Saturday, 21 June 2025

भय सापळ्यातून मुक्त व्हा, मोह सापळ्यात अडकू नका.

पोपट कसा पकडतात माहीत आहे? खुप साऱ्या छोट्या छोट्या नळ्या एका दोरीत ओवतात, पोपटाला आवडेल असे खाद्य त्या नळ्यांना चिकटवलेले असते. त्याच्या वासाने पोपट तिथे जमा होतात. पोपट उडून येऊन त्यातल्या एखाद्या नळीवर बसला की त्या पोपटच्या वजनाने ती नळी त्यातून ओवलेल्या दोरीभोवती फिरते आणि पोपट त्या नळीला उलटा लटकतो. अशी अवस्था पोपटाने कधीच अनुभवली नसते, त्यामुळे पोपट त्या नळीला आपल्या पायांत घट्ट पकडून ठेवतो आणि लटकलेला राहतो. अशा वेळेला पोपटला भीती वाटते की नळीवरचे पाय सोडले तर तो खाली पडेल आणि दुर्दैवाने अशा विचित्र आणि कधीही न अनुभवलेल्या परिस्थितीमुळे त्याला त्याच्या पंखांमधल्या ताकदीचा, उडण्याच्या ताकदीचा विसर पडलेला असतो. आकाशात स्वच्छंद भराऱ्या घेणारा पोपट अशा प्रकारे पिंजऱ्यात अडकतो! याला म्हणतात भय सापळा!

माकड कसे पडकतात माहीत आहे का? ते एका अरुंद तोंडाच्या बाटलीत माकडाला आवडेल असा खाऊ ठेवलेला असतो आणि ती बाटली झाडाला घट्ट बांधतात. बाटलीची मान इतकी अरुंद असते की माकड हात आत घालून तो खाऊ पकडतो, पण त्यामुळे त्याची मूठ मोठी होते आणि त्या खाऊ सकट त्याचा हात बाहेर येत नाही आणि त्या माकडाला तो खाऊ सोडताही येत नाही. त्यामुळे ते हात सोडत नाही आणि ते माकड पकडले जाते. बाटलीतला खाऊ सोडून दिला तर ते माकड पकडले जाण्यापासून स्वत:ला वाचवू शकते, आणि ते सापळ्यात अडकते, पकडले जाते. हाच मोह सापळा! 

एखादी गोष्ट अथवा वस्तू आपल्याकडे आहे या भावनेने आपल्याला सुरक्षित वाटत असेल आणि, ‘ती गोष्ट अथवा वस्तू आपल्यापासून दूर गेली तर?’ या निव्वळ कल्पनेनेच आपल्याला भय वाटत असेल तर सर्व प्रथम त्या वस्तूचा अथवा गोष्टीचा त्याग करावा. काही काळ अस्वस्थ, निराधार वाटेल. पण अल्पावधीतच साक्षात्कार होऊ शकतो की आपण ज्याला आपली सर्वात मोठी कमजोरी समजत होतो, तीच आपली ताकद आहे! वेगळ्या शब्दांत सांगायचे तर त्या वस्तूचा अथवा गोष्टीचा मोह सोडून दिला पाहिजे कारण तो मोह हीच आपली कमजोरी असू शकते!

कुठले तरी हवे हवेसे वाटणारे क्षण, अनुभव हातातून सुटून जाऊ नये म्हणून ते घट्ट धरून ठेवायाचा प्रयत्न करताना आपल्या भोवती एक कोष तयार करत राहतो, ज्यात आपल्याला सोबत फक्त ते हवे हवेसे वाटणारे क्षण, अनुभव असतात. आणि आपण आपले सामान्य दैनंदीन आयुष्य जगत असतोच, पण ते या कोषात राहूनच. आणि त्यांच्या मुळे आपल्याला एक प्रकारच्या सुखाचा आभास होत राहतो, पण प्रत्यक्षात तो एक कोष नसून आपणच आपल्याच भोवती एक सापळा रचलेला असतो, हाच तो भय सापळा आणि मोह सापळा! ते सुंदर वाटणारे क्षण, अनुभव आपण घट्ट पकडून ठेवतो कारण ते क्षण, अनुभव जर निघून गेले तर काय होईल याला आपण घाबरत असतो. 

अशा वेळी आपल्या खऱ्या क्षमता, आपली खरी ताकद काय आहे याचा विसर पडतो आणि आपण तिथेच तिथेच घुटमळत राहतो. तो पिंजरा, तो सापळा तोडून बाहेर जाण्याचा आपण प्रयत्नही करत नाही! असं कोषात, भयात आणि मोहात अडकून राहण्याचे दुष्परिणाम घडत असतात पण आपले त्याकडे लक्ष जात नाही कारण आपण त्या दुष्परिणामांकडे फार गांभीर्याने पाहत नाही. अशा आभासी जगात राहत असताना काही चांगल्या संधी हातातून सुटून जाऊ शकतात.  
 
एखाद्या भावनेत अथवा विचारात अडकून राहिलं की कधीकधी खूप मोठी घुसमट होते. आणि अन्य चांगले पर्याय समोर असूनही दिसत नाहीत, ते झाकोळलेले आणि त्यामुळे दृष्टीआड राहतात, आणि कदाचित त्या घुसमटीतून बाहेर पडण्याची एखादी मोठी संधी हुकते! म्हणून सर्व प्रथम तो विचार अथवा ती भावना झटकून टाकली पाहिजे आणि अन्य पर्यायांसाठी मनाची कवाडं उघडली पाहिजेत. कोणताही पूर्वग्रह न ठेवता ‘कोरी पाटी’ घेऊन आशा पर्यायांकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. त्यांचा विश्लेषणात्मक विचार करून योग्य वाटतील ते एक अथवा अधिक पर्याय स्वीकारावेत. म्हणजेच भय आणि मोह सापळ्यांमधून मुक्त झाले पाहिजे, तरच आपण स्वच्छंद, मुक्त जीवन जगू शकू. 

थोडक्यात, भय सापळ्यात अडकायचं नाही आणि मोह सापळ्यातून मुक्त व्हायचे. ज्या गोष्टीच्या परिणामांची भीती वाटते तीच गोष्ट करायची, जय गोष्टीचा मोह वाटतो तीच गोष्ट सोडून द्यायची! यासाठी तीन आवश्यकता आहेत. एक, आपल्या स्वत:च्या क्षमतांवर दुर्दम्य विश्वास. दोन, आपण जे काही करतो, आपल्या कृती, ज्यावर आपले स्वत:चे नियंत्रण आहे, त्या सर्वांवर श्रद्धा आणि तीन, आपल्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींबाबत सबुरी. हे सारे आचरणात आणताना आपले लक्ष विचलीत करणारे क्षण नक्कीच येतील आपली वाट अडवायला. थोडा काळ विरंगुळा म्हणून तिकडे पाहण्यात हरकत नसावी पण त्यात गुंतून राहू नये, इंग्रजीत ज्याला to get indulged into  म्हणतात, तसे होऊ नये. म्हणजेच मोह सापळ्यात अडकू नये.

