Showing posts with label blogging. Show all posts
Showing posts with label blogging. Show all posts

Thursday, 5 August 2021

Yeh Dil Can't Wait Anymore!

It was the first ever televised war. It was fought in the summer of 1999. It was one of the unique mountain war. It was a war that has made a mark on each and every citizen of Bharat and for many like me, stories of this war give goosebumps! Perhaps because people of my generation who came to this world just before or just after the 1971 war with the same troublesome neighbor, were in middle of their 20's when Kargil war was going on. And no wonder they were enthralled by the bravery of Indian soldiers on those icy peaks!! The cost of this glorious victory was the martyrdom of over 500 brave hearts of Bharat.

It's those soldiers of the soil, because of whom we the common people of this country can do their routine stuff. Hence it's our duty to give respect to the Bhartiya armed forces in whichever way possible. And the filmmakers do this in their way. Be it the four hour long movie LOC Kargil wherein the Operation Vijay was given all possible mention, or be it Lakshya where the story of the Kargil war was nicely blended with the love story of Lieutenant Karan Shergil and Romila Dutta. 

While the movie LOC Kargil showcased the entire, almost three months long war on the big screen, the individual stories of all the battalions and the troops therein, are subject matter of separate movies or probably web serials. One such story is of Param Veer Chakra Late Captain Vikram Batra aka Shershaah. And this Dil can't wait anymore till the 12th of this month for the release of the movie Shershaah! 

Look for this space for a candid viewer review of this upcoming movie on or after the 12th. 

Till then, read through the other movie and web series reviews I had written earlier:
 
 
Page Two Hundred and Seventeen.
Day Two Hundred and Seventeen.

Chetan Arvind Apte
Pune.

Tuesday, 27 February 2018

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी

विष्णु वामन शिरवाडकर अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या मराठी साहित्यातल्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांना १९८७ साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तेव्हापासून २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस, मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

मराठी ही माझी मातृभाषा आणि पितृभाषाही असल्यामुळे शुद्ध (शुध्द नाही) मराठी लिहिण्याकडे आणि बोलण्याकडे माझा कल असतो. म्हणूनच हा लेखनाचा उद्योग मराठीत चालू केला. 

श आणि ष, न आणि ण, त आणि ट, थ आणि ठ या अक्षरांचा उच्चार आणि लिखाणातला वापर हा बरोबरच असायला हवा. यांची अदलाबदल झाली तर भलताच अर्थ होतो! 'आणि'मधला णि ऱ्ह्स्व (इथे माझ्या संगणकावर र्हस्व असे लिहिले जात होते, जे बरोबर नाही. म्हणून mobileवर लिहून हा शब्द इथे आणला) असतो, पाणी मधला णी दीर्घ असतो हे भान ठेवायला हवे. इथे पाणी ऐवजी पाणि झाले तर जल ऐवजी हात असा अर्थ होतो. लग्नात नवरदेव वधूचे पाणिग्रहण करतो, पाणीग्रहण नाही! एकदा एका शाळेत मराठीच्या परीक्षेत प्रश्न विचारला गेला, "पाच वहाणांची नावे लिहा" हा प्रश्न वाचून बहुतेक विद्यार्थ्यांनी चपला बनवणाऱ्या आस्थापनांची (companiesची) नावे लिहिली. त्या सर्व मुलांना या प्रश्नात शून्य गुण मिळालेले पाहून सगळे पालक हादरले आणि शिक्षकांकडे गेले. तेव्हा ते शिक्षक म्हणाले, "मुलांना पाच गाड्यांची नावे (वाहनांची नावे) लिहायला सांगितली होती. त्यांनी चपलांची नावे लिहिली!" अशा प्रकारच्या चुका टाळल्याच पाहिजेत. परीक्षेत विचारलेला हा प्रश्न व्याकरणदृष्ट्या कदाचित बरोबर असेल पण अशुद्ध नक्कीच आहे. तसेच अशा चुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्याला कोण जबाबदार आहे? 

मराठीत बोलताना आणि लिहिताना अजून काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या अशा: 

आपल्याला माणूस भेटतो, मिळत नाही. हरवलेली वस्तू मिळते किंवा सापडते, भेटत नाही. गाणे म्हणतात किंवा गातात, बोलत नाहीत. "चहा घेतला" असे म्हणतात, "चहा घेतली" असे नाही. 

