Saturday, 13 December 2025

गोष्ट काश्मीरची - काहीशी माहीत नसलेली

हो, हे  काश्मीर आहे, कलम ३७० हटवण्याच्या आधीचे. 

हो, हे  काश्मीर आहे पण demonetisationच्या ही आधीचे, सप्टेंबर २०१४ च्या पुरानंतर सावरणारे, सन २०१४ ते २०१६ या काळातले.

हो, हे  काश्मीर आहे आणि तिथे बंदुकाही आहेत, पण फक्त सैन्यदलांच्या हातात आणि त्यातून एकही गोळी झाडलेली आपल्याला दिसत नाही. 

हो, हे  काश्मीर आहे जिथल्या युवकांच्या हातात दगड नाही तर पायांखाली football आहे!

हो, हे  काश्मीर आहे आणि ही गोष्ट आहे तिथल्या कदाचित पहिल्या अधिकृत football clubची, Real Kashmir Football Clubची. 

SonyLIV या OTT माध्यमावर Real Kashmir Football Club नावाची आठ भागांची मालिका आहे, जी आपल्याला काश्मीरचे एक वेगळेच चित्र दाखवते जे या आधी कोणत्याही चित्रपट अथवा web मालिकेने कधीही दाखवले नाहीये. श्रीनगरमधील एका दैनिकाच्या कार्यालयात काम करणारा पत्रकार सोहेल मीर याच्या दृष्टिकोनातून ही मालिका आहे. त्या दैनिकला हव्या असणाऱ्या सनसनाटी बातम्या देण्याचा उबग आल्यामुळे सोहेल आपल्या पदाचा राजीनामा देतो तिथून ही मालिका सुरू होते. मोहम्मद झिशान अय्यूब या अभिनेत्याने ही भूमिका ताकदीने वठवली आहे. त्यांचा अत्यंत संयत आणि भूमिकेला, पात्राला पूर्ण न्याय देणारा अभिनय आपल्याला या मालिकेत पाहायला मिळतो. मालिकेच्या कथेनुसार सोहेल RKFCची अधिकृत नोंदणी करण्यासाठी दिल्लीला जातो तो प्रसंग खूपच बोलका आहे. तेथील नोंदणी अधिकारी भारताच्या football संघाबद्दल बोलतो तेव्हा सोहेल त्या अधिकाऱ्याला सांगतो की काश्मीरचे खेळाडू नसतील तर भारताचा football संघ पूर्ण होऊ शकत नाही. आणि इथेच या मालिकेचे वेगळेपण आहे. कोणतीही मोठी संवादबाजी न करता या एका वाक्यात काश्मीर राज्याचे महत्व उत्तम प्रकारे अधोरेखीत केले आहे. या प्रसंगात नोंदणी अधीकारी झालेल्या कलाकाराचा अभिनयही तितकाच सशक्त आहे. एखाद्या कलाकाराच्या अभिनयाची range दिसण्यासाठी सहकलाकारसुद्धा त्याच तोडीचा असावा लागतो असे का म्हणतात ते या प्रसंगात छान दर्शवले आहे. मोहम्मद झिशान अय्यूब यांचा अभिनय पाहायचा असेल तर त्यांच्या सुरवातीच्या काही चित्रपटांपैकी Phantom हा चित्रपट पहा आणि Netflix वरील Scoop ही मालिका पहा. त्यांच्या आवाजात थोडासा husk आहे त्याचा त्यांनी सोहेल मीर ही भूमिका सादर करताना फार छान उपयोग केला आहे. 

सोहेल मीर आणि त्याचा football प्रशिक्षक मित्र मुस्तफा दुराणी मिळून हा RKFC चालू करायचे ठरवतात तेव्हा त्यात आर्थिक गुंतवणूक कोण करणार हा प्रश्न उभा राहतो. त्यासाठी सोहेल श्रीनगरमधील एक व्यावसायिक शिरीष केमु यांची भेट घेतो. मूळचे काश्मीरमधील बरमुल्लाचे असलेले अभिनेते मानव कौल यांनी हे पात्र उत्तम रंगवले आहे. पेशाने केशर व्यापारी असलेला शिरीष मूळचा पंपोरचा रहिवासी आहे पण त्याचे कुटुंबीय अनेक वर्षे बंगळुरू येथे स्थायिक होते असे दाखवले आहे. श्रीनगरमध्ये परत येऊनही लहानपणीच्या काही त्रासदायक आठवणींमुळे शिरीष पुन्हा पंपोरला त्याच्या मूळ घरी जाण्याचे टाळत असे पण तिथे जाण्यासाठी त्याची पत्नी कावेरी त्याला बळ देते आणि तो तिथे, त्याच्या जुन्या घरात जातो. या प्रसंगातला मानव कौल यांचा अभिनय उत्तम झाला आहे. त्यांचे मला आवडलेले काम म्हणजे चित्रपट '१९७१' आणि 'वजीर'. माझ्या मते ही मालिका मानव कौल यांना अजून अनेक संधी देईल.  

