Sunday, 15 October 2023

दोन सुंदर स्वप्नांचा मला उमजलेला एकच अर्थ

गेले काही दिवस फारच भारावलेले गेले आहेत, जात आहेत. त्याचं असं झालं की, चार दिवसांमागे स्वप्नात संत तुकाराम महाराज दिसले आणि तो दिवस एकदम मंतरलेला गेला. मी रोज पहाटे पावणे पाच, पाच वाजता उठतो तसा त्या दिवशीही उठलो पण गजराच्या आवाजाने नाही तर स्वप्नात झालेल्या संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनानेच, गजर होण्याच्या काही सेकंद आधीच! मी कुठेतरी जात आहे आणि तुकाराम महाराज बाजूने चालत गेले. एवढेच ते अर्ध्या ते एक सेकंदाचे स्वप्न! तेच पांढरे पागोटे, हातात चिपळ्या, गळ्यात वीणा अडकवलेली आणि अंगावर पांढरा सदरा, आपण चित्रात त्यांचा जो वेष पाहतो तोच वेष. मी ज्या दिशेने आलो त्या दिशेला माझ्या उजव्या बाजूने चालत ते गेले. एवढेच ते दृष्य. पण ते आयुष्यभर लक्षात राहील. स्वप्न असूनही कायम सत्यवत वाटत राहील! 

या स्वप्नाने जाग येऊन झोपेतून उठलो तेव्हा माझ्या मुलगा त्याच्या कामाचा ठिकाणी जायच्या तयारीत होता. हे स्वप्न सगळ्यात आधी त्याला सांगितले तेव्हा तो ही एकदम आनंदला! नंतर काही वेळाने समाज माध्यमातील माझ्या खात्यावर "स्वप्नात संत तुकाराम महाराज दिसले!" असं लिहिलं आणि कामाला लागलो! जागा असलो तरीही मी त्या स्वप्नातून बाहेर आलेलो नव्हतो. त्या दिवशी नेहमी प्रमाणे दिवसभर काम चालू होते पण एक बाजूला या स्वप्नाचेच विचार चालू होते. काय अर्थ असेल या स्वप्नाचा? संत तुकाराम महाराजच का दिसले असतील? संत ज्ञानेश्वर महाराज किंवा अन्य कोणी संत पुरुष का नाही आले स्वप्नात? हे प्रश्न पिच्छा पुरवू लागले होते. पण एक खात्री नक्की होती की काही तरी दिव्य आणि माझ्या कल्पनाक्षमतेपेक्षा मोठा असा या स्वप्नाचा अर्थ असणार आणि माझ्या हिताचीच काहीतरी गोष्ट यात अभिप्रेत असणार. तेव्हा ठरवलं की येत्या शनिवारी (म्हणजे काल) देहूला जाऊन संत तुकाराम महराजांच्या मंदीरात जाऊन यायचे, मनोभावे त्यांचे दर्शन घ्यायचे. हे ठरवल्यानंतर कामावर चित्त केंद्रित होऊ शकले. 

साधारणपणे १९८१-८२ साली, तिसरीत असताना बहुतेक, शाळेच्या सहलीनिमित्त देहूला आलो होतो. त्यानंतर काल गेलो तिथे. कधी प्रसंगच आला नाही तसा मधल्या चाळीस वर्षांत! गाडीची चावी फिरवली आणि मी, माझी पत्नी आणि मुलगा, आम्ही देहूच्या दिशेने जाऊ लागलो. पुणे मुंबई महामार्ग सोडून गाडी देहू छावणीच्या दिशेला लागली तसे पुन्हा चार दिवसांमागच्या त्या स्वप्नाचे विचार सुरू झाले. गाडी चालवण्यातले लक्ष दूर होत आहे का असे वाटण्याइतके ते विचार प्रबळ होते. पण संत तुकाराम महाराजांच्या कृपा दृष्टीमुळे काही बाका प्रसंग आला नाही आणि आम्ही चौघेही, आम्ही तीन सजीव आणि चौथी म्हणजे निर्जीव असूनही माझं दुसरं प्रेम असलेली माझी लाडकी शेव्हि सेल, व्यवस्थित देहूला पोहोचलो. आपल्याला माहीत आहेच की तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले होते, त्यामुळे त्यांचे समाधी मंदीर तिथे नाहीये! देहू गावात संत तुकाराम महाराजांची दोन मंदिरे आहेत. एक म्हणजे मुख्य मंदीर आणि नव्याने बांधलेले गाथा मंदीर. आम्ही गाथा मंदीरात आधी गेलो. 

