Monday, 13 March 2017

दोन लग्नांची गोष्ट

ही "दोन लग्नांची गोष्ट" वाचण्याआधी कृपया हे थोडं मनोगत वाचा:
या कथेचा काळ म्हणजे व्याकरणात आपण ज्याला "काळ" म्हणतो तो चालू वर्तमान काळ आहे, जो वाचताना खटकतोय हे मान्य आहे. ही कथा मी जुलै १९९९ मधे लिहिली होती, स्वत:साठीच. कुठेही प्रसिद्ध करण्यासाठी नाही. यावर्षी blogging चालू केल्यावर मग पहिल्यांदाच internetवर आणली. त्यामुळे तेव्हा लिहिली होती तशीच इथे आणली, तिचा "काळ" न बदलता. त्याबद्दल कथा लेखन या ब्लॉगमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. तेव्हा विनंती ही आहे की वाचायला विचित्र वाटत असली तरी पुर्ण वाचून आस्वाद घ्यावा. या कथेची सुधारित आवृत्ती लवकरच आणेन ब्लॉगवर ही खात्री बाळगावी.
---------------------

भेटा समीरला. समीर साठे, आपल्या कथेचा नायक. आज त्याचे वय असेल २६-२७ च्या जवळपास. त्यांच्या घरातला तो तिसर्‍या पिढीचा सिव्हील इंजिनीअर आहे. बी. ई.सिव्हीलनंतर लगेचच तो त्याच्या पपांना त्यांच्या व्यवसायात मदत करू लागतो, पोस्ट ग्रॅज्युअेशनचे विचार करत.
समीर एम. ई. साठी अप्लाय करायच्या तयारीत असताना “एम. बी. ए. कर!” असे त्याची एक मैत्रिण त्याला सांगते आणि ते त्याला पटते. समीर लगेचच एम. बी. ए. एन्टरंसच्या अभ्यासाला लगतो, एक नामांकित क्लासही लावतो. समीरचे आयुष्य बदलणारा हा पहिला टप्पा! समीरच्या पटकन इनिशिएटिव्ह न घेण्याच्या वृत्तीला आळा बसू लागतो तो या क्लासमुळे. आणि ‘समर ट्रेनिंग’मध्ये ही वृत्ती त्याची पूर्ण रजा घेते. तिथल्या समीरच्या प्रोजेक्टमुळे त्याच्या मॅनेजरला प्रमोशन मिळते आणि तो त्याला जॉब ऑफर करतो, एक वर्ष थांबायच्या तयारीने.

पण एम. बी. ए. झाल्यावर समीर परत व्यवसायात लक्ष घालू लागतो. म्हणजे गेल्या २ वर्षांत त्याचे दुर्लक्ष झाले नव्हते व्यवसायाकडे, अभ्यास सांभाळून जमेल तशी कामे बघीतली होती त्याने आणि त्याच्या पपांनीही काही हरकत घेतली नव्हती. आता समीर त्याच्या पपांच्या कंपनीचा मोठा 'असेट' झाला आहे. त्याच्या एम. बी. ए. च्या ज्ञानाचा उपयोग करून घेत  व्यवसाय वृद्धीचा विचार करू लागतो, कम्प्युटराईज्ड डिझाईन्स जनरेट करू लागतो. सर्व कामांचा अप टू डेट डाटाबेसही करतो. आणि, “पपा, तुम्ही आता साईटवर जायचे नाही, फक्त ऑफिस सांभाळायचे! वाटल्यास तुम्ही आणि आई दिदीकडे जाऊन या अमेरीकेला!” असे एक ‘सजेशन’ देतो. त्यावर समीरची आई त्याला म्हणते, “हो, पण त्या आधी तू आम्हाला एक सून आण, म्हणजे आम्ही निर्धास्तपणे अमेरीकेला जायला मोकळे!”