आता हे भय सापळ्यातून मुक्त होणे आणि मोह सापळ्यात न अडकणे यासाठी मला सापडलेला मार्ग म्हणजे ध्यान, ज्याला इंग्रजीत meditation म्हणतात, ते करणे. गेली दीड एक वर्षे, विशेषत: देहूला संत शिरोमणि तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिरात सगळी आसक्ती गळून पडल्यापासून ध्यान करणे बऱ्यापैकी सातत्याने चालू आहे. आणि माझे नशीब थोर म्हणून मला ध्यान करण्याच्या काही विशिष्ट पद्धती ज्ञानी, आध्यात्मिक आणि गुरूतुल्य व्यक्तींकडून शिकायला मिळाल्या. त्या पद्धती आचरणात आणून ध्यान करणे चालू आहे. 

कुठल्याही भयाने ग्रासित न होता, कोणत्याही मोहात न अडकता मला माझा MEP Consultancyचा व्यवसाय प्रामाणिकपणे करता यावा, तो वृद्धिंगत व्हावा ही विठ्ठल चरणी प्रार्थना करून हा लेखनाचा उद्योग आजच्यापुरता थांबवतो. 

रामकृष्णहरी, पांडुरंगहरी, वासुदेवहरी!

-चेतन अरविंद आपटे 
दिवस एकशे त्र्यहत्तरवा पान एकशे त्र्यहत्तरवे
दिनांक २२/०६/२०२५ 
शौर्य दिवस 

Tuesday, 13 May 2025

ती बावीस मिनिटे


कालची संध्याकाळची ती बावीस मिनिटे देशाने आणि जगाने काय पाहिले, काय अनुभवले? माझ्या देशाचे पंतप्रधान, ७५ वर्षांचे तरूण पंतप्रधान देशाला आणि जगाला संबोधत होते. बावीस एप्रिल रोजी सीमेपलिकडल्या दहशतवाद्यांनी केलेल्या नृशंस हत्याकांडाचा बदला घेऊन झाल्यावर, शत्रू राष्ट्राला पुरेशी अद्दल घडवल्यानंतर आणि तिथल्या दहशतवादाच्या कारखान्यांना आपल्या सशस्त्र दलांनी, आपल्या नौदल, वायूदल आणि लष्कराने नष्ट केल्यानंतर ते देशाला आणि जगाला संबोधत होते. त्यांचे भाषण कौशल्य तर ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच भारताने आणि जगाने पाहिले होते. पण काल, दिनांक बारा मे रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जो आवेश, जो जोर होता, तो क्वचितच कधी जनतेसमोर आला होता. 

पहलगामला अनेक भारतीय महिलांचे सौभाग्य अतिरेक्यांनी नष्ट केले, स्त्रियांचे सौभाग्य लेणे, म्हणजे हिंदीत ज्याला मांग का सिंदूर म्हणतात, ते नष्ट केले म्हणूनच भारताने दहशतवादाविरुद्ध केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईला Operation सिंदूर हे नाव माननीय पंतप्रधानांनीच सुचवले असे म्हणतात. आणि या operation सिंदूरची उद्दिष्टे साध्य झाल्यानंतर शस्त्रविरामही केला. पण कालच्या भाषणात त्यांनी देशाला आश्वस्त करण्याबरोबरच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या लोकांना ठणकावून सांगितले की भारतातला कोणताही दहशतवादी हल्ला हा act of war आहे असे समजले जाईल आणि त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले जाईल हा स्पष्ट संदेश दिला! Operation सिंदूर संपले नाहीये, तात्पुरते स्थगित केले आहे, आणि सीमेपालिकडून परत काही कागाळी केली गेली तर तशा कुरापती करणाऱ्यांची खैर केली जाणार नाही हा नि:संदिग्ध इशारा कालच्या भाषणात होता. 

यापूर्वी कोणत्याही देशाच्या प्रमुखाने दहशतवादाला जोपासणाऱ्या लोकांना अशाप्रकारचा संदेश दिल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही. या भाषणातली वाक्ये तरी कशी निवडक होती ते पहा, "Terrorism and talks can not happen simultaneously", "Now the talks will be only about POJK.", "खून और पानी एकसाथ नही बह सकता|", "Operation सिंदूर अब आतंक के खिलाफ भारत की नीती है, new normal है|", "हम हर उस जगह जा कर कठोर से कठोर कारवाई करेंगे जहा से आतंक की जडे निकलती है|" या सगळ्यांबरोबरच शत्रू राष्ट्र अण्वस्त्रे वापरण्याची जी धमकी देत असे त्या धमकीलाही माननीय पंतप्रधान यांनी तितकेच रास्त उत्तर दिले. 

हे भाषण काल सर्वांनीच पहिले ऐकले असेल, त्यामुळे त्याच्या तपशीलात मी जास्त जात नाही. पण दिनांक सहा - सात मे यामधील रात्र ते शस्त्रसंधी होईपर्यंत भारताच्या सशस्त्र दलांनी शत्रू राष्ट्राला जी अद्दल घडवली आहे तशी अद्दल, त्यापेक्षा जास्त कठोर शिक्षा दहशतवाद पोसणाऱ्या सर्वाना भविष्यात होऊ शकते असा दिलासा माननीय पंतप्रधान यांनी भारताच्या भारतात आणि परदेशी राहणाऱ्या सर्व नागरिकांना तर दिलाच, पण तेच शब्द तेच हावभाव शत्रू राष्ट्राला धमकीवजा इशारा होते हे ही भारताने आणि जगाने पहिले, ऐकले आणि अनुभवले! 

कालच्या या बावीस मिनिटांच्या संबोधनानंतर भारतातला प्रत्येक नागरीक आश्वस्त झाला असेल की यापुढे दहशतवादाची आणि दहशतवाद पसरवणाऱ्यांची खैर केली जाणार नाही. हे लोक जिथे कुठे लपून बसले असतील तिथे घुसून त्यांना यमसदनी पाठवले जाईल. 

या operation सिंदूरच्या यशानंतर आणि कालच्या भाषणात माननीय पंतप्रधान यांनी शत्रू राष्ट्राला धमकीवजा इशारा दिल्यानंतर परत शत्रू राष्ट्र काही कागाळी करणारच नाही आणि चुकून केलीच तर या operation सिंदूरचा पुढचा टप्पा शत्रू राष्ट्राला यापेक्षा कठोर शिक्षा करेल अशी अपेक्षा ठेवून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता थांबवतो. 