संत तुकाराम महाराज गाथा मंदीर 

कडक उन्हात तापलेल्या फरशांवरून अनवाणी चालत जाण्याची तपश्चर्या केल्याशिवाय तुकाराम महाराजांच्या भव्य मूर्तीचे दर्शन होत नाही. हातात वीणा आणि चिपळ्या घेतलेल्या त्यांच्या त्याच परीचीत रूपातली ती पंधरा अठरा फुट उंचीची विशाल बैठी मूर्ती एका नजरेत बसणे अशक्यच आहे! त्या मूर्तीपेक्षा भव्य असलेले संत तुकाराम महाराजांचे कार्य आठवून मी आपसूकच नतमस्तक झालो. हात जोडून डोळे मिटून त्या नतमस्तक अवस्थेत मी किती वेळ तिथे उभा होतो मला काहीच कल्पना नाही. मनात फक्त 'विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल' हा जप चालू होता. तिथे आलेल्या अन्य भक्त मंडळींचे बोलण्याचे आवाज कानावर पडत तर होते पण मला विचलित करू शकत नव्हते. बराच वेळ तसा उभा राहिल्यानंतर जसा आपसूक नतमस्तक झालो होतो तसाच आपसूकच त्या अर्ध ध्यानस्त अवस्थेतून बाहेर आलो आणि त्या गाथा मंदीरतील दालने पाहू लागलो. 

लडिवाळ वळणे घेत जाणाऱ्या आणि भीमा नदीला भेटायला आतूर असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रवाहाचा देहू गावातला जवळ जवळ पाऊण किलोमीटर लांबीचा भाग उत्तर प्रवाही आहे, म्हणजे नदीचा प्रवाह उत्तर दिशेला आहे. त्या भागाच्या पूर्व किनाऱ्यावर हे भव्य पूर्वाभिमुख गाथा मंदीर उभरलेले आहे. आठ दिशांना आठ दुमजली दालने असलेल्या या गाथा मंदीरात संत तुकाराम महाराजांच्या सर्व गाथा, सर्व अभंग सांगमरवरावर कोरलेले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या सर्व गाथा एका मोठ्या दगडाला बांधून पाण्यात बुडवल्या होत्या जेणेकरून त्या पुन्हा तरंगून वर येणार नाहीत, आणि तरीही काही दिवसानंतर त्या सर्व गाथा पाण्यावर आल्या होत्या ही कथा सर्वाना माहीत आहेच. हाच धागा पकडून, संत तुकाराम महाराजांच्या सर्व गाथा कायम स्वरूपी दगडावरच कोरलेल्या असाव्यात या भावनेने आणि हेतूने त्यांचे सर्व गाथा आणि अभंग कोरलेले सांगमरवरी पाषाण तिथे लावलेले आहेत. जोडीला काही प्रसंगचित्रे आणि त्या प्रसंगाशी संबंधीत गाथा/ओव्या त्या चित्राखाली लिहिलेल्या आहेत, अशी एकंदरीत या मंदिराची मांडणी आहे. 