काही इंग्रजी शब्द मराठीत वापरताना त्या शब्दाचे लिंग अर्थात gender बरोबरच लिहिले पाहिजे उदाहरणार्थ ते पेन, तो पेन नाही. कारण इंग्रजीत It is a pen असे म्हणतात आणि लिहितात, He is a pen असे नाही. किंवा सरळ लेखणी हा शब्द वापरावा! अशी अजून अनेक उदाहरणे देता येतील.  

आता इंग्रजीतले काही शब्द मराठीत बेमालूमपणे मिळसळले गेले आहे. Cup या शब्दाला पेला हा शब्द आहे पण बशी पेल्याबरोबरही छान दिसते आणि कपाबरोबरही!

काही वर्षांपूर्वी संगणकावर Unicode मध्ये देवनागरीत टंकलेखन उपलब्ध झाले, पाठोपाठच भ्रमणध्वनीवर म्हणजेच mobile phoneवरही सहज देवानागरीत टंकलेखन शक्य झाले. तोपर्यंत मराठीत लिहायचे असेल तर roman लिपीमधेच लिहावे लागायचे आणि त्यातूनही काही मजेशीर चुका घडत. समाजमाध्यमांवर फिरत असलेला हा विनोद वाचनात आला असेलच:

===========
एका मैत्रिणीची बायपास झाली. तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला:
"Ata tula udya marayala harakat nahi."
बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं कारण तिने वाचलं "आता तुला उद्या मरायला हरकत नाही!" बिचारी नुकतीच एका जीवघेण्या आजारातून बरी झाली होती, त्यात असे काही वाचल्यावर परत तिच्या हृदयाचे ठोके चुकले असते. संदेश पाठवणारीला लिहायचे होते "आता तुला उड्या मारायला हरकत नाही"!
===========

यासाठीच संगणकावर आणि भ्रमणध्वनीवर मराठीत लिहायचे असेल तर देवनागरी लिपी वापरली पाहिजे. मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे, roman नाही. आणि आपणच याचा आग्रह धरायला हवा. असे म्हणतात, "तुम्हाला हवा असलेला बदल तुम्हीच व्हा!" मग आपणच शुद्ध मराठी लिहिण्याची (हाती, संगणकावर आणि mobileवरही), बोलण्याची सुरुवात करूया आणि रोजच्या आचरणातही हीच सवय ठेवूया. 

आज एकाने समाज माध्यमांवर प्रश्न विचारला, "किती पिढ्यानंतर 'Happy  Marathi Language Day!' असे विचारण्याची वेळ येईल?" अशी वेळ येऊ न देणे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. त्यासाठी मराठी भाषा आपणच जास्तीत जास्त वापरायला हवी आणि येणाऱ्या पिढयांनाही निग्रहाने शक्य तिथे मराठीचा वापर करायला शिकवले पाहिजे. म्हणूनच मी समाज माध्यमांवर मराठीत लिहिताना अन्य भाषांचा वापर टाळतो, आणि इंग्रजी शब्द वापरताना देवनागरीत त्या शब्दाचा उच्चार लिहिण्याऐवजी तो शब्द roman लिपीतच लिहितो. 

"आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे. कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात, तितके फॉरीन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल.
- पु.ल. देशपांडे
संदर्भ :आमचे भाषाविषयक धोरण"

या अतिशय मार्मिक शब्दांत महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाने मराठी भाषेवर होणाऱ्या इंग्रजीच्या आक्रमणाची दखलही घेतली आहे आणि खिल्लीही उडवली आहे.

या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिग्गज मराठी कवी, संगीतकार आणि गायकांनी एक सुंदर गाणे बनवले आहे. या गीतात म्हणाल्याप्रमाणे मराठी भाषेचा अभिमान बाळगून आणि मराठी भाषा दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहील अशी आशा बाळगून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो. 


दिवस अठ्ठावान्नावा. पान अठ्ठावान्नावे 
मराठी भाषा गौरव दिन

२७/०२/२०१८
मुलुंड, मुंबई











Tuesday, 16 January 2018

'लेखनाचा उद्योग'ची वर्षपूर्ती

साधारण एक वर्षांपूर्वी फुगेवाल्याच्या किस्सा समाज माध्यमांवर लिहून झाल्यावर लेखनाच्या या उद्योगाची, अर्थात ब्लॉगिंगची सुरवात झाली. या लेखन प्रवासात अडचणी अशा फार आल्याच नाहीत. आता, मनाला भावलेलं किंवा खुपलेलं लिहायचं, त्यात काय अडचणी येणार? इंटरनेट उपलब्ध नसणे किंवा फारफार तर फोनची बॅटरी संपणे! हो, मैत्र जीवाचे: पाच वर्षे, तेहेतीस वर्षे, चार वर्षे ही अख्खी ब्लॉगपोस्ट ब्लॉगरच्या  मोबाईल ॲपवरच लिहिली होती. 