जय हिंद 

दिवस एकशे तेहेतीसवा पान एकशे तेहेतीसवे 

विठ्ठलवाडी, पुणे  


Wednesday, 1 January 2025

हास्याच्या पुराचा नवा पत्ता : मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी

मुक्काम पोस्ट बर्लिन:

इंग्लंडवर हल्ला करण्याची योजना हिटलर गोबेल्सबरोबर जर्मन भाषेत बोलत ठरवत आहे. आणि अचानक आकाशवाणी होते, "वातावरण निर्मिती छान झाली आहे, आता सर्व पात्रे मराठीतच बोलतील!" मग हिटलर आणि गोबेल्स जर्मन accentमध्ये मराठी बोलू लागताच परत एकदा आकाशवाणी होते, "सर्व पात्रे शुद्ध मराठीतच बोलतील!" मग काय करता? हिटलर आणि गोबेल्स शुद्ध मराठीत बोलत इंग्लंडवरील हल्ल्याची योजना ठरवू लागतात. 

आणि ती योजना जर्मन सैनिकांचे कपडे घातलेले ब्रिटिश हेर phone करून इंग्लंडला कळवतात. 

मुक्काम पोस्ट लंडन:

एक telephone operator जर्मनीवरून आलेला तो call विंस्टन चर्चिलला देतो आणि तिथेही तीच, "मराठीत बोला!" ही आकाशवाणी होते तेव्हा चर्चिल म्हणतो, "माझं नाव आहे ते, त्याचं काय भाषांतर करणार?"

अशा धमाल प्रसंगांनी चालू होतो तो एक भन्नाट चित्रपट म्हणजे आज दिनांक ०१/०१/२०२५ रोजी प्रदर्शित झालेला "मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी." 

प्रशांत दामले, सुनील अभ्यंकर, वैभव मांगले, मनमीत पेम, आनंद इंगळे, अद्वैत दादारकर, गीतांजली कुलकर्णी, दीप्ती लेले, गणेश मयेकर, प्रणव रावराणे, ऋतिका श्रोत्री, राजेश मापूसकर असे दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट दोनच तासांचा असला तरी त्यातल्या अफाट विनोदी प्रसंगांची एक साखळी प्रक्रिया अर्थात chain reaction चित्रपट रसिकांना पुढील दोन दशके तरी नक्कीच हसवत ठेवेल!

आज City Pride कोथरूड इथे चित्रपटातील काही कालवंत उपस्थित होते आणि चित्रपट संपल्यावर ते पडद्यासमोरील मंचावर आले तसा सर्व उपस्थित प्रेक्षकांना सुखद धक्का बसला. त्या सर्वांनी प्रेक्षकांबरोबर संवाद साधला. प्रेक्षकांनीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर ते सर्व कलावंत प्रेक्षकांबरोबर संवाद साधत असताना मी सुनील अभ्यंकर यांना "दिग्या काका!" अशी हाक मारल्यावर त्यांनी चमकून माझ्याकडे पहिले. २०१२ साली प्रदर्शीत झालेली मालिका 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' यात सुनील अभ्यंकर यांनी साकारलेल्या पात्राचे नाव 'दिगंबर काळे' असलं तरी ते दिग्या काका म्हणूनच प्रसिद्ध झाले! त्यांच्याबरोबर एक selfie घेतला. 


सुनील अभ्यंकर यांच्याबरोबर बोलताना नुकताच प्रदर्शित झालेल्या 'आउट हाऊस' या हिन्दी चित्रपटाचाही उल्लेख केला आणि त्यांची त्यातील भूमिकाही आवडली हे त्यांना सांगितले. त्यांच्या भूमिका असलेले एकामागे एक प्रदक्षित झालेल्या दोन्ही चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आवडल्याचे त्यांना सांगून आम्ही त्यांचा निरपो घेतला. 

ही blogpost वाचनाचा उद्योग करणाऱ्या तुम्ही सर्व रसिक हा चित्रपट OTTवर येण्याची वाट न पाहता चित्रपट गृहात जाऊनच बघाल ही अपेक्षा ठेवून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग मी थांबवतो. 

सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या अनेकोत्तम हार्दिक शुभेच्छा!

दिवस पहिला पान पहिले. 

०१/०१/२०२५ 

विठ्ठलवाडी, पुणे 

Saturday, 27 January 2024

आत्म्याचा परमात्म्याबरोबर संवाद - भेटीआधीचा आणि भेटी नंतरचा

भेटीआधीचा संवाद:

तो: गेल्या दोन वर्षांत तीन वेळ आलास आमच्या गावात पण भेटला नाहीस? का रे बाबा? का रूसलायस का माझ्यावर?

मी: रूसलो नाही देवा, तुमचे भक्त कसे रूसतील बरं तुमच्यावर? पण असं म्हणतात ना की तुम्ही बोलावल्याखेरीज भेट होत नाही तुमची? 

तो: इतका जवळ आला होतास ना, तेच बोलावणं होतं रे! भक्त भेटीला येतात ते हवं असतं आम्हालाही. 

मी: क्षमा असावी देवा, मला तुमचे बोलावणे लक्षात आले नाही. एक मर्त्य जीव, तुमचा एक पामर भक्त म्हणून ही माझी चूक तुम्ही पोटात घ्यावी ही हात जोडून विनंती करतो. 

तो: काळजी करू नकोस वत्सा, मी माझ्या भक्तजनांवर चिडत नसतो. तुझ्यासारख्या खऱ्या भक्तांच्या अशा छोट्या चुका आम्ही माफ करत असतो. इतका जवळ येऊनही तू भेटीला आला नाहीस हा काही तुझ्या अपराध नाही. आणि तुला तर माहीतच आहे, शिशुपालचा वध करण्याआधी त्याचे शंभर आपराध माफ केले होते. तेव्हा निश्चिंत रहा. 

मी: हे तुमचे उपकार कसे विसरू शकेन मी, परमेश्वरा? अशीच कृपा दृष्टी असू द्या माझ्यावर आणि तुमच्या सर्व भक्तजनांवर. 

तो: तथास्तु! काय रे, एक विचारू का?

मी: परवानगी का मागताय, देवा? आज्ञा करा, हक्क आहे तो तुमचा!

तो: बरं बरं. मला एक सांग, तुकोबा तुझ्या स्वप्नात आले तसा लगेच वेळ काढून त्यांच्या गावी गेलास, तो कसा काय?

मी: तुमचीच योजना ती, तुम्हीच तुमच्या परम भक्ताला पाठवले असणार माझ्या स्वप्नात. 

तो नुसता हसला!