तळ मजल्यावरची आठही दलाने पाहून आम्ही तिघे पहिल्या मजल्यावर गेलो. तिथली दालने पाहताना माझी नजर विठोबा राखुमाईच्या मूर्तीकडे गेली. आणि बावीस वर्षांमागे दिसलेल्या अशाच एक सुंदर स्वप्नाच्या आठवणीने माझे डोळे एकदम चमकले! पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावरच्या एका चौकात मी उभा राहून मी आकाशाकडे पाहत आहे. असंख्य ताऱ्यांनी गच्च भरलेल्या त्या रात्रीच्या आकाशात दोन अती प्रकाशमान तारे प्रचंड वेगाने आणि खूप मोठा, विमानासारखा आवाज करत वायव्य दिशेकडून आग्नेय दिशेकडे गेले आणि त्याच स्वप्नाच्या पुढच्या दृश्यात मुंबईत दादर येथील आमच्या घरच्या समोरच्या पाच मजली इमारतीच्या गच्चीवर भगवान श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी देवी यांचे अति विराट रूप त्या स्वप्नात दिसले होते. इसवीसन २००२ च्या जानेवारीत जेव्हा हे दीड सेकंदाचे स्वप्न दिसले तेव्हापासून मी या स्वप्नाचा अर्थ शोधत होतो तो कदाचित काल कळला! त्या जुन्या स्वप्नात भगवान श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी देवी यांचे जे रूप दिसले त्याच रुपातल्या विठोबा आणि राखुमाईच्या या मूर्तीकडे मी बऱ्याच वेळ एक टक पाहत होतो. आणि पुन्हा डोळे मिटून नतमस्तक अवस्थेत हात जोडून त्या मूर्तीद्वयासमोर उभा होतो. मनात पुन्हा 'विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल' हा जप चालू होता. कसल्या तरी अदृष्य बंधनाच्या साखळ्या माझ्यापासून तुटून दूर जात नष्ट होत आहेत आणि मी एकदम मोकळा, एकदम हलका होत आहे आहे असा अनुभव घेत मी तिथे निश्चल उभा होतो. अचानक उर आणि डोळे भरून आले. डोळ्यांतून वाहणाऱ्या पाण्याला कसलेही बंधन मान्य नव्हते! आईच्या उदरतून बाहेर आल्यानंतरचे बाळाचे अश्रू जेवढे पवित्र असतात तेवढेच पवित्र हे अश्रूही होते! अशा अवस्थेतच एक हलकासा हुंदका आला आणि मी भानावर आलो. त्या पूर्वाभिमुख मूर्तीद्वयासमोरच्या एका छोट्या कट्ट्यावर बऱ्याच वेळ बसून होतो. मनात कसलाही विचार नव्हता आणि मी फक्त त्या दोन्ही सुंदर स्वप्नांचा एकमेकांशी आणि माझ्या आयुष्याशी असलेला संबंध शोधण्याचा प्रयत्न करत होतो! समाज माध्यमावरील माझ्या खात्यावर "स्वप्नात संत तुकाराम महाराज दिसले!" हे लिहिले होते त्यावर बाबांच्या एक मित्राची आलेली टिप्पणी मात्र त्या वेळेला प्रकर्षाने आठवली.

बऱ्याच वेळ तसंच बसून झाल्यानंतर वरच्या मजल्यावरची अन्य दालने पाहून आम्ही तिघेही तळ मजल्यावर आलो आणि मी पुन्हा संत तुकाराम महाराजांच्या त्या भव्य मूर्तीसमोर नतमस्तक होऊन हात जोडून उभा राहिलो, थोडा वेळ सभा मंडपाच्या कट्ट्यावर आम्ही तिघेही बसलो आणि गाडीच्या दिशेने गेलो. नंतर मुख्य मंदिरात जाऊन संत तुकाराम महाराज यांच्या पाषाण मूर्तीचे दर्शन घेऊन गाडीत बसलो आणि पुण्याच्या दिशेने निघालो. गाडी चालवताना माझे लक्ष रस्त्यावरच असले तरीही गाडीत माझ्याबरोबर असेलेल्या सहप्रवाशांबरोबर मी बोलत असतो. पण या परतीच्या प्रवासात मी गप्पच होतो आणि त्या आधीचे काही तास पुन्हा जगण्याचा प्रयत्न करत होतो.