समीर ही जबाबदारी आईवरच टाकतो. एका वधू-वर सुचक मंडळात समीरचे नाव रजिस्टर केले जाते. या ‘मिलन’ मंडळातून समीरला बरीच ‘स्थळं’ येतात. पण त्याला एकही मुलगी पसंत पडत नाही. एकीचे शिक्षण पूर्ण व्हायचे असते म्हणून तर अजून कोणी त्याच्यापेक्षा खुप लहान असते म्हणून. आणि काहीच न घडता ‘कांदे-पोह्यां’चे बरेच कार्यक्रम होतात.

अशाप्रकारे २-३ महिने जातात आणि समीरला ‘स्वाती जोशी’ आवडते. त्याच्या मते ‘साठेंच्या घरात फिट्ट बसणारी!’ त्या रविवारी साठेंच्याकडचे सारे जोशींकडे जायचे ठरवतात. प्राथमिक भेट झालेली असतेच, आता सगळे जमलेले असतात ते पुढील गोष्टी ठरविण्यासाठी आणि समीर-स्वातीला मोकळेपणे बोलता यावे म्हणून. स्वातीच्या घरी दोघांचे आई-बाबा आणि स्वातीचे आजोबा अशी ‘बैठक’ चालू असते. इकडे स्वाती आणि समीर टेरेसवर गेलेले असतात. स्वातीचे गप्प, खिन्न असणे समीरच्या नजरेतून सुटलेले नाहीये, जोशी मंडळी साठेंच्याकडे आलेले असताना आणि आजही. गच्चीतल्या मोकळेपणात स्वातीलाही मोकळे वाटू लागते आणि ती लहान मुलीसारखी बोलू लागते...

गेल्या वर्षी एम. बी. ए. झाल्यावर एका सुप्रसिद्ध कंप्युटर ट्रेनिंग इंस्टिटिटयुट मध्ये ती काउन्सेलर म्हणून जॉईन झालेली असते. जॉब कसा मिळाला? आय. टी. ट्रेनिंगमध्ये ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स किती वगैरे सांगताना ती थकत नाही. समीरचा ‘होकार’ ठरलाच असतो जवळ जवळ. पण सुशांतने, स्वातीच्या भावाने आणून दिलेली कॉफी पिताना ती एकदम गंभीर होते. समीर तिला काही विचारणार तेवढयात तिच त्याला धक्का देते, “मी तुला पसंत नाहिये म्हणून सांग, या लग्नाला नकार दे!” “काय? काय म्हणालीस?” समीरला भानावर यायला थोडा वेळ लागतो. “होय, तुला हे लग्न करायचे नाहीये असे सांग!” स्वाती एव्हाना रडायलाच टेकली आहे. तिला धड बोलताही येत नाहीये. हे सारे अनपेक्षीत असूनही समीर तिला शांत करायचा प्रयत्न करत आहे, “बस झोपाळयावर आणि सांग मला नीट सगळा प्रकार.”