दरम्यानच्या काळात ब्लॉग आणि ब्लॉगपोस्ट या दोन्हीमधला फरक कळला. म्हणजे लेखनाचा उद्योग हा ब्लॉग आणि वाचनाचा उद्योग ही ब्लॉगपोस्ट! वेगळ्या शब्दांत सांगायचं तर एखाद्या ब्लॉगमध्ये कदाचित एकाच विषयाला धरून वेगवेगळ्या ब्लॉगपोस्ट्स लिहायच्या आणि वेगळा विषय असेल तर वेगळा ब्लॉग लिहायचा हे लक्षात आलं. मग प्रवास वर्णनं लिहिण्यासाठी ट्रॅव्हल डायरीज् लिहायला सुरुवात केली आणि फोटोग्राफीबद्दल लिहिण्यासाठी, फोटो स्टोरीज लिहिण्यासाठी प्रकाशचित्रणाचा उद्योग हा वेगळा ब्लॉग तयार केला. गेल्या वर्षी एक भन्नाट दूरचित्रवाणी मालिका लोकप्रिय झाली, तिच्या बद्दल लिहिलेली ब्लॉगपोस्ट सर्वाधिक वाचली गेलेली पोस्ट आहे. स्वतःच्या जन्म शहराबद्दल कोणालाही आकर्षण आणि प्रेम असू शकते तसे मुंबईबद्दल मलाही आहे. म्हणूनच मुंबईबद्दलच्या माझ्या भावना ज्या जवळ जवळ दहा वर्षांपूर्वी इंग्रजीत लिहायला घेतल्या होत्या त्याही ब्लॉगपोस्ट स्वरूपात व्यक्त केल्या आहेत, त्याचबरोबर मुंबईचे स्पिरिट याबद्दल जे टोचते तेही शब्दबद्ध करून झालेय.

अशाप्रकारे गेल्या वर्षभरात या लेखनाच्या उद्योगाने बर्यापैकी बाळसे धरले आहे. प्रत्येक ब्लॉगपोस्टचा शेवट करायची कल्पना कशी सुचली हे कथा लेखन या ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले आहे. म्हणून ३१/१२/२०१७ रोजी एक आणि ०१/०१/२०१८ रोजी एक असे दोन दिवस सलग ब्लॉगपोस्ट्स प्रसिद्ध केल्या. त्यामुळे रोज एक ब्लॉगपोस्ट लिहिण्याचा माझा विचार आहे का असे अनेकांना वाटले असावे, पण तसा काही सध्या तरी मानस नाही. तरीही वर्षभरात बारा म्हणजे महिन्याला सरासरी एक ब्लॉगपोस्ट लिहिली आहे 'लेखनाचा उद्योग' मध्ये. ट्रॅव्हल डायरीज् मधल्या सहा आणि प्रकाशचित्रणाचा उद्योग मधल्या दोन धरल्या तर वर्षभरात २० ब्लॉगपोस्ट लिहून झाल्यात. एखाद्या नवख्या हौशी लेखकासाठी हे प्रमाण कसे आहे यावर जाणकारांनी टिप्पण्णी करावी. 

तर ब्लॉगरच्या मोबाईल ॲप मुळे कुठेही आणि कधीही ब्लॉगपोस्ट लिहिणे आणि संपादित करणे शक्य झाले. पण या ॲपमध्ये कोणती ब्लॉगपोस्ट कितीवेळा वाचली गेली ते कळत नाही, जे वेबसाईटवर कळते. तसेच याचे अपडेट्स प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत. तसंच या ॲपवर अक्षराचा (फॉन्टचा) आकार कमी जास्त करता न येणे हीसुद्धा या ॲपची मर्यादा आहे. त्या मुळे यावर ब्लॉग लिहिणे तसे जिकिरीचे आहे. तरीही आयत्या वेळेच्या बदलांसाठी हे ॲप उपयुक्त आहे असेच म्हणता येईल. 

अशा प्रकारे  संगणक आणि भ्रमण ध्वनी (अर्थात mobile phone) या दोन्ही साधनांचा वापर करून ब्लॉगिंग चालू आहे. ते असेच चालू राहो, वेगवेगळे विषय सुचत राहून चांगले लेखन हातून घडो हीच प्रार्थना करून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता थांबवतो. 