या सर्व घटना अनुभवल्यानंतर मला माझ्यातच काही बदल जाणवत आहेत. नेहेमीपेक्षा थोडी जास्त सकारात्मकता जाणवत आहे हा एक शब्दांत मांडण्यासारखा बदल आहे. पण इतर बदल कदाचित खूप सूक्ष्म आहेत म्हणून प्रकर्षाने जाणवत नाहीयेत. पण मला खात्री आहे की हे न जाणवणारे छोटे छोटे सूक्ष्म बदल कदाचित एखादा मोठा, दृष्य बदल माझ्यात घडवतील आणि मला त्या दिवसाची प्रतीक्षा असेल!

बावीस वर्षांमागे दिसलेल्या त्या सुंदर स्वप्नाचा अर्थ शोधण्याचे मी माझ्यापुरते तरी थांबवून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता पूर्ण करतो. 

--चेतन अरविंद आपटे 
नरवीर तानाजी मालुसरे रस्ता, पुणे 
घटस्थापना, आश्विन शुद्ध प्रतिपदा
दिनांक १५/१०/२०२३. 
दिवस दोनशे अठ्ठ्याऐंशीवा पान दोनशे अठ्ठ्याऐंशीवे

Sunday, 28 May 2023

राष्ट्र निर्माण करण्याकडे अजून एक पाऊल



दिनांक २६ मे २०१४ आणि आज दिनांक २८ मे २०२३. तेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त दोन वेगळी संसद भवने !

त्या दिवशी पंतप्रधान झाल्यावर प्रथमच संसद भवनात येताना श्री. नरेंद्र मोदी संसद भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झालेले भारतीय जनतेसोबतच संपूर्ण जगाने पहिले होते. आणि आज नऊ वर्षानंतर तो ऐतिहासिक सेनगोल नवीन संसद भवनात आणण्याआधी त्याच्या समोर साष्टांग नमन करणारे तेच माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी सर्वानी पहिले आहेत! १५ ऑगस्ट १९४७ रोजी सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून भारताच्या पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना शेवटचे व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी हा सेनगोल दिला होता. त्यानंतर अनेक वर्षे तो सेनगोल प्रयगराज येथील संग्रहालयात 'चालताना वापरायची काठी' म्हणून ठेवला गेला होता. त्या सेनगोलचा मान त्याला आज पुन्हा मिळाला! दिल्लीहून अलाहाबादला गेलेला तो सेनगोल प्रयगराजहून दिल्लीला परत आला!



हा सेनगोल हातात घेऊन लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे जाणारे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी एकच वेळेस सम्राट आणि साधू दोन्ही वाटत होते!

नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्याचा आजचा कार्यक्रम नेत्रदीपक झालाच. त्या खेरीज तो सेनगोल, तो राजदंड नवीन संसद भवनात आणण्याआधी त्याच्या समोर साष्टांग नमन करून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय इतिहास आणि सनातन धर्म किती महान आहे याची जगाला जाणीव करून दिली आहे. गेली पंचाहत्तर वर्षे दुर्लक्षित राहिलेला हा सेनगोल त्यांनी मानाने त्याच्या योग्य जागी स्थापित केला. 


आणि ती योग्य जागा म्हणजे माननीय लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला! पूर्वी राजे महाराजांच्या सभेत त्यांचे राजदंड सिंहासनाच्या उजवीकडेच असत. नवीन लोकसभा सभागृहात तीच महान परंपरा चालू राहणार आहे, ही वेगळे सांगायला नकोच!



राजदंड त्याच्या योग्य जागी स्थापित केल्यानंतर दिपप्रज्वलन केले ते मेणबत्ती किंवा कड्यापेटीने न करता तेलाच्या दिव्याने केले ते पाहून मन प्रसन्न झाले. 



