही"!
===========

यासाठीच संगणकावर आणि भ्रमणध्वनीवर मराठीत लिहायचे असेल तर देवनागरी लिपी वापरली पाहिजे. मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे, roman नाही. आणि आपणच याचा आग्रह धरायला हवा. असे म्हणतात, "तुम्हाला हवा असलेला बदल तुम्हीच व्हा!" मग आपणच शुद्ध मराठी लिहिण्याची (हाती, संगणकावर आणि mobileवरही), बोलण्याची सुरुवात करूया आणि रोजच्या आचरणातही हीच सवय ठेवूया. 

आज एकाने समाज माध्यमांवर प्रश्न विचारला, "किती पिढ्यानंतर 'Happy  Marathi Language Day!' असे विचारण्याची वेळ येईल?" अशी वेळ येऊ न देणे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. त्यासाठी मराठी भाषा आपणच जास्तीत जास्त वापरायला हवी आणि येणाऱ्या पिढयांनाही निग्रहाने शक्य तिथे मराठीचा वापर करायला शिकवले पाहिजे. म्हणूनच मी समाज माध्यमांवर मराठीत लिहिताना अन्य भाषांचा वापर टाळतो, आणि इंग्रजी शब्द वापरताना देवनागरीत त्या शब्दाचा उच्चार लिहिण्याऐवजी तो शब्द roman लिपीतच लिहितो. 

"आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे. कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात, तितके फॉरीन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल.
- पु.ल. देशपांडे
संदर्भ :आमचे भाषाविषयक धोरण"

या अतिशय मार्मिक शब्दांत महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाने मराठी भाषेवर होणाऱ्या इंग्रजीच्या आक्रमणाची दखलही घेतली आहे आणि खिल्लीही उडवली आहे.

या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिग्गज मराठी कवी, संगीतकार आणि गायकांनी एक सुंदर गाणे बनवले आहे. या गीतात म्हणाल्याप्रमाणे मराठी भाषेचा अभिमान बाळगून आणि मराठी भाषा दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहील अशी आशा बाळगून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो. 


दिवस अठ्ठावान्नावा. पान अठ्ठावान्नावे 
मराठी भाषा गौरव दिन

२७/०२/२०१८
मुलुंड, मुंबई