मी: विठूराया, तुमचे हे स्मितहास्य द्वापर युगात अर्जुनालासुद्धा बुचकळ्यात पाडत होते आणि आज कलियुगात मलाही कोड्यात पाडत आहे! मला हे कळते की सर्वश्रेष्ठ धनुर्धर असलेल्या अर्जुनासोबत माझी काहीच तुलना होऊ शकत नाही. पण तुम्ही आता असे का हसलात ते कळू दे मला. 

तो: येतोयस ना दोन चार दिवसांनी आमच्या गावात? या वेळेस नक्की भेट. तेव्हा कळेल तुला मी आता असा नुसता का हसलो ते. 

मी: होय, यंदा येणारच आणि काहीही झालं तरी या वेळेस तुमचे दर्शन घेणारच! आणि ते निव्वळ मुख दर्शन नसेल, पदस्पर्श दर्शन असेल यासाठी माझा प्रयत्न असेल. 

तो: तथास्तु!

मी: तुकोबा स्वप्नात आले तो दिवस अत्यंत मंतरलेला गेला ही तुम्हाला माहीत आहेच. आणि इंद्रायणी किनाऱ्याच्या त्या भव्य गाथा मंदीरात तुम्ही आणि रखुमाईने मला सर्व ज्ञात, अज्ञात, दृष्य, अदृष्य बंधानांतून मुक्त केलेत, त्यासाठी मी तुमचा सदैव ऋणी राहीन. तो दिव्य आणि दैवी अनुभव अनेक जन्म लक्षात राहील. तीन महीने झाले आता त्या घटनेला आणि तुमचे आणि रखुमाईचे आशीर्वाद माझ्यावर कायम आहेत ही जाणवत आहे मला. ते तसेच राहू देत ही विनंती. 

तो: तथास्तु! ये लवकर, जवळून दर्शन देतो तुला!

मी नि:शब्द!


भेटीनंतरचा संवाद:

सोलापूर आणि पंढरपूर इथली कामे आटोपून मी आणि माझा एक मित्र त्या दिवशी संध्याकाळी सहा नंतर विठ्ठल मंदिरात पोहोचलो. पदस्पर्श दर्शन होईल ही व्यवस्था विठ्ठलानेच आमच्या ग्राहकाच्या संपर्कातील एका व्यक्तीमार्फत करून ठेवली होती. विठोबा जेव्हा त्याच्या खऱ्या भक्ताला भेटीसाठी बोलवतो तेव्हा ती भेट निर्वेध व्हावी याची व्यवस्थासुद्धा तोच करतो, ती ही अशी! अन्य भक्तजणांसोबत मी आणि माझा हा मित्र रांगेतून पुढे सरकत विठोबाच्या समक्ष पोहोचलो आणि............

तो: आलास. प्रवास कसा झाला? कामे झाली का सगळी? 

मी: होय देवा. 

तो: या गावातल्या एका रुग्णालयाचे काम पूर्ण झालेय आणि दुसऱ्या एका रुग्णालयाचे काम चालू आहे ना? झाली आहेत का ती कामे तुला हवी तशी? 

मी: होय देवा. तुम्ही तर परमात्मा आहात, त्यामुळे, 'इथली कामे रुग्णालयाची आहेत आणि त्या कामांच्या गुणवत्तेबाबत मी किती आग्रही आहे हे तुम्हाला कसे माहीत?' हा प्रश्न बिनकामाचा आहे याची कल्पना आहे मला. 

तो: हुशार आहेस. 

मी: तुमचीच कृपा आहे ही!

तो पुन्हा नुसताच हसला!

मी: हे बघा, परत तेच बुचकळ्यात पाडणारे मिश्किल स्मित हास्य! सांगा की देवा, असे का हसलात ते? 

तो: सांगतो, पण त्या आधी एका प्रश्नाचे उत्तर दे. 

मी: विचारा की, देवा. यथा मती उत्तर देईन. 

तो: देहूला साखळ्या तुटून नष्ट होण्याचा जो अनुभव मी तुला दिला, तो इथे पंढरीतसुद्धा येईल असे वाटत होते का रे तुला?

मी: तुमच्याशी खोटे नाही बोलणार. हो, तसा काही अनुभव पुन्हा येईल, यावा असे वाटत होते आतून. 

तो: बाळा, असे दिव्य आणि दैवी अनुभव वारंवार येत नसतात तुम्हा मानवांना. अनेकांना असे अनुभव येतही नाहीत. काहीच नशीबवान लोकांना असे अनुभव येतात, ते ही योग्य वेळीच. तुझ्या बाबतीत तुझे नशीब आणि ती वेळ जुळून येण्याचा योग तीन महिन्यांमागे आला होता म्हणून तुला तो अनुभव आला. त्या आधीही आला नसता आणि नंतरही नाही. 

पुढे ऐक. तुकोबांमार्फत देहूला मी तुला बोलावले त्याची काही कारणे आहेत. साडेसात वर्षे म्हणता म्हणता शनि महाराजांनी तुझी आठ वर्षे परीक्षा घेतली आणि त्या सर्व कठीण काळाला तू किती धीराने सामोरा गेलास ते मी आणि तुझी रखुमाई पाहत होतो आणि अस्वस्थ होत होतो. पण तुझी आंतरिक प्रगती होत होती आणि या कठीण काळातसुद्धा तुझ्यातली सकारात्मकता फक्त टिकून न राहाता, वाढत होती या दोन्ही गोष्टींचा आनंदही होत होता.

हात जोडलेला नतमस्तक मी: शनि महाराज आणि तुमची कृपादृष्टी, दुसरे काही नाही. 

तो: तर तुझ्या या परीक्षेचे गोमटे फळ तुला मिळाले पाहिजे अशी माझी आणि रखुमाईची सुद्धा इच्छा होती. बावीस वर्षांमगे तुझ्या स्वप्नात येऊन आम्ही तुला आमच्या मूळ रूपात दर्शन दिले आणि तू त्या स्वप्नाचा अर्थ शोधत आहेस हेही आम्हाला माहीत होते. पण वत्सा, तुला कल्पना आहे का की, तुझे ते प्रयत्न किती तोकडे होते? त्या स्वप्नात तुला काय संदेश मिळाला हेही तुला नाही कळले!

मी: मला कल्पना आहे त्याची. तरीही, ज्या व्यक्ती मला वेळोवेळी योग्य वाटल्या, त्यांना त्यांना मी ही स्वप्न सांगत होतो, त्याचा अर्थ विचारात होतो आणि मला एकच उत्तर मिळत होते, "भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी तुझ्या आयुष्यात येणार आहेत." पण तुम्हाला सांगतो देवा, या उत्तराने माझे जराही समाधान होत नव्हते. म्हणजे ज्या व्यक्तींना मी या स्वप्नाचा अर्थ विचारला ते सर्व विद्वान आणि आध्यात्मिक वृत्तीचे आहेत आणि त्यांच्या विद्वत्तेबद्दल मला सुईच्या अग्राएवढीही शंका नाही, पण त्यांनी दिलेल्या उत्तराने माझे समाधान होत नव्हते हेच खरे!