सर्व उपस्थित साधू संत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या महान कार्याला भरभरून आशीर्वाद  देत होते ते पाहून काय वाटले ते शब्दांत सांगणे अवघड आहे! 

आज भारताचे एक महान रत्न, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४०वी जयंती. या दिवसाचे औचित्य साधून नव्या संसद भावनाचे उद्घाटन आणि लोकार्पण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आणि लोकसभा अध्यक्ष माननीय श्री ओम बिर्ला यांनी स्वातंत्र्यवीरांना मानवंदना तर दिलीच आणि त्यांच्या महान कार्याला आणि अजोड त्यागाला आतापर्यंत पुरेशी न मिळालेली राष्ट्रीय प्रतिष्ठाही मिळवून दिली! 

हा सगळा कार्यक्रम बघताना माझ्या जन्म या महान देशात, भारतात झाला आहे याचा सतत अभिमान वाटत होता आणि तो आजन्म राहील! स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे एक वाक्य नेहमीच माझ्या लक्षात राहले आहे:

देहाकडून देवाकडे जाण्याआधी मध्ये देश लागतो आणि आपण त्याचे देणे लागतो!
 
हे वाक्य आणि त्याचा मातितार्थ कायम माझ्या स्मरणात राहो अशीच प्रार्थना करून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग मी थांबवतो. 

जय हिंद!

दिवस एकशे अठ्ठेचाळीसवा
पान एकशे अठ्ठेचाळीसवे

तानाजी मालुसरे रास्ता, पुणे

टीप: या लेखातील सर्व प्रकाशचित्रे ही माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या Narendra Modi या YouTube channel वरील चलचित्रातले मला भावलेले क्षण आहेत. ही प्रकाशचित्रे आणि आणि या YouTube channel वरील चलचित्र यांचे हक्क मूळ प्रकाशक यांच्याकडे सुरकशीत आहेत. 

Thursday, 30 March 2023

राम जन्मला ग, सखे राम जन्मला!

|| जय श्री राम ||

त्रेता युगात तुम्हाला १४ वर्षे वनवास भोगावा लागला. कलियुगातही तुमची वनवासातून सुटका झाली नाही, चांगला काही शतके लांबला तुमचा वनवास! 

तुम्हाला होत असलेल्या या वनवासाचा त्रास भारतीय जनतेलाही होत होता. जनतेला होणारा हा त्रास नाहीसा करण्यासाठी साधारणपणे नऊ वर्षांमागे तुम्ही एक साधूला भारतवर्षावर राज्य करण्यासाठी पाठवलेत आणि तुमचा हा काही शतके लांबलेला वनवास कायमचा संपवायचा त्या साधूने पण केला! त्यासाठी सर्व सनदशीर आणि कायद्याचे मार्ग त्या साधूने अवलंबिले. या कार्यात भारतवर्षाच्या एक अब्ज पेक्षा जास्त जनतेने त्या साधूला भरभरून साथ दिली. यथा मती, यथा शक्ती आर्थिक आणि अन्य प्रकारची मदत जनतेने त्या साधूला केली, कदाचित अजूनही करत आहेत. सुदैवाने मलाही माझा खारीच वाटा त्यात देता आला.

तुमच्या जन्मस्थानी तुमचे भव्य मंदिर बांधून उभे करणे हाच त्या साधूने केलेला पण! संपूर्ण जग जेव्हा एका नव्या आणि म्हणूनच दुर्धर आजाराशी लढत होते तेव्हा या साधूने भारतवर्षावर या आजारचा कमीतकमी परिणाम होईल याची काळजी आणि दक्षता घेतलीच, शिवाय त्या जोडीला तुमच्या या भव्य मंदिराच्या जागेवर भूमीपूजन करून मंदिराची पायभरणीही केली. त्या तशा अवघड वेळी होणाऱ्या विरोधाचा जास्त विचार न करता, त्या साधूने हे भूमीपूजन आणि पायाभरणीचे कार्य तडीस नेले. तुमचे आशीर्वाद आणि भारतवर्षाच्या एक अब्ज पेक्षा जास्त जनतेची साथ या जोरावर त्या साधूने तुमचे मंदिर बांधण्याचे कार्य चालू केले, जे लवकरच पूर्णत्वास जाईल.