“माझ्या मनाविरुद्ध हे लग्न ठरवले जात आहे,” स्वातीला जरा आश्वस्त वाटू लागले आहे. ‘असा चान्स परत कदाचित येणार नाही’ हा विचार करून ती मन मोकळे करू लागते, “समीर, माझं शशांकवर प्रेम आहे, त्याचंही आहे माझ्यावर. आणि हे बाबांना माहीत असूनही ते माझं लग्न ठरवत आहेत,” तिलाही कळत नाही तिच्यामध्ये एवढे धाडस कुठून आले! “हा शशांक कोण?” समीरच्या शंका संपल्या नाहीयेत अजून. “शशांक आणि मी एम. बी. ए. ला एकत्र होतो. त्याचे नाव शशांक आपटे.” समीरला काहीतरी आठवू लागले आहे, ‘शशांक आपटे म्हणजे संजूचा धाकटा भाऊ तर नव्हे?’ इकडे स्वातीचे शब्द निसटून जात आहेत, “कॉलेजमध्ये एकदम प्रवेश घेतल्यामुळे आमचे रोल नंबर्स लागून आले. म्हणून आमच्या असाइनमेंटस्, प्रेझेंटेशन्स् एकत्रच होत असत. साहजिकच फक्त फॉर्मल संबंध ठेवणे शक्यच नव्हते. आम्ही कधी एकमेकांत गुंतत गेलो कळालेच नाही. फर्स्ट इयर संपेपर्यंत आम्हालाच कल्पना नव्हती की आमचे एकमेकांवर प्रेम जडले आहे. समर ट्रेनिंगचे दोन महीने शशांक जेव्हा मुंबईला होता तेव्हा त्याचे पुण्यात नसणे मला खायला उठायचे. त्याने त्याचा इमेल आयडी, फोन नंबर काहीच न दिल्यामुळे मीही त्याच्याशी संपर्क साधू शकले नाही आणि त्या काळात त्यानेही कॉन्टॅक्ट केला नाही समहाऊ. स्वाती समीरला हे सगळे सांगेपर्यंत कॉफी गार होते, तशीच ते दोघे कॉफी पिऊ लागतात. कॉफी पित स्वाती पुढे बोलू लागते. आता तिला खुपच छान मोकळे वाटू लागले आहे, “समर ट्रेनिंग संपत आल्यावर मी ठरवले की, परत कॉलेज सुरू झाल्यावर शशांकला लग्नाबद्दल विचारायचे! पण त्याला प्रोजेक्ट संपवायला जास्त दिवस लागले आणि तो पुण्याला पंधरा दिवस उशीरा आला. आल्या दिवशीच त्याने ‘वैशाली’त नेऊन मला लग्नाची मागणी घातली, आणि मीही लगेचच ‘होकार’ दिल्यामुळे त्याचा आधीचाच आनंदी चेहरा आणखीनच फुलला. कारण त्याच्या प्रोजेक्टच्याच कंपनीने त्याला जॉब ऑफर केला होता, त्याच्याच फॉर्मॅलिटी पूर्ण करायला त्याला थांबावे लागले होते. मी त्याला ‘नाही’ म्हणाले असते तर जॉबच्या आनंदाएवढेच कदाचित दु:ख झाले असते त्याला. मी शशांकला कधीच दु:खी बघू शकत नाही आणि वर्गातही शशांकला दु:खी, ऑफ मुड पहायची सवयच नव्हती. नंतर प्रोजेक्ट रिपोर्टमधून वेळ काढून त्याने मला घरी नेले आणि सांगून टाकले, ‘स्वाती आणि मी लग्न करणार आहोत, अर्थात तुमच्या आशिर्वादासह!’ कदाचित काका काकूंना याची कल्पना असावी, कारण आमचा सगळाच ग्रुप त्याच्या घरी जायचा, पण सर्वात जास्त वेळा शशांक मलाच त्याच्या घरी न्यायचा. म्हणून त्याच्या आई-बाबांनी लगेचच आमच्या लग्नाला परवानगी दिली, ‘दोघेही आपापल्या जॉब्जमध्ये सेटल झालात की उडवून देऊ  बार तुमच्या लग्नाचा!’ समीर, या डिसेंबर जानेवारी मध्ये आमचे लग्न होऊ शकेल, पण तू साथ दिलीस तरच!” समीरला हा सारा प्रकार आता अगदी व्यवस्थित कळला आहे. तरीही तो पेचात पडला आहे, कारण स्वाती त्याला खुपच आवडली आहे. ती पुढे सांगू लागते, “गेल्या जूनमध्ये शशांक जॉईन झाला आहे. एम. टी. असूनही भरपूर पगार आहे आणि सहा महिन्यांच्या प्रोबेशन नंतर ‘असिसटंट टू जनरल म्रनेजर’ आणि पगारातही बर्‍यापैकी वाढ असणार आहे. आणि मागीतली तर मलाही मुंबईत बदली मिळू शकते. म्हणजे, आर्थिक दृष्टया काहीच चिंता नसेल.” एवढे सारे काही असूनही स्वातीच्या वडिलांचा या लग्नाला विरोध का आहे, या प्रश्नाचे उत्तर समीर किंवा स्वाती, कोणाकडेच नाही आहे. तरीही समीर तिला आश्वस्त करतो, “मला शशांकला भेटू दे, आय विल टेक केअर दॅट  यू विल मॅरी शशांक बाय धिस डिसेंबर.”

