Thursday, 29 March 2018

स्त्री परिक्रमा - Journey of Woman

ही blog post लेखनाचा उद्योग मध्ये लिहावी का प्रकाशचित्रणाचा उद्योग मध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आजचा दिवस गेला! मुळात हा प्रश्न पाडण्याचं कारण म्हणजे "स्त्री परिक्रमा - Journey of Woman" या नाट्याविष्काराचं प्रकाशचित्रण मी केलं आणि याबद्दल व्यक्त व्हावं ते शब्दांतून का प्रकाशचित्रांच्या माध्यमातून हे ठरवावं लागलं, आणि म्हणूनच हा प्रश्न पडला. प्रकाशचित्रणाच्या तांत्रिक बाबींबद्दल लिहिण्यासारखं इथे काही नाहीये, किंबहुना तो हेतूही नाहीये. लिहायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे ते या नाट्याविष्काराबद्दल, हे ठरवल्यावर हा लेखनाचा उद्योग सुरू केला!

मुलुंड पश्चिम येथील महाराष्ट्र सेवा संघ इथे हा नाट्याविष्कार दिनांक २८/०३/२०१८ रोजी सादर झाला. सादरकर्ते होते सरस्वती नृत्य कला मंदिर आणि महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड. याला पार्श्वभूमी होती नुकत्याच साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची. मेधा दिवेकर यांची ही संकल्पना. त्यांच्यासोबत ८ वर्षे ते ५० वर्षे वर्षे वयाच्या ३३ अन्य स्त्री कलाकारांनी हा जवळ जवळ दोन तासांचा नाट्याविष्कार सादर केला. मुलुंडमधील सुप्रसिद्ध संस्कृत भाषा तज्ज्ञ् पंडित प्रभाकर भातखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा नाट्याविष्कार साकारला गेला आहे. कथक नृत्य, जोडीला मुद्राभिनय आणि साजेसं पार्श्वसंगीत अशी काहीशी या नाट्याविष्काराची मांडणी होती. वेदकालापासून एकविसाव्या शतकापर्यंतचा स्त्रीचा प्रवास म्हणजेच हा "स्त्री परिक्रमा - Journey of Woman" हा नाट्याविष्कार!

हो, नाट्याविष्कारच. कारण हजारो वर्षांपासून स्त्रियांचं भारतीय समाजात काय स्थान होतं आणि ते काळानुसार कसं बदलत गेलं, स्त्रियांना कोणकोणत्या स्थित्यंतरातून जावं लागलं, त्यांच्यावर कसे अत्याचार झाले, त्या अत्याचारांचा प्रतिकार स्त्रियांनी कसा केला हे सर्व आयाम दोन घटिकांमध्ये सादर करायचं तर त्यात नाट्य हे येणारच! मग या नाट्याविष्काराची मांडणी ठरली, शे दोनशे आसनक्षमतेच्या प्रेक्षागृहात हा नाट्याविष्कार कसा सादर करायचा हे ठरलं, प्रकाशयोजना ठरली, नेपथ्य ठरलं आणि जोडीला अविरत सुरू होत्या तालिमी. या सर्व कलाकार मुली आणि स्त्रिया आपापली घरं, शाळा, महाविद्यालये, परीक्षा, नोकरी-व्यवसाय हे सर्व लीलया सांभाळून रोज रात्री सराव करत होत्या. माझ्या एका मित्राच्या मुलीनेही यात सहभाग घेतला होता. त्यानेच photographyसाठी माझे नाव मेधाताईंना सांगितले. नाहीतर मला असा काही कार्यक्रम आहे हे मला कळण्याचा काहीच मार्ग नव्हता! आणि कळलं असत. तरी कदाचित एक प्रेक्षक म्हणून माझी हजेरी लागली असती. या मित्राच्या सांगण्यावरूनच मी यांच्या तालिमींचेही प्रकाशचित्रण केले आणि मुख्य कार्यक्रमाचेही. आणि म्हणूनच मला हा कार्यक्रम जवळून पहाता आला, ही संकल्पना अनुभवता आली. 

ही नृत्य नाटिका सुरू होते ती पार्वतीने समकालीन स्त्रियांना नृत्यकला शिकवली या प्रसंगाने. आणि पुढे रामायण, महाभारत असा कालप्रवास करून हा नाट्याविष्कार येतो भारतावर झालेल्या परकीय आक्रमणांच्या काळाकडे.