पुढील वर्षी याच दिवशी त्या नवीन भव्य मंदिरात तुमचे आगमन होईल अशाप्रकारे मंदिर बांधण्याचे काम चालू आहे असे सांगितले जात आहे. अशा प्रकारे तुमचा कधी शतके लांबलेलला हा वनवास कायमचा संपेल, आणि भारतीय जनताही आनंदी होईल. अयोध्येतले ते भव्य मंदिर म्हणजे सर्व भारतीयांच्या आस्थेचे आणि तुमच्या प्रति असलेल्या श्रद्धेचे प्रतीक असेलच आणि सनातन धर्माचे अधिष्ठान असेल असेही सांगितले जात आहे. मला विश्वास आहे की तिथे येऊन मला तुमचे दर्शन घेता येईल तशी अशा बाळगूनच हा लेखनाचा उद्योग सध्या थांबवतो. 

रामनवमी दिनांक ३०/०३/२०२३

-चेतन अरविंद आपटे 

दिवस एकोणनव्वदावा

पान एकोणनव्वदावे 

नरवीर तानाजी मालुसरे रस्ता, पुणे  

Tuesday, 17 January 2023

साई सुट्टयो!

 साई सुट्टयो!

जातो जातो म्हणणारे शनिमहाराज गेल्या एप्रिलमध्ये गेले खरे, पण काहीतरी विसरलंय अशा आवेशात गेल्या जुलैमध्ये परत आले आणि चांगला सहा महिने मुक्काम ठोकला!! सामान्यतः साडेसात वर्षे वास्तव्य करणारे शनिमहाराज चांगली आठ वर्षे राहून, भारतीय प्रमाण वेळेनुसार आज दिनांक १७/०१/२०२३ रोजी संध्याकाळी सहा वाजता पुढच्या प्रवासास जातील.

शनिमहाराज आधी आपली परीक्षा घेतात मग अभ्यासक्रम सांगतात. त्यांच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेले आपण मानसिक दृष्ट्या जास्त सक्षम आणि सशक्त होतो असे मला वाटते, कमीतकमी मी तरी झालो आहे. ०२/११/२०१४ ते आजपर्यंत शनिमहाराजांनी घेतलेल्या या परीक्षेत मी किती यशस्वी झालो हे येणारा काळच ठरवेल. पण एक सांगू इच्छितो की गेल्या तीन साडेतीन वर्षांत माझ्या व्यवसायात झालेली वृद्धी आणि म्हणूनच माझ्या व्यवसायाप्रति असलेली माझी वाढलेली निष्ठा ही या गोष्टी म्हणजे मी त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो असल्याचे निदर्शक आहे आणि ही शनिमहाराजांनी माझ्यावर केलेली कृपाच आहे असे मी म्हणेन!

तरीही, माझ्या व्यवसायासाठी, माझ्याकडे काम करण्यासाठी अभियंते न मिळणे हा एक छोटासा त्रास झाला, होतोय अजून, पण तो लवकरच दूर होईल अशी चिन्हे आहेत.

तर, माझ्या आठवणी प्रमाणे मी वीस बावीस वर्षांचा होतो तेव्हा पहिली साडेसाती संपली होती. आज ही दुसरी संपेल. एका व्यक्तीच्या जीवनात तीन वेळा साडेसाती येते म्हणतात. पुढची येईल तेव्हाचं तेव्हा पाहू, कमीतकमी २२ २५ वर्षे आहेत अजून!

हे छोटेसे मनोगत facebook वर लिहावे का blog वर ही ठरवण्यात थोडा वेळ गेलं खरा. पण मग हा एक छोटासा लेखनाचा उद्योग केलाच!

दिवस सतरावा, पान सतरावे
दिनांक १७/०१/२०२३
पुणे