तो: तुझा हेतू शुद्ध होता हे माहीत होते मला. पण तुला त्या स्वप्नाचा अर्थ समजावा एवढी तुझी आंतरिक प्रगती झाली नव्हती म्हणून तुला तुझ्या त्या स्वप्नाचा अर्थ लगेच कळला नाही, आम्ही कळू दिला नाही!

पुन्हा हात जोडलेला नि:शब्द मी!

तो: तुम्हा मानवांची अशी आंतरिक प्रगती इतक्या सहज होत नाही रे, बाळा! आणि कलियुगात तर ते खूपच दुरापास्त आहे. पण तू थोडा वेगळा आहेस. 

मी: वेगळा? म्हणजे? 

तो: तुला प्रश्न फार पडतात बाबा! वकील व्हायचास तो अभियंता कसा काय झालास? सांगतो, ऐक. तुझ्या सारखे धनू राशीचे लोक खूप आनंदी जीवन जगतात, खुल्या विचारांचे असतात, तुमचे सर्व कारभार सचोटीचे असतात. इतरांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना त्यांच्या अडचणीत मदत करण्याची तुमची वृत्ती असते. पण तुझा एक गुण म्हणजे स्वत:च्या मर्यादा फार पटकन ओळखतोस तू आणि त्या मर्यादेत राहूनच जशी जमेल तशी इतर लोकांना मदत करतोस. तेव्हा आमच्या मनात विचार आला की तुझ्या मर्यादा कमी कराव्यात आणि तू इतरांना मदत करतोस त्याचा आवाका वाढेल असे काही करावे. 

पुन्हा तसाच हात जोडलेला नि:शब्द नतमस्तक मी विठोबा काय सांगतोय ते फक्त मनोभावे ऐकत होतो. मनात अनेक प्रश्न उपस्थित होत होते. चंद्रभागेच्या निर्मळ पाण्यात बुडून जावे तसाच मी विठोबाच्या वाणीत बुडून गेलो होतो!

तो: तसंच, द्विधा मनस्थिती हा ही धनुराशीचा एक गुण म्हणून ओळखला जातो, तो एक तुझ्यात नाहीये. तू एखादा निर्णय घ्यायला वेळ लावतोस, तुझी द्विधा मनस्थिती निर्णय घेण्यात असते. पण एकदा घेतलेला निर्णय सहजासहजी बदलत नाहीस. हाच तुझा वेगळेपणा आहे. त्यासाठीच, घेतलेला निर्णय निभावून नेण्याची शक्ती तुझ्यात यावी म्हणून मी आणि रखुमाई आमच्या मूळ रूपात तुला स्वप्नात दिसलो होतो. आता परत जेव्हा ध्यान करशील तेव्हा त्या स्वप्नाआधीचा तू आणि नंतरचा तू, हा फरक स्वत:साठीच आठवून पहा एकदा. 

मी: होय देवा, आजच हा प्रयत्न करतो. पण तरीही सर्व ज्ञात, अज्ञात, दृष्य, अदृष्य बंधने नष्ट व्हावीत यासाठी बावीस वर्षे हा खूप मोठा काळ नाही का? 

तो: यालाही तेच उत्तर आहे, जे मगाशी संगितले, वेळ आणि नशीब जुळून येणे! ध्यान धारणा हा वैश्विक शक्तीबरोबर संपर्क करण्याचा मार्ग आहे ही जेव्हा तुला कळले तशी तुझी आंतरिक प्रगती होत गेली आणि त्याकडे आमचे लक्ष होते. पण या ध्यानधाराणेद्वारे तुझ्या कामातल्या तांत्रिक प्रश्नांची उत्तरे तुला मिळणे या पलीकडे तुझी प्रगती झाली नाही, कारण ध्यानधाराणेत सातत्य नसणे. आता वेळ आणि नशीब जुळून येणे म्हणजे काय, तर तुकोबा तुझ्या स्वप्नात येण्याच्या काही काळ आधी तुझे ध्यान करण्यातले सातत्य जरा वाढले होते त्यामुळे तू बंधमुक्त होण्याची वेळ जवळ येत होती. इंद्रायणीच्या पूर्व किनाऱ्यावरच्या त्या पूर्वाभिमुख गाथा मंदिराचे उद्घाटन तू तिथे आलास त्याच्या एक सव्वा वर्ष आधीच होणे आणि त्या मंदिरातल्या आमच्या मूर्तीची रूपे ही तुझ्या जुन्या स्वप्नातल्या आमच्या मूळ रूपांसारखी असणे ही तुझे नशीब. समजले का आता?

मी: समजले विठूराया, समजले! 

तो: आता कळले का, मी कधी कधी नुसते स्मित हास्य का करतो ते?

मी: होय पांडुरंगा. 

तो: पुन्हा माझी भेट घ्यावीशी वाटली तर इंद्रयाणीकाठी किंवा तिची मोठी बहीण असलेल्या चंद्रभागेकाठी कधी जाता येईल याची वाट पाहू नकोस. माझे वास्तव्य तुझ्याच गावात, भीमा आणि इंद्रायणी यांची सगळ्यात धाकटी बहीण असलेल्या मुठा नदीकिनारीसुद्धा आहे. तिथे येऊन भेट. 

मी: तुम्ही तर चराचरांत आहात, देवा. आणि आता तुमची अजून एक जागा म्हणजे माझे हृदय. यापुढे जेव्हा तुमच्याबरोबर संवाद साधावासा वाटेल तेव्हा शांत बसून फक्त माझ्या हृदयची स्पंदने ऐकत राहीन!

तो: यशवंत हो, धनवान हो, कीर्तीवंत हो. 

मी: पांडूरंगहरी, रामकृष्णहरी....................


दिवस सत्तावीसवा पान सत्तावीसवे 

दिनांक २७ जानेवारी २०२४. 

विठ्ठलवाडी, पुणे!

Sunday, 15 October 2023

दोन सुंदर स्वप्नांचा मला उमजलेला एकच अर्थ

गेले काही दिवस फारच भारावलेले गेले आहेत, जात आहेत. त्याचं असं झालं की, चार दिवसांमागे स्वप्नात संत तुकाराम महाराज दिसले आणि तो दिवस एकदम मंतरलेला गेला. मी रोज पहाटे पावणे पाच, पाच वाजता उठतो तसा त्या दिवशीही उठलो पण गजराच्या आवाजाने नाही तर स्वप्नात झालेल्या संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनानेच, गजर होण्याच्या काही सेकंद आधीच! मी कुठेतरी जात आहे आणि तुकाराम महाराज बाजूने चालत गेले. एवढेच ते अर्ध्या ते एक सेकंदाचे स्वप्न! तेच पांढरे पागोटे, हातात चिपळ्या, गळ्यात वीणा अडकवलेली आणि अंगावर पांढरा सदरा, आपण चित्रात त्यांचा जो वेष पाहतो तोच वेष. मी ज्या दिशेने आलो त्या दिशेला माझ्या उजव्या बाजूने चालत ते गेले. एवढेच ते दृष्य. पण ते आयुष्यभर लक्षात राहील. स्वप्न असूनही कायम सत्यवत वाटत राहील! 