ते दोघे खाली येतात आणि थोडया वेळाने साठे मंडळी आपल्या घरी जायला निघतात. गाडी चालवताना समीरचे लक्ष कुठेतरीच आहे, अतिशय मेकॅनिकली तो त्याची लाडाकी एस्टीम चालवत आहे. समीर स्वातीच्याच विचारात आहे असे त्याच्या आई-पपांना वाटत आहे म्हणून ते त्याला त्याच्या तंद्रीतून बाहेर काढत नाहीत. समीरला आता पूर्ण खात्री झाली आहे की, शशांक संजूचाच भाऊ आहे.

.........संजय आपटे, इंजिनिअरींगला समीरबरोबर होता. दोघे एकमेकांचे जिगरी! थर्ड इयरच्या परिक्षेनंतर संजू, राजेश, समीर आणि अजीत
बाईकने सिंहगडावर गेलेले असतात . दिवसभर किल्ल्यावर घालवून परत येताना संजू आणि अजीत समोरून येणर्‍या गाडीला चुकवायला बाजूला होतात आणि तोल जाउुन त्यांची बाईक सरळ दरीतच पडते. अजीत बाईक वरून फेकला जातो पण संजय बाईकसकट गडगडत खाली दरीत पडतो. समीर आणि राजेश त्यांची बाईक बाजूला ठेवून दरीत उतरतात. अजीतही येतो, सुदैवाने त्याला खरचटण्याव्यतिरीक्त फार लागले नाहीये. तिघेही संजयला वर घेउून येतात. त्याच्या बाईकबरोबरच गडगडत जाण्यामुळे संजयची शुद्ध हरपली आहे. परत रस्त्याला आल्यावर एका गाडीला थांबवून त्यातून संजय आणि अजीत जातात. समीर आणि राजेश बाईकवरून जातात, संजयची बाइक नेण्यात काहीच अर्थ  नसतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यवर लगेचच संजयचे ऑपेरेशन होते. ते  यशस्वी होऊनही संजय जगू शकत नाही! या घटनेनंतर चार पाच वेळाच समीर संजूच्या घरी जातो, तेव्हाच त्याची शशांकशी ओळख होते आणि त्या भेटींमध्ये समीर शशांकला संजूची जागा घ्यायला सांगतो, “समीर आता नाहीये, पण त्याची कमतरता तू भासू देऊ नकोस. लक्षात ठेव, संजूला एम. बी. ए. झालेले पहाणे काकांचे स्वप्न होते, ते आता तू  पूर्ण करायचे आहेस!” नंतरच्या पाच सहा वर्षात काय घडले याची समीरला कल्पनाही नसते. आणि आज अचानक शशांक परत समीरच्या आयुष्यात अशाप्रकारे येतो.

 . . . . . . . . . . . . जोशांकडून घरी येईपर्यंत समीरला हे सारे आठवते!