दिवस सोळावा पान सोळावे. 

सिंहगड रस्ता, पुणे 
१६/०१/२०१८ 

Sunday, 31 December 2017

काय दिलं २०१७ ने?

काय दिलं २०१७ ने? बरंच काही! 

माझ्या देशाची पत आंतरराष्ट्रीय मंचावर खूपच सुधारली. त्या सुधारणेचा आलेख चढताच आहे आणि चढताच राहील! राष्ट्रीय पातळीवर काही महत्वपूर्ण आर्थिक निर्णय आणि बदललेली कररचना यांचाही हातभार लागला यात. आता काही मूलगामी बदल केले की त्याचे बरे वाईट परिणाम होतात, तसे या बदलांचेही झालेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की दुचाकी किंवा चारचाकी गाडी वळवणे सोपे असते पण लोहमार्गावरून जाणारी ट्रेन रूळ बदलताना रुळांचा आवाज होतोच. त्याचप्रमाणे सवाशे कोटी लोकसंख्येच्या देशाची घडी व्यवस्थित बसवताना थोडी खडखड, थोडा कोलाहल होणारच! तरीही एकंदरीत माझ्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे हे कोणीही मान्य करेल.  

गेल्या वर्षीपर्यंत काहीशे कोटी रुपयांची गोष्ट करणारी चित्रपट सृष्टी "बाहुबली द कन्क्लुजन" या अतिभव्य चित्रपटामुळे हजारो कोटी रुपयांच्या गोष्टी करू लागली. बेचाळीस वर्षांपूर्वी जसा "शोले" ट्रेंड सेटर होता तसाच यंदा "बाहुबली द कन्क्लुजन" हा चित्रपट ट्रेंड सेटर ठरला. एक पडदा चित्रपट गृह असो वा मल्टिप्लेक्स, सगळीकडे याने गर्दी खेचली. परदेशांत तेथील स्थानिक भाषांतही हा चित्रपट प्रसिद्ध झाला. 

मराठी चित्रपटांबद्दल बोलायचं तर वर्षाच्या सुरुवातीला आलेला "ती सध्या काय करते?" बराच लक्षवेधी ठरला. शाळकरी वयात निर्माण झालेलं प्रेम तारुण्यातही, दोघांचे मार्ग वेगवेगळे झायावरही कसं टिकू शकतं याचं छान चित्रण होतं यात. तीन वेगवेगळ्या कलाकारांनी एकाच पात्राची वेगवेगळ्या वयातील भूमिका करण्याचा प्रयोग यशस्वी झाला असंच म्हणता येईल. याच बरोबर फास्टर फेणे, बापजन्म, हृदयांतर, मुरांबा, कच्चा लिंबू या सारखे भरपूर आशयघन मराठी चित्रपट या वर्षात आले आणि त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली.

भारतीय क्रिकेटपटुंच्या आयुष्यावर एकूण तीन चित्रपट प्रदर्शित झाले गेल्या दोन तीन वर्षांत. पैकी दोन चित्रपटांत वेगवेगळ्या अभिनेत्यांनी त्या त्या क्रिकेटपटुंच्या भूमिका केल्या पण क्रिकेटच्या देवाची भूमिका कोण करणार? मग चित्रपट बनवताना तो देवच शतकोटी स्वप्ने घेऊन रुपेरी पडद्यावर अवतरला!

दूरचित्रवाणीवरही या वर्षात खूप नवे प्रयोग झाले. वर्षानुवर्षे चालणाऱ्या दैनंदिन मालिकांना कंटाळलेल्या प्रेक्षकांना मिनी सिरीज या प्रकाराशी ओळख करून दिली ती रुद्रमने. भक्कम कथानकासह अनेक जमेच्या बाजू असलेली ही मालिका ७० - ७५ भागांचीच होती. नजीकच्या भविष्यात अशा अजून मालिका बघायला मिळतील अशी आशा करूया. या मालिकेमुळेच मित्र परिवारातही थोडी वाढ झाली. 

या मालिकेबद्दल लिहिलेल्या ब्लॉगपोस्टमुळे हा लेखनाचा उद्योग थोडा जास्त लोकप्रिय झाला. आणि त्यामुळे हा उद्योग चालू ठेवण्याचा उत्साहही वाढला. मी काही सिद्धहस्त वगैरे लेखक नाही. जे मनाला भावते किंवा टोचते ते साध्या सोप्या शब्दांत मांडतो इतकंच. सुदैवाने चांगला वाचकवर्ग या ब्लॉगला मिळालाय त्यामुळे हा उद्योग मी चालू ठेवणार आहे. 

