साधारण एक वर्षांपूर्वी फुगेवाल्याच्या किस्सा समाज माध्यमांवर लिहून झाल्यावर लेखनाच्या या उद्योगाची, अर्थात ब्लॉगिंगची सुरवात झाली. या लेखन प्रवासात अडचणी अशा फार आल्याच नाहीत. आता, मनाला भावलेलं किंवा खुपलेलं लिहायचं, त्यात काय अडचणी येणार? इंटरनेट उपलब्ध नसणे किंवा फारफार तर फोनची बॅटरी संपणे! हो, मैत्र जीवाचे: पाच वर्षे, तेहेतीस वर्षे, चार वर्षे ही अख्खी ब्लॉगपोस्ट ब्लॉगरच्या मोबाईल ॲपवरच लिहिली होती.
दरम्यानच्या काळात ब्लॉग आणि ब्लॉगपोस्ट या दोन्हीमधला फरक कळला. म्हणजे लेखनाचा उद्योग हा ब्लॉग आणि वाचनाचा उद्योग ही ब्लॉगपोस्ट! वेगळ्या शब्दांत सांगायचं तर एखाद्या ब्लॉगमध्ये कदाचित एकाच विषयाला धरून वेगवेगळ्या ब्लॉगपोस्ट्स लिहायच्या आणि वेगळा विषय असेल तर वेगळा ब्लॉग लिहायचा हे लक्षात आलं. मग प्रवास वर्णनं लिहिण्यासाठी ट्रॅव्हल डायरीज् लिहायला सुरुवात केली आणि फोटोग्राफीबद्दल लिहिण्यासाठी, फोटो स्टोरीज लिहिण्यासाठी प्रकाशचित्रणाचा उद्योग हा वेगळा ब्लॉग तयार केला. गेल्या वर्षी एक भन्नाट दूरचित्रवाणी मालिका लोकप्रिय झाली, तिच्या बद्दल लिहिलेली ब्लॉगपोस्ट सर्वाधिक वाचली गेलेली पोस्ट आहे. स्वतःच्या जन्म शहराबद्दल कोणालाही आकर्षण आणि प्रेम असू शकते तसे मुंबईबद्दल मलाही आहे. म्हणूनच मुंबईबद्दलच्या माझ्या भावना ज्या जवळ जवळ दहा वर्षांपूर्वी इंग्रजीत लिहायला घेतल्या होत्या त्याही ब्लॉगपोस्ट स्वरूपात व्यक्त केल्या आहेत, त्याचबरोबर मुंबईचे स्पिरिट याबद्दल जे टोचते तेही शब्दबद्ध करून झालेय.
अशाप्रकारे गेल्या वर्षभरात या लेखनाच्या उद्योगाने बर्यापैकी बाळसे धरले आहे. प्रत्येक ब्लॉगपोस्टचा शेवट करायची कल्पना कशी सुचली हे कथा लेखन या ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले आहे. म्हणून ३१/१२/२०१७ रोजी एक आणि ०१/०१/२०१८ रोजी एक असे दोन दिवस सलग ब्लॉगपोस्ट्स प्रसिद्ध केल्या. त्यामुळे रोज एक ब्लॉगपोस्ट लिहिण्याचा माझा विचार आहे का असे अनेकांना वाटले असावे, पण तसा काही सध्या तरी मानस नाही. तरीही वर्षभरात बारा म्हणजे महिन्याला सरासरी एक ब्लॉगपोस्ट लिहिली आहे 'लेखनाचा उद्योग' मध्ये. ट्रॅव्हल डायरीज् मधल्या सहा आणि प्रकाशचित्रणाचा उद्योग मधल्या दोन धरल्या तर वर्षभरात २० ब्लॉगपोस्ट लिहून झाल्यात. एखाद्या नवख्या हौशी लेखकासाठी हे प्रमाण कसे आहे यावर जाणकारांनी टिप्पण्णी करावी.
तर ब्लॉगरच्या मोबाईल ॲप मुळे कुठेही आणि कधीही ब्लॉगपोस्ट लिहिणे आणि संपादित करणे शक्य झाले. पण या ॲपमध्ये कोणती ब्लॉगपोस्ट कितीवेळा वाचली गेली ते कळत नाही, जे वेबसाईटवर कळते. तसेच याचे अपडेट्स प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत. तसंच या ॲपवर अक्षराचा (फॉन्टचा) आकार कमी जास्त करता न येणे हीसुद्धा या ॲपची मर्यादा आहे. त्या मुळे यावर ब्लॉग लिहिणे तसे जिकिरीचे आहे. तरीही आयत्या वेळेच्या बदलांसाठी हे ॲप उपयुक्त आहे असेच म्हणता येईल.
अशा प्रकारे संगणक आणि भ्रमण ध्वनी (अर्थात mobile phone) या दोन्ही साधनांचा वापर करून ब्लॉगिंग चालू आहे. ते असेच चालू राहो, वेगवेगळे विषय सुचत राहून चांगले लेखन हातून घडो हीच प्रार्थना करून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता थांबवतो.
दिवस सोळावा पान सोळावे.
सिंहगड रस्ता, पुणे
१६/०१/२०१८