पुढच्या वीकएण्डला स्वाती पुण्याला समीरची आणि त्याची गाठ घालून देते, समीरच्याच घरी. ‘समीर साठे म्हणजे दादाचा मित्र तर नव्हे?’ हाच विचार करत शशांक समीरच्या घरी येतो. त्याच्या अपेक्षेप्रमाणे समीरच दार उघडतो, आणि त्या दोघांनी मारलेली मिठी पाहून स्वाती थक्कच होते! शशांक खुलासा करतो, “आश्चर्य वाटाले ना स्वाती? धिस ईज  द इन्स्पिरेशन बिहाईंड माय एम. बी. ए. याच्याच मुळे मी दादाची जागा घेऊ शकलो...!”  समीर स्वत:ची स्तुती  मध्येच थांबवतो, “कट दॅट ऑफ  शशांक, पास्ट इज पास्ट! पण त्यामुळे तुम्ही तुमचा सोनेरी भविष्यकाळ हातातून जाऊ देऊ नका!” समीरच्या या वाक्यामुळे स्वातीला खात्रीच पटते की, तिच्या आणि शशांकच्या लग्नात आता काहीच अडचण येणार नाही. आणि समीरलाही कळले आहे की, शशांकने खरोखरच संजूची जागा घेतली आहे. स्वातीने कोणत्या परीस्थितिमध्ये त्याच्याकडे मन मोकळे केले तेही तो शशांकला सांगतो, “खरेच शुर आहे मुलगी. दोन अडीच महीने तुझ्याशिवाय राहिल्यावर तुला प्रपोज करायचे ठरवते म्हणजे मानलेच पाहीजे! आणि मुख्य म्हणजे मला विश्वासात घेऊन  सांगितले सारे, दुसरी कोणी असती तर तिला हे जमलेच असते असे नाही, कदाचित सगळे काही मनात ठेवून माझ्याशी लग्न केलेही असते आणि आम्हा दोघांनाही त्रास झाला असता! एनीहाऊ पण शशांक, तुमच्या लग्नात अडचण काय आहे? यु टू सीम टू बी फायनान्शीअली वेल सेटल्ड!?” शशांककडेही या प्रश्नाचे उत्तर नाहीये!

“म्हणजे स्वातीचे बाबाच याचे उत्तर देऊ शकतील तर!” समीर त्याचे मत व्यक्त करत असतानाच त्याचे आई-पपा
बाहेरून येतात आणि स्वातीला तिथे पाहून थक्कच होतात! “काय रे? ही कशी काय इथे आत्ता? लग्न पूर्णपणे ठरलेले नसताना? तू परस्परच जोशांना ‘होकार’ देऊन आलास की काय?” शरदराव आपले आश्चर्य लपवून ठेवू शकत नाहीत. “पपा, आई,  मला स्वातीशी लग्न करता येणार नाही. तिचीच तशी इच्छा आहे,” समीरला त्याच्या आई  पपांच्या चेहेर्‍यावरची प्रश्नचिन्ह अगदी स्पष्ट दिसत आहेत. समीर त्यांना शशांक आणि स्वातीची कहाणी सांगतो, स्वातीनेच सांगितलेली. ते सारे ऐकताना समीरच्या आई  पपांच्या चेहेर्‍यावरची प्रश्नचिन्ह जाऊन त्यांची जागा समीर विषयीच्या अभिमानाने घेतली आहे, “सांगा पपा, किती मोठा गुन्हेगार ठरलो असतो या दोघांचा, अगदी व्हिलनच! चालले असते आई, तुला?” मग शशांकलाच समीरची आई विचारते, “मग अडचण काय आहे? काय रे शशांक?” “याच प्रश्नाचे उत्तर घ्यायला आम्ही स्वातीकडे जात होतो काकू, तेवढयात तुम्ही आलात. खरो सांगू काका, असा इतरांच्या भावनांचा विचार करणे सगळयांनाच जमते असे नाही. पण समीरने दोनदा असा विचार केला आहे, एक आज आणि सहा वर्षांपूर्वी दादा गेला तेव्हा. यानेच मला दादाची जागा घ्यायला सांगितले! खरेच काकू, तुम्ही खुप भाग्यवान आहात!” समीरच्या आई पपांना शशांक माहीत आहे, संजयच्या अपघातानंतर तो काहीवेळा आला होता समीरकडे.