या वर्षात आणखीन एक नवीन उद्योग सुरू केला, सुरु झाला असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. आयुष्यात पहिल्यांदाच शिक्षक झालो. एक नवं दालनच उघडलं! आता हा उद्योगही बाळसं धरतोय. या बद्दल सविस्तर परत कधीतरी. 

तर एकंदरीत २०१७ या वर्षाने अनेक चांगले अनुभव दिले, उमेद दिली, उत्साह दिला आणि मित्र दिले. येणारे वर्ष, तुम्ही कोणत्याही वयाचे असलात तरीही अठराच वर्षे वयाचे आहात याची आठवण करून देणारे आहे. २०१८ म्हणजे looking 20 feeling 18 असंच काहीसं नाहीये का?

या वर्षरुपी पुस्तकाच्या दिवसारूपी पानांवर खूप काही लिहिले गेले आणि ते कायम स्मरणात राहील. या पुस्तकाची थोडी पाने चाळल्यावर काही चांगल्या वाईट गोष्टी सापडल्या, त्यांची आठवण सोबत ठेवून वर्षभर उघडे असलेले हे ३६५ पानांचे पुस्तक आज मिटत आहे. पुढील वर्षी नवीन आशा आकांक्षा घेऊन अजून एक कोरे पुस्तक उघडायचे आणि त्याच्या प्रत्येक पानावर काही ना काही लिहायचे, अशी इच्छा ठेवून आजच्यापुरता आणि या वर्षापुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो!

दिवस तीनशे पासष्टावा पान तीनशे पासष्टावे!

३१/१२/२०१७ 
मुलुंड मुंबई



Sunday, 10 September 2017

लेखनाच्या उद्योगामागची प्रेरणा

जानेवारी २०१७ पासून हा लेखनाचा उद्योग सुरू केल्यापासून मित्रवर्गाकडून बऱ्यापैकी कौतुक होतंय असं मला वाटतं (मित्रांनो, तसं नसेल तर कृपया परखड टिका करा. जेणेकरून मला लेखनात सुधारणा करता येतील!). या ब्लॉगमध्ये पाच सहा वेगवेगळ्या विषयांवर यथा मती लेखन केले ज्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. लहानपणी लिहिलेली एक कथाही ब्लॉगच्या स्वरूपात इथे आणून झालीय.

पण एक प्रतिक्रिया जी अनेकांकडून आली ती म्हणजे हा उद्योग चालू करावा असं मला का वाटलं? लेखन ही कला (लेखन ही कला आहे का? जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा) माझ्यात कुठून आली? ही प्रतिक्रिया ब्लॉगवरील टिप्पणीमधे आली नाही तर व्यक्तिगत दुरध्वनी करून काही मित्रांनी हा प्रश्न मला विचारला. या व अशाच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी परत एकदा हा लेखनाचा उद्योग!
 
ब्लॉग लिहावेत हे मला या वर्षी जानेवारीत सुचले, ते म्हणजे फुगेवाल्याचा किस्सा समाज माध्यमांवर लिहून झाल्यावर आणि त्याला आलेल्या प्रतिसादानंतर. त्याआधी ०१/०१/२०१६ रोजी नवीन वर्षाचा शुभेच्छा संदेश समाज माध्यमांवर लिहिला होता आणि ठरवलं होतं की दर महीन्याच्या एक तारखेला काहीतरी लेखन करेन. आणि नवीन वर्षांचे संकल्प जसे एक आठवड्यात बंद पडतात तसंच काहीसं झालं या संकल्पाचं आणि संपूर्ण २०१६ वर्ष काहीच लेखन झालं नाही!

