गुलजार यांनी लिहिलेली चित्रपट गीते आवडत नाहीत असे चित्रपट रसिक खूपच कमी, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतील. त्यांचे चित्रपट दिग्दर्शनही अनेकांना आवडत असेल. बरेच चित्रपट असे आहेत ज्यात त्यांचे दिग्दर्शन आणि गीतलेखन दोन्ही आहेत. तरीही इथे उल्लेख करावासा वाटतो तो त्या एका चित्रपटाचा ज्याचे दिग्दर्शक गुलजार साहेब आहेतच पण स्वत: गीतकार असूनही त्यांच्या या चित्रपटात एकही गाणे नाहीये! होय, नुकताच पाहण्यात आलेला हा चित्रपट म्हणजे १९७३ साली प्रदर्शित झालेला, स्वर्गीय अभिनेते आणि सांसद विनोद खन्ना यांची प्रमुख भुमिका असलेला चित्रपट अचानक.
दिग्दर्शक गुलजार असूनही त्यांनीच रचलेली गाणी या चित्रपटात नाहीत हे जसे या चित्रपटाचे वेगळेपण आहे तसेच साधारणपणे अडीच तीन तास कालावधीचे चित्रपट बनत असण्याच्या काळातला हा चित्रपट फक्त दीड तास कालावधीचा आहे हे ही या चित्रपटाचे वेगळेपण आहे! तसे म्हणायला गुलजार यांनीच दिगदर्शित केलेल्या आणि विनोद खन्ना यांचीच प्रमुख भूमिका असलेल्या मेरे अपने या चित्रपटातले स्वर्गीय किशोर कुमार यांच्या आवाजातले "कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते" हे गीत पार्श्वसंगीताच्या स्वरूपात चित्रपटाच्या शेवटी वाजते. पण "अचानक" या चित्रपटाची स्वतःची अशी गाणी नाहीत. चित्रपटातील अन्य प्रमुख कलाकार म्हणजे स्वर्गीय इफ्तेकार, स्वर्गीय ओम शिवपुरी, लिली चक्रवर्ती, असरानी, फरीदा जलाल आणि इतर.
विनोद खन्ना यांनी साकारलेला लष्करातील अधिकारी मेजर रणजीत खन्ना याची ही कथा आहे. इफ्तेकार यांनी साकारलेला कर्नल बक्षी आणि मेजर रणजीत यांच्या फ्लॅशबॅक मधून प्रेक्षकांच्या समोर येते. कारण चित्रपाटातल्या प्रमुख घटनांचे हे दोघेच मुख्य साक्षीदार आहेत. रणजीत खन्ना लष्करातील अधिकारी होण्याचे प्रशिक्षण घेत असताना त्याची वाग्दत्त वधू पुष्पा बक्षी त्याला लेखी पत्र पाठवण्याऐवजी ऑडिओ कॅसेटवर रेकॉर्ड करून पत्र पाठवत असे. अभिनेत्री लिली चक्रवर्ती यांनी ही भूमिका अतिशय ताकदीने साकारलेली आहे. त्या पत्रात एकदा पुष्पाने स्वतः गायलेले एक गीत असते जे परेडच्या वेळी ऐकत असताना तो पकडला जातो. त्यामुळे त्याला कर्नल बक्षी यांच्याकडून शिक्षाही भोगावी लागते आणि, "तू अशाच चुका करत राहिलास तर तुझे पुष्पाबरोबर ठरलेले लग्न तोडावे लागेल!" अशी धमकीही मिळते रणजितला. पुष्पा कर्नल बक्षीचीच मुलगी होती हा उलगडा प्रेक्षकांना तेव्हा होतो जेव्हा कर्नल बक्षी हे ओम शिवपुरी यांनी साकारलेल्या डॉक्टर चौधरी यांना मेजर रणजीत बद्दल सांगत असतो, "मी त्याला शिक्षा करत असे पण त्याचे उदाहरण अन्य प्रशिक्षणार्थींना देत असे." असे सांगताना कर्नल बक्षी यांना आनंद आणि दु:ख दोन्ही होत असते. "शत्रूला ठार मारण्यासाठी ज्या पद्धती मेजर रणजित शिकला त्याच पद्धती आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींना मारण्यासाठी त्याला वापराव्या लागल्या." हे सांगताना हतबल झालेला कर्नल बक्षी इफ्तेकार यांनीच सादर करावा!