रामायणकाळातला सर्वात उत्तम सादर झालेला प्रसंग म्हणजे सीता भूगर्भात विलीन होते तो. आता रंगमंच दुभंगणे शक्य नव्हते. मग रंगमंचाच्या दोन्ही बाजूंनी काही कलाकार एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांच्या मध्ये सीता लुप्त होते अशा प्रकारे हा प्रसंग सादर केला आहे आणि तो बघणे हा एक सुंदर अनुभव आहे!



सीता भूगर्भात विलीन होते

त्यानंतर हा नाट्याविष्कार पुढे सरकतो महाभारत काळाकडे. यात महाभारतीय युद्धानंतर कुंती आणि गांधारीबरोबर द्रौपदी चर्चा करत आहे अशा प्रकारे हा कालखंड सादर केला आहे. 


गांधारी आणि कुंती महाभारतीय युद्धानंतर

हे युद्ध का घडलं, टाळता आलं असतं का असे काही प्रश्न विचारून, प्रेक्षकांना विचाराधीन करून नाट्याविष्कार पुढे सरकतो तो भारतावर झालेल्या परकीयांच्या आक्रमणाकड़े. घोड्यांच्या टापांच्या पार्श्वसंगीताच्या ठेक्यावर प्रेक्षागृहातूनच या कलाकार रंगमंचावर प्रवेश करतात. हा प्रसंग पाहताना, अनुभवताना अंगावर अक्षरश: काटा येतो!



परकीय आक्रमक येतात त्या प्रसंगात कलाकार प्रेक्षागृहातून प्रवेश करतात

या नंतरच्या भागात पुरुषसत्ताक कालखंडात स्त्रियांवर होणारे अत्याचार फारच प्रभावीपणे सादर केले आहेत. घरात 'कुलदीपक' अर्थात मुलगा जन्माला आल्यानंतर त्या मुलाचे होणारे कौतुक आणि त्याच्या आईची आणि त्या आईच्या मोठ्या मुलीची होणारी हेटाळणी, पतीच्या निधनानंतर पत्नी सती जाणे, जरठ-कुमारी विवाह हे प्रसंग लक्षात राहातात. या भागात रंगमंचावर इतके प्रसंग एका वेळी घडत असतात की प्रेक्षकांना सगळीकडे लक्ष ठेवावे लागते! 


स्त्री शक्ती

पुढे मग सुधारणांचा काळ येतो. यात शिक्षणापासून वंचित राहिलेल्या स्त्रियांना शिकून समृद्ध आणि सक्षम होताना दर्शवलं आहे. क्रीडा, चित्रपट, व्यवसाय यासह सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया सहभागी होतात, कदाचित एक पाऊल पुढेच असतात; घर, मुले, त्यांचं शिक्षण या सर्व आघाड्या सांभाळून स्वतःच्या कारकिर्दीलाही आकार देतात हे दर्शविताना व्यसनाधीनतेकडे आकृष्ट होतानाही दिसतात! पण अन्य स्त्रियाच त्यांना यापासून परावृत्त करतात हा संदेशही दिला आहे. 

अशापराकारे हजारो वर्षांचा कालखंड केवळ दोन तासांत दर्शवणे हे एक मोठे आव्हान आहे आणि ते या सर्व ३३ कलाकारांनी अतिशय उत्तम प्रकारे पेललं आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडून वहातांना दिसत होतं. सर्व कलाकारांची महिना दोन महिन्यांची मेहनत कामी आली होती हे कळत होतं त्यांच्याकडे पाहून.

या नाट्याविष्काराच्या तालिमींचे आणि प्रत्यक्ष सादरीकरणाचे प्रकाशचित्रण करणे हा एक समृद्ध करणारा अनुभव होता. असे नाट्याविष्कार घडत असताना कलाकारांना आणि सर्व चमूला काय मेहनत घ्यावी लागते हे जाणून घेता आलं. दिग्दर्शिकेला काय अभिप्रेत आहे आणि कलाकारांनी ते कशाप्रकारे सादर केलं पाहिजे हे कळलं. या अनुभावाचा पुढे काय आणि कसा उपायोग होईल ते काळच ठरवेल. परंतु प्रकाशचित्रणाच्या काही वेगळ्या आयामांकडे लक्ष देता आलं हे माझ्यासाठी खासच आहे. 

अशा नाट्याविष्कारांचा भाग होण्याच्या संधीबरोबरच, अशा सादरीकरणाचे बारकावे जाणून घेण्याची आणि जोडीला प्रकाशचित्रणाचीही संधी मला वारंवार मिळेल अशी अपेक्षा करून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो. 

दिवस अठ्ठ्याऐंशीवा पान अठ्ठ्याऐंशीवे 

मुलुंड मुंबई 
२९/०३/२०१८