त्या दिवशी पंतप्रधान झाल्यावर प्रथमच संसद भवनात येताना श्री. नरेंद्र मोदी संसद भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झालेले भारतीय जनतेसोबतच संपूर्ण जगाने पहिले होते. आणि आज नऊ वर्षानंतर तो ऐतिहासिक सेनगोल नवीन संसद भवनात आणण्याआधी त्याच्या समोर साष्टांग नमन करणारे तेच माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी सर्वानी पहिले आहेत! १५ ऑगस्ट १९४७ रोजी सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून भारताच्या पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना शेवटचे व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी हा सेनगोल दिला होता. त्यानंतर अनेक वर्षे तो सेनगोल प्रयगराज येथील संग्रहालयात 'चालताना वापरायची काठी' म्हणून ठेवला गेला होता. त्या सेनगोलचा मान त्याला आज पुन्हा मिळाला! दिल्लीहून अलाहाबादला गेलेला तो सेनगोल प्रयगराजहून दिल्लीला परत आला!
हा सेनगोल हातात घेऊन लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे जाणारे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी एकच वेळेस सम्राट आणि साधू दोन्ही वाटत होते!
नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्याचा आजचा कार्यक्रम नेत्रदीपक झालाच. त्या खेरीज तो सेनगोल, तो राजदंड नवीन संसद भवनात आणण्याआधी त्याच्या समोर साष्टांग नमन करून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय इतिहास आणि सनातन धर्म किती महान आहे याची जगाला जाणीव करून दिली आहे. गेली पंचाहत्तर वर्षे दुर्लक्षित राहिलेला हा सेनगोल त्यांनी मानाने त्याच्या योग्य जागी स्थापित केला.
आणि ती योग्य जागा म्हणजे माननीय लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला! पूर्वी राजे महाराजांच्या सभेत त्यांचे राजदंड सिंहासनाच्या उजवीकडेच असत. नवीन लोकसभा सभागृहात तीच महान परंपरा चालू राहणार आहे, ही वेगळे सांगायला नकोच!
राजदंड त्याच्या योग्य जागी स्थापित केल्यानंतर दिपप्रज्वलन केले ते मेणबत्ती किंवा कड्यापेटीने न करता तेलाच्या दिव्याने केले ते पाहून मन प्रसन्न झाले.
सर्व उपस्थित साधू संत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या महान कार्याला भरभरून आशीर्वाद देत होते ते पाहून काय वाटले ते शब्दांत सांगणे अवघड आहे!
आज भारताचे एक महान रत्न, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४०वी जयंती. या दिवसाचे औचित्य साधून नव्या संसद भावनाचे उद्घाटन आणि लोकार्पण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आणि लोकसभा अध्यक्ष माननीय श्री ओम बिर्ला यांनी स्वातंत्र्यवीरांना मानवंदना तर दिलीच आणि त्यांच्या महान कार्याला आणि अजोड त्यागाला आतापर्यंत पुरेशी न मिळालेली राष्ट्रीय प्रतिष्ठाही मिळवून दिली!
हा सगळा कार्यक्रम बघताना माझ्या जन्म या महान देशात, भारतात झाला आहे याचा सतत अभिमान वाटत होता आणि तो आजन्म राहील! स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे एक वाक्य नेहमीच माझ्या लक्षात राहले आहे:
देहाकडून देवाकडे जाण्याआधी मध्ये देश लागतो आणि आपण त्याचे देणे लागतो!
हे वाक्य आणि त्याचा मातितार्थ कायम माझ्या स्मरणात राहो अशीच प्रार्थना करून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग मी थांबवतो.
जय हिंद!
दिवस एकशे अठ्ठेचाळीसवा
पान एकशे अठ्ठेचाळीसवे
तानाजी मालुसरे रास्ता, पुणे
टीप: या लेखातील सर्व प्रकाशचित्रे ही माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या Narendra Modi या YouTube channel वरील चलचित्रातले मला भावलेले क्षण आहेत. ही प्रकाशचित्रे आणि आणि या YouTube channel वरील चलचित्र यांचे हक्क मूळ प्रकाशक यांच्याकडे सुरकशीत आहेत.