Monday, 13 March 2017

कथा लेखन

लहानपणी, म्हणजे अगदी शाळकरी असताना नाही, महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर काही वर्षानी, मी एक दोन कथा लिहिल्या होत्या. त्या कथांचा शेवट आधी सुचला होता आणि तेव्हा वाटले होते की यात कथावस्तू आहे! त्यानुसार पात्र रचना करून त्या कथा लिहिल्या होत्या. जशा सुचल्या तशा लिहिल्या होत्या त्या तेव्हा. त्यातली एक तेव्हाच पुर्ण झाली होती, दुसरी आज अठरा एकोणीस वर्षानंतरही अपूर्णच आहे! त्या गोष्टींमधील बरेचसे संदर्भ त्या काळातले आहेत, उदाहरणार्थ मुंबई-पुणे दृतगतीमार्ग, जो आज आपल्याला रोजचा झाला आहे, तो तेव्हा बनत होता. काही चार चाकी गाड्या ज्या आज नवीन बनत नाहीत पण तेव्हा लोकप्रिय होत्या, त्यांचा उल्लेख आहे त्या गोष्टींत. हे संदर्भ आज जुने वाटतील पण जाणकार वाचक ते समजून घेतीलच अशी अपेक्षा आहे.

गेल्या एक दिड महिन्यात हा लेखनाचा उद्योग सुरू केल्यापासून त्या कथा ब्लॉगस्वरूपात लिहिण्याचे डोक्यात घोळत आहे. त्या निमित्ताने आज त्यातील एक कथा संगणकावर माझी मीच वाचली. ती कथा आज एवढ्या वर्षानंतर वाचताना वयाच्या कोणत्या टप्प्यावर असताना ती लिहीली होती ते आठवून मजा वाटली! लवकरच ती कथा इथे ब्लॉगस्वरुपात लिहिण्याचा मानस आहे. 

पण त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. उदाहरणार्थ त्या कथा संगणकावर एक मराठी FONT वापरून लिहिल्या होत्या. आजच्या सारखे भ्रमणध्वनीवरही सहज करता येते तसे देवनागरीत टंकलेखन तेव्हा होत नसे. त्यामुळे त्या FONT मधून UNICODE मधे त्या कथा आणणे हेच मोठे काम आहे!!

या व अशा अजून काही अडचणींवर मात करून, जी कथा पुर्ण आहे ती इथे सादर करेन लवकरच असे वाटते!.

वाचकांनी कदाचित एका गोष्टीची नोंद घेतली असेल. माझे आंतरजालावरील लेख हे दिवस क्रमांक आणि पान क्रमांक यांचा उल्लेख करून संपतात. तो २०१७ या वर्षातील दिवसाचा क्रमांक आहे आणि त्या दिवसाच्या क्रमांकाच्या पानावरचे ते लेखन अशी कल्पना आहे. गेल्या एकतीस डिसेंबरला नवीन वर्षाच्या ज्या शुभेच्छाआल्या त्यातील एका लक्षवेधी शुभेच्छा संदेशात लिहिले होते, "३६५ पानांचे एक कोरे पुस्तक उद्या तुमच्यासमोर उघडले जाईल. त्यात रोज काही चांगले लिहीत जा!" यावरून ही दिवस क्रमांक आणि पान क्रमांक ही कल्पना सुचली. परंतु ब्लॉगवर कथा लिहिल्या तर त्यांचा शेवट याप्रकारे करणे सयुक्तिक ठरणार नाही. त्यामुळे ब्लॉगवरील कथेचा अंत हा पुर्वी जसा लिहीला होता तसाच असेल. दिवस क्रमांक पान क्रमांक या स्वरूपात कथा संपणार नाहीत. अन्य लेखांचा शेवट मात्र याच स्वरूपात असेल. 

तर एका जुन्या कथेला नव्याने भेटू!!

दिवस बाहत्तरावा पान बाहत्तरावे!!

No comments:

Post a Comment