पण लेखन करण्याची सुरुवात म्हणाल तर जानेवारी २०१६ किंवा जानेवारी २०१७ ही नव्हती. ती जाते सव्वीस वर्षे मागे म्हणजे जानेवारी १९९१ मध्ये जेव्हा रोजनिशी लिहायला सुरू केली होती. "विसाव्या शतकाची शेवटची दहा वर्षे राहिली" हे पहिले वाक्य होते त्या दिवशी. ही रोजनिशी लिहिण्यासाठी दिनांक छापलेली बाजारात मिळणारी डायरी न घेता माझ्या बाबाच्या सल्ल्यानुसार साधी शाळेत वापरतात तशी, त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर बाळू वही घेतली आणि हाताने दिनांक लिहून रोजनिशी लिहिणे सुरू केले. त्याचे काही फायदे असे झाले की छापील डायरीत प्रत्येक दिनांकाला ठराविक जागा असते तेवढ्याच जागेत रोजचं लेखन करायचं अशी मर्यादा नव्हती आणि सलग, रोजचे रोज लेखन नाही झाले तर काही पाने मोकळी रहाण्याची शक्यता नव्हती. एक दोन दिवस लेखन झाले नाही तर पुढचं लेखन ज्या दिवशी होईल त्या दिवशीचा दिनांक आधीच्या लेखनानंतर टाकून सुरू करायचं इतकं सोपं होतं! अशा प्रकारे जवळपास सात आठ वर्षे म्हणजे १९९८ पर्यंत लेखन झालं. आता त्या वह्या कुठे आहेत, शोधाव्याच लागतील.

दरम्यानच्या काळात मी स्थापत्य अभियंता (Civil Engineer) आणि व्यवसाय प्रशासन विशेषज्ञ (MBA) झालो (शुद्ध मराठीत लिहिण्याचा अट्टाहास असला की काही इंग्रजी शब्दांना उगाच अवघड मराठी प्रतिशब्द लिहिले जातात ते असे!), आणि व्यवसायात स्थिरावलो होतो.  दरम्यानच्या काळात "दोन लग्नांची गोष्ट" लिहून झाली होती. तेव्हा तीही एका साध्या वहीतच लिहीली होती. त्यानंतर अजून एक कथा लिहीली होती, अशीच दुसऱ्या एका वहीत. त्या कथांबद्दल इथे वाचा. मग व्यावसायिक आयुष्यातल्या जबाबदाऱ्यांमुळे लेखन फक्त बैठकीचं इतिवृत्त अर्थात minutes of meeting लिहिण्यापुरतं मर्यादित राहीलं होतं आणि त्यामुळे बरंच रुक्ष झालं होतं! तरीही २००५ साली कोकणात जाऊन आल्यावर पुण्यातून गुहागरला राज्य परिवहन मंडळाच्या बसने कसं जायचं, जवळपास बघण्यासारखं काय काय आहे याबद्दल माहिती देणारा एक ब्लॉग लिहिला होता, काही प्रकाशचित्रांसकट. मग फेसबुक सारखी समाज माध्यमं हाताशी आल्यावर थोडा जास्त वाव मिळाला लेखनाला, तरी त्यालाही मर्यादा आहेच.

या वर्षाच्या सुरुवातीला स्फुट लेखन करणं जरा गंभीरपणे घेतलं आणि नवीन वर्षांचा जरा मोठा शुभेच्छा संदेश समाज माध्यमांवर लिहिला. त्यानंतर गुगलच्याच खात्यातून ब्लॉग लिहिण्याच्या या संकेतस्थळाचा वापर करता येतो आणि त्यासाठी मोबाईल ॲप आहे याचा साक्षात्कार झाल्यावर ठरवूनच टाकलं हे माध्यम वापरायचं आणि बऱ्यापैकी नियमित लेखन चालू झालं. पुढचा प्रश्न होता ब्लॉगला नाव काय द्यायचं हा. आपण सतत काही ना काही उद्योग करत असतो, त्यातलाच हा अजून एक उद्योग म्हणून या मराठीतल्या ब्लॉगचं नाव लेखनाचा उद्योग असं. ठेवलं! गेल्या एप्रिलमध्ये एका मोठ्या सुट्टीवर मध्य प्रदेशात गेलो होतो. त्या सहलीचे प्रकाशचित्रे नुसतीच समाज माध्यमांवर प्रसारित करण्यापेक्षा प्रवासाचा अनुभव आणि भेट दिलेल्या स्थळांची माहिती, रस्त्यांची माहिती अशा स्वरूपाचा ब्लॉग लिहायचं ठरवलं. मोठ्या जनसमुदायाला उपयोग व्हावा म्हणून या ट्रॅव्हल डायरीज इंग्रजीतून लिहिल्या.

तर अशा प्रकारे हे लेखन सुरू राहिलंय गेले आठ नऊ महिने. ते कायम सुरू राहील अशी अपेक्षा आणि इच्छा ठेवून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग संपवतो.

दिवस दोनशे त्रेपन्नावा पान दोनशे त्रेपन्नावे

मुलुंड मुंबई
१०/०९/२०१७