Sunday, 31 December 2017

काय दिलं २०१७ ने?

काय दिलं २०१७ ने? बरंच काही! 

माझ्या देशाची पत आंतरराष्ट्रीय मंचावर खूपच सुधारली. त्या सुधारणेचा आलेख चढताच आहे आणि चढताच राहील! राष्ट्रीय पातळीवर काही महत्वपूर्ण आर्थिक निर्णय आणि बदललेली कररचना यांचाही हातभार लागला यात. आता काही मूलगामी बदल केले की त्याचे बरे वाईट परिणाम होतात, तसे या बदलांचेही झालेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की दुचाकी किंवा चारचाकी गाडी वळवणे सोपे असते पण लोहमार्गावरून जाणारी ट्रेन रूळ बदलताना रुळांचा आवाज होतोच. त्याचप्रमाणे सवाशे कोटी लोकसंख्येच्या देशाची घडी व्यवस्थित बसवताना थोडी खडखड, थोडा कोलाहल होणारच! तरीही एकंदरीत माझ्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे हे कोणीही मान्य करेल.  

गेल्या वर्षीपर्यंत काहीशे कोटी रुपयांची गोष्ट करणारी चित्रपट सृष्टी "बाहुबली द कन्क्लुजन" या अतिभव्य चित्रपटामुळे हजारो कोटी रुपयांच्या गोष्टी करू लागली. बेचाळीस वर्षांपूर्वी जसा "शोले" ट्रेंड सेटर होता तसाच यंदा "बाहुबली द कन्क्लुजन" हा चित्रपट ट्रेंड सेटर ठरला. एक पडदा चित्रपट गृह असो वा मल्टिप्लेक्स, सगळीकडे याने गर्दी खेचली. परदेशांत तेथील स्थानिक भाषांतही हा चित्रपट प्रसिद्ध झाला. 

मराठी चित्रपटांबद्दल बोलायचं तर वर्षाच्या सुरुवातीला आलेला "ती सध्या काय करते?" बराच लक्षवेधी ठरला. शाळकरी वयात निर्माण झालेलं प्रेम तारुण्यातही, दोघांचे मार्ग वेगवेगळे झायावरही कसं टिकू शकतं याचं छान चित्रण होतं यात. तीन वेगवेगळ्या कलाकारांनी एकाच पात्राची वेगवेगळ्या वयातील भूमिका करण्याचा प्रयोग यशस्वी झाला असंच म्हणता येईल. याच बरोबर फास्टर फेणे, बापजन्म, हृदयांतर, मुरांबा, कच्चा लिंबू या सारखे भरपूर आशयघन मराठी चित्रपट या वर्षात आले आणि त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली.

भारतीय क्रिकेटपटुंच्या आयुष्यावर एकूण तीन चित्रपट प्रदर्शित झाले गेल्या दोन तीन वर्षांत. पैकी दोन चित्रपटांत वेगवेगळ्या अभिनेत्यांनी त्या त्या क्रिकेटपटुंच्या भूमिका केल्या पण क्रिकेटच्या देवाची भूमिका कोण करणार? मग चित्रपट बनवताना तो देवच शतकोटी स्वप्ने घेऊन रुपेरी पडद्यावर अवतरला!

दूरचित्रवाणीवरही या वर्षात खूप नवे प्रयोग झाले. वर्षानुवर्षे चालणाऱ्या दैनंदिन मालिकांना कंटाळलेल्या प्रेक्षकांना मिनी सिरीज या प्रकाराशी ओळख करून दिली ती रुद्रमने. भक्कम कथानकासह अनेक जमेच्या बाजू असलेली ही मालिका ७० - ७५ भागांचीच होती. नजीकच्या भविष्यात अशा अजून मालिका बघायला मिळतील अशी आशा करूया. या मालिकेमुळेच मित्र परिवारातही थोडी वाढ झाली. 

या मालिकेबद्दल लिहिलेल्या ब्लॉगपोस्टमुळे हा लेखनाचा उद्योग थोडा जास्त लोकप्रिय झाला. आणि त्यामुळे हा उद्योग चालू ठेवण्याचा उत्साहही वाढला. मी काही सिद्धहस्त वगैरे लेखक नाही. जे मनाला भावते किंवा टोचते ते साध्या सोप्या शब्दांत मांडतो इतकंच. सुदैवाने चांगला वाचकवर्ग या ब्लॉगला मिळालाय त्यामुळे हा उद्योग मी चालू ठेवणार आहे. 

या वर्षात आणखीन एक नवीन उद्योग सुरू केला, सुरु झाला असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. आयुष्यात पहिल्यांदाच शिक्षक झालो. एक नवं दालनच उघडलं! आता हा उद्योगही बाळसं धरतोय. या बद्दल सविस्तर परत कधीतरी. 

तर एकंदरीत २०१७ या वर्षाने अनेक चांगले अनुभव दिले, उमेद दिली, उत्साह दिला आणि मित्र दिले. येणारे वर्ष, तुम्ही कोणत्याही वयाचे असलात तरीही अठराच वर्षे वयाचे आहात याची आठवण करून देणारे आहे. २०१८ म्हणजे looking 20 feeling 18 असंच काहीसं नाहीये का?

या वर्षरुपी पुस्तकाच्या दिवसारूपी पानांवर खूप काही लिहिले गेले आणि ते कायम स्मरणात राहील. या पुस्तकाची थोडी पाने चाळल्यावर काही चांगल्या वाईट गोष्टी सापडल्या, त्यांची आठवण सोबत ठेवून वर्षभर उघडे असलेले हे ३६५ पानांचे पुस्तक आज मिटत आहे. पुढील वर्षी नवीन आशा आकांक्षा घेऊन अजून एक कोरे पुस्तक उघडायचे आणि त्याच्या प्रत्येक पानावर काही ना काही लिहायचे, अशी इच्छा ठेवून आजच्यापुरता आणि या वर्षापुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो!

दिवस तीनशे पासष्टावा पान तीनशे पासष्टावे!

३१/१२/२०१७ 
मुलुंड मुंबई



20 comments:

  1. As expected..... Chaanach !
    Keep writing Mitra !

    ReplyDelete
  2. तुझा हा उद्योग छान चाललाय.असाच चालु ठेव शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. असेच आशीर्वाद राहू देत!

      Delete
  3. Replies
    1. छानच झालय , विषयाची मांडणी उत्तम झाली आहे. असेच चालू ठेवावं


      Delete
  4. अतिशय समर्पक व सुटसुटीत भाषेत केलेले २०१७चे सिंहावलोकन

    ReplyDelete
  5. फारच छान व सुटसुटीत भाषेत केलेले २०१७चे सिंहावलोकन.लेखनाच्या उद्योगाला अनेक शुभेछा keep it up,

    ReplyDelete
  6. फारच छान व मोजक्या शब्दात केलेले२०१७चे सिंहावलोकन.लेखनाच्या उद्योगाला अनेक शुभेच्छा व शुभाशिर्वाद

    ReplyDelete
  7. छान लेख!!

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. मुद्देसूद आणि सकारात्मक! Keep writing

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! अशा सकारात्मक प्रतिक्रिया प्रोत्साहनच देतात लेखन चालू ठेवण्यासाठी!!

      Delete