चहा पिऊन तिघेही स्वातीकडे जातात. त्यांच्या घरात आधी फक्त समीर आणि स्वाती जातात. विवेकराव खुष होतात दोघांना एकत्र पाहून, “या जावई बापू, या! सीमा, जरा चहा कर. समीर आला आहे!” समीर, स्वाती आणि शशांक  साठेंच्या घरून निघाल्यावर शरदरावांनी जोशांकडे फोन केलेला असल्यामुळे विवेकरावांना कल्पना आलेली असते त्यांच्या येण्याची. तरीही समीर सरळ मुद्द्यालाच हात घालतो, “मला स्वातीशी लग्न करता येणार नाही आणि जरी केले तरी आमच्यापैकी कोणीच आनंदी राहू शकणार नाही.” विवेकरावांना काय बोलावे सुचत नाही. होणार्‍या जावयाकडून कदाचित त्यांना ही अपेक्षा नसावी, “...काय कमी आहे आमच्या स्वातीमध्ये? देखणी आहे, हुशार आहे, आज्ञाधारक आहे...?” अगदी हतबल झाल्यासारखे वाटते त्यांना! समीरलाही रहावत नाही, “तिच्या याच आज्ञाधारकपणाचा फायदा घेतला जात आहे असे मला तरी वाटत आहे.” असे म्हणत समीर दाराकडे जातो, “काय कमी आहे या शशांकमध्ये? पुण्यात फ्लॅट, मुंबईतल्या एका प्रतिष्ठीत जाहिरात कंपनीत जॉब. आजकाल एम. बी. ए. च्या समर ट्रेनीला त्याच कंपनीत परमनंट जॉब मिळणे ही जेवढी मानाची गोष्ट आहे, तेवढीच अवघडही आहे.आणि हे मी सांगायला नकोच, तुम्हीही एम. बी.ए. आहात!” समीरबरोबर आता शशांक आलेला पाहून शरदरावांच्या कपाळावर आठया पसरतात. समीर पुढे बोलू लागतो, “स्वत:च्या सख्या भावाच्या मृत्यचे दु:ख पचवून आज तो एम. बी. ए. झाला आहे, कोणतीही शिफारस नसतानाही त्याने नोकरी मिळवली आहे. कोणाला अभिमान वाटणार नाही याचा?”

“बाबा, असे नका करू,” स्वाती आता तिच्या बाबांना विनवू लागते, “प्लिज बाबा! मी समीरशी लग्न केले तरी मी प्रेम करू शकणार नाही त्याच्यावर. प्रेम हे एकदाच होते, आणि मी ते शशांकवर करते. समीरशी मी लग्न केले तरी ती एक तडजोड असेल आणि त्यामुळे आम्हा दोघांनाही त्रास होईल!”

तेवढयात रश्मी येते, स्वातीची जिवलग मैत्रिण. रश्मीने समीरला आधी पाहिलेले नसते, पण स्वातीने त्याचा हा प्रयत्न तिला सांगितलेला असतो, त्यामुळे ती समीरला लगेच ओळखते. स्वातीनेच तिला बोलावलेले असते.