एका काल्पनिक युद्धात "खडकाली चौकी"चे संरक्षण करताना शत्रूच्या अनेक सैनिकांना कंठस्नान घातल्याबद्दल मेजर रणजितला "वीर चक्र" हा सन्मान दिला जातो. ते पदक महू येथे कर्नल बक्षी यांना दाखवून मेजर रणजित आपल्या घरी जातो. तिथे त्याला कळते की पुष्पा त्याचा मित्र प्रकाशबरोबर, ज्याचा उल्लेख मेजर रणजित नेहमी "सिव्हिलियन" असा करत असतो, प्रकाशाच्याच बोट हाऊसवर मासे पकडण्यासाठी गेलेली असते. अभिनेते रवी राज यांनी ही छोटीशी भूमिका चोख बजावली आहे. त्या बोट हाऊसपाशी गेल्यावर मेजर रणजीतला पुष्पा आणि प्रकाश यांच्यातील विवाहबाह्य संबंधांबद्दल कळते आणि तो अतिशय दु:खी होतो. त्या रागात मेजर रणजित प्रकाशाची कदाचित दुसऱ्या दिवशी प्रकाशच्याच बोट हाऊसवर स्वतःच्या घरातल्याच एका चाकूने हत्या करतो आणि त्याच रात्री पत्नी पुष्पाला गळा आवळून ठार मारतो. या दोन्ही हत्या करतानाची दृष्ये चित्रपटात नाहीत. प्रकाशला मारल्यानंतर चाकू पाण्यात फेकून दिलेला आणि आजूबाजूचे पाणी लाल झालेले दाखवले आहे. तर पुष्पाला मारताना फक्त तिच्या गळ्याभोवती हात आवळलेला दाखवला आहे. आणि ही गुलजार यांच्या दिग्दर्शनाची जमेची बाजू आहे. कोणतीही हिंसा प्रत्यक्ष न दाखवता या दोन्ही हत्या करतानाचा मेजर रणजित याचा उद्वेग आणि राग प्रेक्षकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचतो आणि अपेक्षीत परिणामही साधतो. तरीही या प्रसंगांचे संकलन अर्थात एडिटिंग अजून चांगले होऊ शकले असते असे मला वाटते.
यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गणवेषधारी मेजर रणजित मृत पत्नी पुष्पांचे डोके मांडीवर घेऊन पलंगावर बसलेला दाखवला आहे आणि सैन्यातले त्याचे वरिष्ठ अधिकारी त्याच्या घरी येतात आणि आपली टोपी, पदके आणि कंबर पट्टा त्यांच्या हवाली करून शरण आलेला मेजर रणजित त्यांच्या बरोबर निघून जातो. इथेही मेजर रणजित त्याच्या वरिष्ठांकडे त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली देत आहे असे दाखवण्यात चित्रपटाची रिळे आणि प्रेक्षकांचा वेळ वाया न घालवता चित्रपटाचा वेग कायम राखला गेला आहे. नंतर न्यायालयात दोन हत्या केल्याबद्दल मेजर रणजितला देहदंडाची शिक्षा ठोठावली जाते तेव्हा अत्यंत दु:खी झालेला मेजर रणजित तुरुंगात जाण्याआधी स्वतः:च्या घरी जाऊन पत्नीच्या आत्म्यास सद्गती मिळावी याची प्रार्थना करण्याचे परवानगी न्यायाधीशांकडे मागतो, जी त्याला मिळते.
ज्याला "डेकोरेटेड आर्मि ऑफिसर" म्हणतात असा मेजर रणजित असल्यामुळे असेल कदाचित, पण पोलिसांबरोबर स्वतःच्या घरी जाताना त्याच्या हातात बेड्या नसतात. याचा फायदा घेऊन पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरच्या घरातच्या खिडकीतून पडद्याच्या साहायाने खाली उतरून मेजर रणजित तिथून पळून जातो. असे पळून जाण्याचे कारणही प्रेक्षकांना फ्लॅशबॅकच्याच स्वरुपात कळते. मेजर रणजित पुष्पाबरोबर गप्पा मारत असताना ती तिच्या मृत्यूनंतर तिचे मंगळसूत्र गंगेत विसर्जित करावे अशी इच्छा ती व्यक्त करते. ते तिचे मंगळसूत्र रणजितला पलंगावर उशीखाली सापडते. आणि ते गंगेत विसर्जित करण्यासाठी तो पोलिसांना गुंगारा देऊन घरातून पळून जातो. पण पळून जाताना रणजितचे बुट तिथेच, त्याच खोलीत रहातात.