या स्वप्नाने जाग येऊन झोपेतून उठलो तेव्हा माझ्या मुलगा त्याच्या कामाचा ठिकाणी जायच्या तयारीत होता. हे स्वप्न सगळ्यात आधी त्याला सांगितले तेव्हा तो ही एकदम आनंदला! नंतर काही वेळाने समाज माध्यमातील माझ्या खात्यावर "स्वप्नात संत तुकाराम महाराज दिसले!" असं लिहिलं आणि कामाला लागलो! जागा असलो तरीही मी त्या स्वप्नातून बाहेर आलेलो नव्हतो. त्या दिवशी नेहमी प्रमाणे दिवसभर काम चालू होते पण एक बाजूला या स्वप्नाचेच विचार चालू होते. काय अर्थ असेल या स्वप्नाचा? संत तुकाराम महाराजच का दिसले असतील? संत ज्ञानेश्वर महाराज किंवा अन्य कोणी संत पुरुष का नाही आले स्वप्नात? हे प्रश्न पिच्छा पुरवू लागले होते. पण एक खात्री नक्की होती की काही तरी दिव्य आणि माझ्या कल्पनाक्षमतेपेक्षा मोठा असा या स्वप्नाचा अर्थ असणार आणि माझ्या हिताचीच काहीतरी गोष्ट यात अभिप्रेत असणार. तेव्हा ठरवलं की येत्या शनिवारी (म्हणजे काल) देहूला जाऊन संत तुकाराम महराजांच्या मंदीरात जाऊन यायचे, मनोभावे त्यांचे दर्शन घ्यायचे. हे ठरवल्यानंतर कामावर चित्त केंद्रित होऊ शकले. 

साधारणपणे १९८१-८२ साली, तिसरीत असताना बहुतेक, शाळेच्या सहलीनिमित्त देहूला आलो होतो. त्यानंतर काल गेलो तिथे. कधी प्रसंगच आला नाही तसा मधल्या चाळीस वर्षांत! गाडीची चावी फिरवली आणि मी, माझी पत्नी आणि मुलगा, आम्ही देहूच्या दिशेने जाऊ लागलो. पुणे मुंबई महामार्ग सोडून गाडी देहू छावणीच्या दिशेला लागली तसे पुन्हा चार दिवसांमागच्या त्या स्वप्नाचे विचार सुरू झाले. गाडी चालवण्यातले लक्ष दूर होत आहे का असे वाटण्याइतके ते विचार प्रबळ होते. पण संत तुकाराम महाराजांच्या कृपा दृष्टीमुळे काही बाका प्रसंग आला नाही आणि आम्ही चौघेही, आम्ही तीन सजीव आणि चौथी म्हणजे निर्जीव असूनही माझं दुसरं प्रेम असलेली माझी लाडकी शेव्हि सेल, व्यवस्थित देहूला पोहोचलो. आपल्याला माहीत आहेच की तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले होते, त्यामुळे त्यांचे समाधी मंदीर तिथे नाहीये! देहू गावात संत तुकाराम महाराजांची दोन मंदिरे आहेत. एक म्हणजे मुख्य मंदीर आणि नव्याने बांधलेले गाथा मंदीर. आम्ही गाथा मंदीरात आधी गेलो. 

संत तुकाराम महाराज गाथा मंदीर 

कडक उन्हात तापलेल्या फरशांवरून अनवाणी चालत जाण्याची तपश्चर्या केल्याशिवाय तुकाराम महाराजांच्या भव्य मूर्तीचे दर्शन होत नाही. हातात वीणा आणि चिपळ्या घेतलेल्या त्यांच्या त्याच परीचीत रूपातली ती पंधरा अठरा फुट उंचीची विशाल बैठी मूर्ती एका नजरेत बसणे अशक्यच आहे! त्या मूर्तीपेक्षा भव्य असलेले संत तुकाराम महाराजांचे कार्य आठवून मी आपसूकच नतमस्तक झालो. हात जोडून डोळे मिटून त्या नतमस्तक अवस्थेत मी किती वेळ तिथे उभा होतो मला काहीच कल्पना नाही. मनात फक्त 'विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल' हा जप चालू होता. तिथे आलेल्या अन्य भक्त मंडळींचे बोलण्याचे आवाज कानावर पडत तर होते पण मला विचलित करू शकत नव्हते. बराच वेळ तसा उभा राहिल्यानंतर जसा आपसूक नतमस्तक झालो होतो तसाच आपसूकच त्या अर्ध ध्यानस्त अवस्थेतून बाहेर आलो आणि त्या गाथा मंदीरतील दालने पाहू लागलो. 

लडिवाळ वळणे घेत जाणाऱ्या आणि भीमा नदीला भेटायला आतूर असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रवाहाचा देहू गावातला जवळ जवळ पाऊण किलोमीटर लांबीचा भाग उत्तर प्रवाही आहे, म्हणजे नदीचा प्रवाह उत्तर दिशेला आहे. त्या भागाच्या पूर्व किनाऱ्यावर हे भव्य पूर्वाभिमुख गाथा मंदीर उभरलेले आहे. आठ दिशांना आठ दुमजली दालने असलेल्या या गाथा मंदीरात संत तुकाराम महाराजांच्या सर्व गाथा, सर्व अभंग सांगमरवरावर कोरलेले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या सर्व गाथा एका मोठ्या दगडाला बांधून पाण्यात बुडवल्या होत्या जेणेकरून त्या पुन्हा तरंगून वर येणार नाहीत, आणि तरीही काही दिवसानंतर त्या सर्व गाथा पाण्यावर आल्या होत्या ही कथा सर्वाना माहीत आहेच. हाच धागा पकडून, संत तुकाराम महाराजांच्या सर्व गाथा कायम स्वरूपी दगडावरच कोरलेल्या असाव्यात या भावनेने आणि हेतूने त्यांचे सर्व गाथा आणि अभंग कोरलेले सांगमरवरी पाषाण तिथे लावलेले आहेत. जोडीला काही प्रसंगचित्रे आणि त्या प्रसंगाशी संबंधीत गाथा/ओव्या त्या चित्राखाली लिहिलेल्या आहेत, अशी एकंदरीत या मंदिराची मांडणी आहे. 