“काय अडचण वाटते आहे तुम्हाला या दोघांचे लग्न होण्यात?  मला खात्री आहे, माझ्यापेक्षा शशांकच स्वातीला जास्त सुखी ठेवू शकेल.” एवढा वेळ काहीही न बोलणारे स्वातीचे आजोबा, विनायकराव आता त्यांच्या मुलाला विचारतात, “विवेक काय प्रकार आहे हा? कशासाठी हा विरोध? काही सांगशील का?” विवेकरावांनी त्यांच्या वडिलांना कधीच विरोध केलेेला नसतो, कदाचित म्हणूनच स्वातीकडूनही त्यांची तिच अपेक्षा असते, आणि काही अनुभवही त्यामुळे त्यांनी शशांक स्वातीच्या लग्नाला इतके दिवस विरोध केलेला असतो. ते त्यांचे अनुभव सांगू लागतात, “समीर तुला हवे आहे ना कारण? स्वाती बेटा, शशांक, खरे सांगतो, नवरा मुलगा आणि नवरी मुलगी हे एकाच वयाचे असलेले कधी ऐकले आहे का? बायको ही नवर्‍यापेक्षा लहानच हवी. स्वातीची आई माझ्यापेक्षा चांगली सहा वर्षे लहान आहे. वयातला हा फरकच महत्वाचा आहे. मुलगा लवकर कमावता व्हावा, त्याला स्थिर व्हायला थोडा वेळ मिळावा आणि मग योग्य वयाच्या मुलीशी लग्न करून संसाराची जबाबदारी घ्यावी, हेच शिकलो आम्ही लहानपणी. आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे, माझ्या सर्वच मित्रांचे प्रेमविवाह झाले आणि बहुतेकांच्या संसारात नंतर कुरबुरी सुरू झाल्या. रमेशवर तर घटस्फोटाची वेळ आली. आठवते आहे ना बाबा, तुम्हाला? मला भिती होती ती ही की, स्वातीवर तशी वेळ येऊ नये!” “बास एवढेच?” स्वातीचे आजोबा आता त्यांच्या मुलाला समजावू लागले आहेत, “विवेक, कस्तुरबा महात्मा गांधींच्या वयाच्याच नव्हे, तर त्यांच्यापेक्षा मोठया होत्या. त्यांचे नाही कुठे अडले ते? अणि प्रेमविवाहांचे ते तुला आलेले अनुभव होते. सगळेच प्रेमविवाह असे अयशस्वी होतात, असे तुला म्हणयचे आहे का? अरे विवेक, तू फक्त वाईटाचाच विचार का करतो आहेस? या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे, पहा तरी? आणि समीर काही खोटे बोलत नाहीये, तडजोड म्हणजे कोणाला तरी मानसिक त्रास हा होणारच! कशाला हवा हा त्रास यांना या कोवळ्या वयात? हे बघ विवेक, स्वाती-शशांकच्या लग्नाला माझा विरोध नाही आणि तुझाही नसावा!”

विनायकरावांचाही आग्रह दिसू लागल्यावर विवेकरावांचा विरोध आता हळू हळू मावळू लागला होता. त्यांना त्यांच्या बाबांचे म्हणणे पटल्यासारखे दिसू लागले आहे, “ठिक आहे, ठरत होते त्याप्रमाणे स्वातीचे लग्न या चोविस डिसेंबरला होईल, पण शशांकशी, समीरशी नव्हे. त्याचे वाटल्यास या रश्मीशी लग्न लावून देऊ!” विवेकरावांनी रश्मीची चेष्टाच केली होती, पण समीरचा शशांक आणि स्वातीचे लग्न जमविण्याचा हा प्रयत्न रश्मीला सांगताना स्वातीच्या लक्षात आले होते की तिला समीर मनोमन आवडू लागला आहे, म्हणूनच तिने रश्मीला बोलावून घेतले होते. आणि समीरलाही ती आवडून जाते, पटकन!

शशांक आणि स्वातीला हे सगळे स्वप्नवतच वाटते आहे, ‘बाबा इतके सहज आमच्या लग्नाला तयार होतील’ यावर तिचा विश्वासच बसत नाही पटकन! ती मिठीच मारते त्यांना एकदम! शशांकही त्यांच्या पाया पडतो. आणि कोणालाही काही सुचायच्या आधीच शशांक समीरकडे आणि स्वाती रश्मीकडे फोन करून त्यांच्या आई बाबांना बोलावून घेतात. रश्मी आणि समीर एकमेकांना पसंत आहेत हे कळल्यावर कोणीच काहीच हरकत घेत नाही. 

समीर-रश्मीच्या लग्नाच्या पुढच्या गोष्टी दुसर्‍या दिवशी रश्मीच्या घरी ठरतात. सप्टेंबर मध्ये दोन्ही जोडप्यांचे साखरपूडे होतात आणि डिसेंबर मध्ये लग्ने, चोविसला शशांक-स्वाती आणि सव्वीसला समीर-रश्मी! आणि नंतर दोन्ही कपल्स एकदमच गोव्याला जातात...........






------------------
जुलै १९९९
-चेतन अरविंद आपटे

2 comments:

  1. छान, पण present continuous मधे लिहीण्यापेक्षा संपूर्ण भूतकाळात लिही

    ReplyDelete
  2. Sure. However, it was written like that in 1999 July and I did not change it while publishing here.

    ReplyDelete