अनेक भारतीय चित्रपट आणि web मालिकांमध्ये परदेशी पात्र रंगावणारे अमेरिकी अभिनेते Mark  Bennington यांनी football प्रशिक्षक Duglas Gordon याचे पात्र रंगवले आहे. मालिकेच्या कथेनुसार Duglas स्वत: football खेळाडू होता आणि स्कॉटलंडमधून football प्रशिक्षक म्हणून निवृत्त झालेला होता. RKFCचा स्तर वाढवू शकेल असा आणि काश्मीरमधला नावाजलेला star football खेळाडू असलान शाह आणि प्रशिक्षक मुस्तफा दुराणी यांच्यातील काही जुन्या गैरसमजांमुळे प्रशिक्षक मुस्तफा दुराणी RKFC सोडण्याचा निर्णय घेतो त्यामुळे Duglas Gordon याला प्रशिक्षक नेमले जाते. त्यानंतर Duglas आणि मुस्तफा मिळून RKFCला उत्तम प्रशिक्षण देतात आणि श्रीनगर cantonment बरोबर होणाऱ्या सामन्यात RKFCचा संघ लष्कराच्या संघाविरुद्धचा सामना जिंकतो, इथे ही मालिका संपते. 

गेली अनेक दशके काश्मीरमध्ये चालू असलेला अतिरेकी हिंसाचार आणि त्यामुळे त्रासलेले आणि विस्थापित झालेली लोक पुन्हा तिकडे येऊ इच्छितात, काश्मीरमध्ये आपला व्यवसाय उभा करू पहातात आणि त्यात स्थानिकांना काम देतात हे काश्मीरचे खूप सकारात्मक चित्र या मालिकेत पाहायला मिळते. तेथील युवक कोणाच्याही बहकाव्यात न येता काश्मीर राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या भल्याचा विचार करतात हा मुद्दा या मालिकेत फार सशक्तपणे मांडला आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम खूप छान असतील ही नक्की! काश्मीर आणि तेथील अनेक वर्षे चालू असलेला हिंसाचार याबद्दल अनेक चित्रपट आले, web मालिका आल्या, परंतु त्यांत कधीही पूर्ण सत्य सांगितले गेले नव्हते. त्या दु:खद सत्य घटना या मालिकेतही स्पष्टपणे मांडल्या नाहीयेत आणि तो या मालिकेचा विषयही नाहीये. तरीही काही सूचक प्रसंग आणि संवादांतून त्या सत्य घटना अप्रत्यक्षपणे या मालिकेत मांडल्या आहेत, जे चतुर प्रेक्षकांच्या नक्की ध्यानात येईल. तसंच RKFCच्या संघातल्या खेळाडूंचे काम करणारे तरूण अभिनेते मूळचे काश्मीरमधलेच असावेत हा माझा अंदाज आहे आणि जर तो चूक असेल तर मला तो दुरुस्त करायला आवडेल. 

The Family Man ची तिसरी आवृत्ती आणि धुरंधर चित्रपट पाहून त्रस्त झालेल्या मनांना ही मालिका हळूवार फुंकर घालून काहीतरी छान सकारात्मक कथानक पहिल्याचा आनंद देईल ही अपेक्षा ठेवून हा लेखनाचा उद्योग आजच्यापुरता थांबवतो. 

दिवस तीनशे सत्तेचाळीसवा पान तीनशे सत्तेचाळीसवे

रामकृष्णहरी पांडुरंगहरी वासुदेवहरी 

-चेतन अरविंद आपटे  

विठ्ठलवाडी पुणे 








6 comments:

  1. चेतन सुंदर लेखन... 👌👍🌹🌹🌹

    ReplyDelete
  2. उत्तम परीक्षण

    ReplyDelete
  3. मस्त लिहिले आहे

    ReplyDelete