तळ मजल्यावरची आठही दलाने पाहून आम्ही तिघे पहिल्या मजल्यावर गेलो. तिथली दालने पाहताना माझी नजर विठोबा राखुमाईच्या मूर्तीकडे गेली. आणि बावीस वर्षांमागे दिसलेल्या अशाच एक सुंदर स्वप्नाच्या आठवणीने माझे डोळे एकदम चमकले! पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावरच्या एका चौकात मी उभा राहून मी आकाशाकडे पाहत आहे. असंख्य ताऱ्यांनी गच्च भरलेल्या त्या रात्रीच्या आकाशात दोन अती प्रकाशमान तारे प्रचंड वेगाने आणि खूप मोठा, विमानासारखा आवाज करत वायव्य दिशेकडून आग्नेय दिशेकडे गेले आणि त्याच स्वप्नाच्या पुढच्या दृश्यात मुंबईत दादर येथील आमच्या घरच्या समोरच्या पाच मजली इमारतीच्या गच्चीवर भगवान श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी देवी यांचे अति विराट रूप त्या स्वप्नात दिसले होते. इसवीसन २००२ च्या जानेवारीत जेव्हा हे दीड सेकंदाचे स्वप्न दिसले तेव्हापासून मी या स्वप्नाचा अर्थ शोधत होतो तो कदाचित काल कळला! त्या जुन्या स्वप्नात भगवान श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी देवी यांचे जे रूप दिसले त्याच रुपातल्या विठोबा आणि राखुमाईच्या या मूर्तीकडे मी बऱ्याच वेळ एक टक पाहत होतो. आणि पुन्हा डोळे मिटून नतमस्तक अवस्थेत हात जोडून त्या मूर्तीद्वयासमोर उभा होतो. मनात पुन्हा 'विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल' हा जप चालू होता. कसल्या तरी अदृष्य बंधनाच्या साखळ्या माझ्यापासून तुटून दूर जात नष्ट होत आहेत आणि मी एकदम मोकळा, एकदम हलका होत आहे आहे असा अनुभव घेत मी तिथे निश्चल उभा होतो. अचानक उर आणि डोळे भरून आले. डोळ्यांतून वाहणाऱ्या पाण्याला कसलेही बंधन मान्य नव्हते! आईच्या उदरतून बाहेर आल्यानंतरचे बाळाचे अश्रू जेवढे पवित्र असतात तेवढेच पवित्र हे अश्रूही होते! अशा अवस्थेतच एक हलकासा हुंदका आला आणि मी भानावर आलो. त्या पूर्वाभिमुख मूर्तीद्वयासमोरच्या एका छोट्या कट्ट्यावर बऱ्याच वेळ बसून होतो. मनात कसलाही विचार नव्हता आणि मी फक्त त्या दोन्ही सुंदर स्वप्नांचा एकमेकांशी आणि माझ्या आयुष्याशी असलेला संबंध शोधण्याचा प्रयत्न करत होतो! समाज माध्यमावरील माझ्या खात्यावर "स्वप्नात संत तुकाराम महाराज दिसले!" हे लिहिले होते त्यावर बाबांच्या एक मित्राची आलेली टिप्पणी मात्र त्या वेळेला प्रकर्षाने आठवली.

बऱ्याच वेळ तसंच बसून झाल्यानंतर वरच्या मजल्यावरची अन्य दालने पाहून आम्ही तिघेही तळ मजल्यावर आलो आणि मी पुन्हा संत तुकाराम महाराजांच्या त्या भव्य मूर्तीसमोर नतमस्तक होऊन हात जोडून उभा राहिलो, थोडा वेळ सभा मंडपाच्या कट्ट्यावर आम्ही तिघेही बसलो आणि गाडीच्या दिशेने गेलो. नंतर मुख्य मंदिरात जाऊन संत तुकाराम महाराज यांच्या पाषाण मूर्तीचे दर्शन घेऊन गाडीत बसलो आणि पुण्याच्या दिशेने निघालो. गाडी चालवताना माझे लक्ष रस्त्यावरच असले तरीही गाडीत माझ्याबरोबर असेलेल्या सहप्रवाशांबरोबर मी बोलत असतो. पण या परतीच्या प्रवासात मी गप्पच होतो आणि त्या आधीचे काही तास पुन्हा जगण्याचा प्रयत्न करत होतो.

या सर्व घटना अनुभवल्यानंतर मला माझ्यातच काही बदल जाणवत आहेत. नेहेमीपेक्षा थोडी जास्त सकारात्मकता जाणवत आहे हा एक शब्दांत मांडण्यासारखा बदल आहे. पण इतर बदल कदाचित खूप सूक्ष्म आहेत म्हणून प्रकर्षाने जाणवत नाहीयेत. पण मला खात्री आहे की हे न जाणवणारे छोटे छोटे सूक्ष्म बदल कदाचित एखादा मोठा, दृष्य बदल माझ्यात घडवतील आणि मला त्या दिवसाची प्रतीक्षा असेल!

बावीस वर्षांमागे दिसलेल्या त्या सुंदर स्वप्नाचा अर्थ शोधण्याचे मी माझ्यापुरते तरी थांबवून हा लेखनाचा उद्योग आजच्या पुरता पूर्ण करतो. 

--चेतन अरविंद आपटे 
नरवीर तानाजी मालुसरे रस्ता, पुणे 
घटस्थापना, आश्विन शुद्ध प्रतिपदा
दिनांक १५/१०/२०२३. 
दिवस दोनशे अठ्ठ्याऐंशीवा पान दोनशे अठ्ठ्याऐंशीवे

Sunday, 28 May 2023

राष्ट्र निर्माण करण्याकडे अजून एक पाऊल



दिनांक २६ मे २०१४ आणि आज दिनांक २८ मे २०२३. तेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त दोन वेगळी संसद भवने !

त्या दिवशी पंतप्रधान झाल्यावर प्रथमच संसद भवनात येताना श्री. नरेंद्र मोदी संसद भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झालेले भारतीय जनतेसोबतच संपूर्ण जगाने पहिले होते. आणि आज नऊ वर्षानंतर तो ऐतिहासिक सेनगोल नवीन संसद भवनात आणण्याआधी त्याच्या समोर साष्टांग नमन करणारे तेच माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी सर्वानी पहिले आहेत! १५ ऑगस्ट १९४७ रोजी सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून भारताच्या पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना शेवटचे व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी हा सेनगोल दिला होता. त्यानंतर अनेक वर्षे तो सेनगोल प्रयगराज येथील संग्रहालयात 'चालताना वापरायची काठी' म्हणून ठेवला गेला होता. त्या सेनगोलचा मान त्याला आज पुन्हा मिळाला! दिल्लीहून अलाहाबादला गेलेला तो सेनगोल प्रयगराजहून दिल्लीला परत आला!