नंतर सुरू होतो तो एक जीवघेणा पाठलाग ज्यात वासावरून माग काढणारे कुत्रे अर्थात स्निफर डॉग्ज बरोबर घेऊन पोलीस रणजितचा जंगलातून पाठलाग करायला लागतात. घरात राहिलेले रणजीतचे बुट बरोबर घेऊन पोलीस त्याचा पाठलाग सुरू करतात. हा सगळा पाठलाग जंगलातून झालेला दाखवला आहे. त्यामुळे अनवाणी घावल्यामुळे रणजितच्या तळपायाला झालेल्या जखमासुद्धा त्याला थांबवत नाहीत. असं जंगलातून अनवाणी धावताना रणजितला त्याच्या एका सहकाऱ्याबरोबर झालेला त्याचा संवाद आठवतो आणि तिथे असलेल्या दोन झाडांभोवती रणजित इंग्रजी 8 या आकारात धावतो जेणेकरून वासावरून माग काढणारे कुत्रे अडखळतात आणि तिथेच तिथेच फिरत बसतात. पुढे धावत जाताना रणजित एका टेकाडावर चढत असताना पाठलाग करणाऱ्या पोलीसांना तो दिसतो आणि त्या टेकडीच्या सर्वात वरच्या भागावर पोहोचल्यावर पोलीस रणजितवर गोळी झाडतात, जी त्याच्या छातीतून आरपार जाते! इथे असे दाखवले आहे की मेजर बक्षीच्या हातात त्याच्या दिवंगत पत्नीचे मंगळसूत्र आहे आणि समोर गंगा नदीचा किनारा आहे. . . . . . . . . . .
मगाशी सांगितल्याप्रमाणे इथपर्यंतची कथा ही कर्नल बक्षी आणि मेजर खन्ना या दोघांच्या फ्लॅशबॅकमधून प्रेक्षकांच्या समोर येते. कर्नल बक्षींकडून हे सगळे ऐकत असताना डॉक्टर चौधरीसुद्धा भावूक झालेले दाखवले आहेत. कमलदीप या अभिनेत्याने पोलीस सुपरिटेंडंटन्ट गुप्ता यांची छोटीशी भूमिका केली आहे. डॉक्टर चौधरी त्यांच्याबरोबर बोलताना त्यांचा उल्लेख फक्त "मिस्टर गुप्ता" असा करत असतात. पण ते पोलीस सुपरिटेंडंटन्ट आहेत हे प्रेक्षकांना शेवटीच समजते. गुप्ता आणि डॉक्टर चौधरी यांच्या संवादाचा मुद्दा हा असतो, "हृदयाच्या इतक्या जवळून, एका फुफ्फुसाला अर्धे अधिक नष्ट करून बंदुकीची गोळी आरपार गेली तरीही हा माणूस (मेजर खन्ना) जिवंत कसा काय?"
दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसांनी रणजित पूर्ण बरा होतो. या कालावधीत ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी साकारलेला डॉक्टर कैलाश आणि ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांनी साकारलेली परिचारिका राधा यांच्याबरोबर रणजिताचे चांगले स्नेह संबंध जुळतात आणि ते वेगवेगळ्या लहान मोठ्या प्रसंगातून प्रेक्षकांच्या समोर येतात. बंदुकीच्या गोळीमुले झालेल्या जखमेतून आणि त्या बरोबर झालेल्या अन्य गुंतागुंतीमधून बरे होताना त्या रुग्णालयात रणजितची परत एकदा पूर्ण तपासनी होते ज्याचे अहवाल एकदम योग्य असे येतात. त्यानंतर डॉक्टर चौधरी रणजितच्या खोलीत त्याच्या तब्येतीची चौकशी करतात आणि रणजितला बरे वाटत आहे हे कळल्यावर म्हणतात, "आता मला एक अतिशय वाईट काम करायला लागणार आहे!" असे म्हणून ते पोलीस अधिकारी गुप्ता यांना हाक मारतात. या आधी डॉक्टर चौधरींबरोबर रणजित विषयी चर्चा करताना ते गणवेशात नसतात परंतु इथे रणजितला परत अटक करायला आलेले पोलीस सुपरिटेंडंटन्ट गुप्ता हे गणवेशात समोर येतात आणि रणजितला पुन्हा अटक करून नेतात. रुग्णालयाच्या "प्रिझनर्स वॉर्ड"मधून बाहेर पडताना रणजितची डॉक्टर कैलास बरोबर फक्त एक अस्वस्थ नजारा नजर होते आणि सगळे तितून बाहेर पडतात. रुग्णालयाच्या बाहेर कर्नल बक्षी दिसतात तेव्हा त्यांना एक मानवंदना द्यायला अर्थात सॅल्यूट करायला रणजित विसरत नाही!