हा सेनगोल हातात घेऊन लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे जाणारे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी एकच वेळेस सम्राट आणि साधू दोन्ही वाटत होते!

नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्याचा आजचा कार्यक्रम नेत्रदीपक झालाच. त्या खेरीज तो सेनगोल, तो राजदंड नवीन संसद भवनात आणण्याआधी त्याच्या समोर साष्टांग नमन करून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय इतिहास आणि सनातन धर्म किती महान आहे याची जगाला जाणीव करून दिली आहे. गेली पंचाहत्तर वर्षे दुर्लक्षित राहिलेला हा सेनगोल त्यांनी मानाने त्याच्या योग्य जागी स्थापित केला. 


आणि ती योग्य जागा म्हणजे माननीय लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला! पूर्वी राजे महाराजांच्या सभेत त्यांचे राजदंड सिंहासनाच्या उजवीकडेच असत. नवीन लोकसभा सभागृहात तीच महान परंपरा चालू राहणार आहे, ही वेगळे सांगायला नकोच!



राजदंड त्याच्या योग्य जागी स्थापित केल्यानंतर दिपप्रज्वलन केले ते मेणबत्ती किंवा कड्यापेटीने न करता तेलाच्या दिव्याने केले ते पाहून मन प्रसन्न झाले. 



सर्व उपस्थित साधू संत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या महान कार्याला भरभरून आशीर्वाद  देत होते ते पाहून काय वाटले ते शब्दांत सांगणे अवघड आहे! 

आज भारताचे एक महान रत्न, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४०वी जयंती. या दिवसाचे औचित्य साधून नव्या संसद भावनाचे उद्घाटन आणि लोकार्पण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आणि लोकसभा अध्यक्ष माननीय श्री ओम बिर्ला यांनी स्वातंत्र्यवीरांना मानवंदना तर दिलीच आणि त्यांच्या महान कार्याला आणि अजोड त्यागाला आतापर्यंत पुरेशी न मिळालेली राष्ट्रीय प्रतिष्ठाही मिळवून दिली! 

हा सगळा कार्यक्रम बघताना माझ्या जन्म या महान देशात, भारतात झाला आहे याचा सतत अभिमान वाटत होता आणि तो आजन्म राहील! स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे एक वाक्य नेहमीच माझ्या लक्षात राहले आहे:

देहाकडून देवाकडे जाण्याआधी मध्ये देश लागतो आणि आपण त्याचे देणे लागतो!
 
हे वाक्य आणि त्याचा मातितार्थ कायम माझ्या स्मरणात राहो अशीच प्रार्थना करून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग मी थांबवतो. 

जय हिंद!

दिवस एकशे अठ्ठेचाळीसवा
पान एकशे अठ्ठेचाळीसवे

तानाजी मालुसरे रास्ता, पुणे

टीप: या लेखातील सर्व प्रकाशचित्रे ही माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या Narendra Modi या YouTube channel वरील चलचित्रातले मला भावलेले क्षण आहेत. ही प्रकाशचित्रे आणि आणि या YouTube channel वरील चलचित्र यांचे हक्क मूळ प्रकाशक यांच्याकडे सुरकशीत आहेत. 

Thursday, 30 March 2023

राम जन्मला ग, सखे राम जन्मला!

|| जय श्री राम ||

त्रेता युगात तुम्हाला १४ वर्षे वनवास भोगावा लागला. कलियुगातही तुमची वनवासातून सुटका झाली नाही, चांगला काही शतके लांबला तुमचा वनवास! 

तुम्हाला होत असलेल्या या वनवासाचा त्रास भारतीय जनतेलाही होत होता. जनतेला होणारा हा त्रास नाहीसा करण्यासाठी साधारणपणे नऊ वर्षांमागे तुम्ही एक साधूला भारतवर्षावर राज्य करण्यासाठी पाठवलेत आणि तुमचा हा काही शतके लांबलेला वनवास कायमचा संपवायचा त्या साधूने पण केला! त्यासाठी सर्व सनदशीर आणि कायद्याचे मार्ग त्या साधूने अवलंबिले. या कार्यात भारतवर्षाच्या एक अब्ज पेक्षा जास्त जनतेने त्या साधूला भरभरून साथ दिली. यथा मती, यथा शक्ती आर्थिक आणि अन्य प्रकारची मदत जनतेने त्या साधूला केली, कदाचित अजूनही करत आहेत. सुदैवाने मलाही माझा खारीच वाटा त्यात देता आला.

तुमच्या जन्मस्थानी तुमचे भव्य मंदिर बांधून उभे करणे हाच त्या साधूने केलेला पण! संपूर्ण जग जेव्हा एका नव्या आणि म्हणूनच दुर्धर आजाराशी लढत होते तेव्हा या साधूने भारतवर्षावर या आजारचा कमीतकमी परिणाम होईल याची काळजी आणि दक्षता घेतलीच, शिवाय त्या जोडीला तुमच्या या भव्य मंदिराच्या जागेवर भूमीपूजन करून मंदिराची पायभरणीही केली. त्या तशा अवघड वेळी होणाऱ्या विरोधाचा जास्त विचार न करता, त्या साधूने हे भूमीपूजन आणि पायाभरणीचे कार्य तडीस नेले. तुमचे आशीर्वाद आणि भारतवर्षाच्या एक अब्ज पेक्षा जास्त जनतेची साथ या जोरावर त्या साधूने तुमचे मंदिर बांधण्याचे कार्य चालू केले, जे लवकरच पूर्णत्वास जाईल.

पुढील वर्षी याच दिवशी त्या नवीन भव्य मंदिरात तुमचे आगमन होईल अशाप्रकारे मंदिर बांधण्याचे काम चालू आहे असे सांगितले जात आहे. अशा प्रकारे तुमचा कधी शतके लांबलेलला हा वनवास कायमचा संपेल, आणि भारतीय जनताही आनंदी होईल. अयोध्येतले ते भव्य मंदिर म्हणजे सर्व भारतीयांच्या आस्थेचे आणि तुमच्या प्रति असलेल्या श्रद्धेचे प्रतीक असेलच आणि सनातन धर्माचे अधिष्ठान असेल असेही सांगितले जात आहे. मला विश्वास आहे की तिथे येऊन मला तुमचे दर्शन घेता येईल तशी अशा बाळगूनच हा लेखनाचा उद्योग सध्या थांबवतो. 

रामनवमी दिनांक ३०/०३/२०२३

-चेतन अरविंद आपटे 

दिवस एकोणनव्वदावा

पान एकोणनव्वदावे 

नरवीर तानाजी मालुसरे रस्ता, पुणे