इकडे डॉक्टर कैलाश रुग्णालयाच्या "प्रिझनर्स वॉर्ड"मध्ये तुरुंगातून पाळताना डोक्यात पोलिसांची गोळी लागलेला अजून एक रुग्ण आल्याची माहिती डॉक्टर चौधरींना देतो आणि अत्यंत दु:खी झालेले डॉक्टर चौधरी राजीनामा देण्याच्या विचारात असतानाच, डॉक्टर म्हणून असलेल्या त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव होते आणि ते पुन्हा कैदी रुग्णाची शस्त्रक्रिया करायला डॉक्टर कैलाश आणि परिचारिका राधा यांच्याबरोबर जातात आणि दुसरीकडे रणजितला फाशी देतात. . . . . . . .
दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसांनी रणजित पूर्ण बरा होतो. या कालावधीत ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी साकारलेला डॉक्टर कैलाश आणि ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांनी साकारलेली परिचारिका राधा यांच्याबरोबर रणजिताचे चांगले स्नेह संबंध जुळतात आणि ते वेगवेगळ्या लहान मोठ्या प्रसंगातून प्रेक्षकांच्या समोर येतात. बंदुकीच्या गोळीमुले झालेल्या जखमेतून आणि त्या बरोबर झालेल्या अन्य गुंतागुंतीमधून बरे होताना त्या रुग्णालयात रणजितची परत एकदा पूर्ण तपासनी होते ज्याचे अहवाल एकदम योग्य असे येतात. त्यानंतर डॉक्टर चौधरी रणजितच्या खोलीत त्याच्या तब्येतीची चौकशी करतात आणि रणजितला बरे वाटत आहे हे कळल्यावर म्हणतात, "आता मला एक अतिशय वाईट काम करायला लागणार आहे!" असे म्हणून ते पोलीस अधिकारी गुप्ता यांना हाक मारतात. या आधी डॉक्टर चौधरींबरोबर रणजित विषयी चर्चा करताना ते गणवेशात नसतात परंतु इथे रणजितला परत अटक करायला आलेले पोलीस सुपरिटेंडंटन्ट गुप्ता हे गणवेशात समोर येतात आणि रणजितला पुन्हा अटक करून नेतात. रुग्णालयाच्या "प्रिझनर्स वॉर्ड"मधून बाहेर पडताना रणजितची डॉक्टर कैलास बरोबर फक्त एक अस्वस्थ नजारा नजर होते आणि सगळे तितून बाहेर पडतात. रुग्णालयाच्या बाहेर कर्नल बक्षी दिसतात तेव्हा त्यांना एक मानवंदना द्यायला अर्थात सॅल्यूट करायला रणजित विसरत नाही!
इकडे डॉक्टर कैलाश रुग्णालयाच्या "प्रिझनर्स वॉर्ड"मध्ये तुरुंगातून पाळताना डोक्यात पोलिसांची गोळी लागलेला अजून एक रुग्ण आल्याची माहिती डॉक्टर चौधरींना देतो आणि अत्यंत दु:खी झालेले डॉक्टर चौधरी राजीनामा देण्याच्या विचारात असतानाच, डॉक्टर म्हणून असलेल्या त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव होते आणि ते पुन्हा कैदी रुग्णाची शस्त्रक्रिया करायला डॉक्टर कैलाश आणि परिचारिका राधा यांच्याबरोबर जातात आणि दुसरीकडे रणजितला फाशी देतात. . . . . . . .
नौदल अधिकारी कावस माणेकशॉ नानावटी यांनी सन १९५९ मध्ये, मुळची ब्रिटिश असलेली आपली पत्नी सिल्व्हियाचा प्रियकर प्रेम भगवान अहुजा याची हत्या केली होती आणि ते त्यातून तेव्हा निर्दोष मुक्त झाले होते. या मुळ घडामोडी नौदल अधिकाऱ्याच्या आयुष्यात घडल्या होत्या परंतु अचानक या चित्रपटाची कथा बांधताना काही प्रमुख बदल केले आहेत ते म्हणजे मेजर रणजित सैन्यातला अधिकारी दाखवला आहे आणि कर्नल बक्षी त्याचे सासरे दाखवले आहेत.
अनेक हिंदी चित्रपटांचे व्हिडिओ वितरणाचे हक्क ज्यांच्याकडे आहेत त्या शेमारू व्हिडिओच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हा चित्रपट HD स्वरूपात उपलब्ध आहे. रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा.
अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला २०१६ मध्ये आलेला रुस्तोम हा चित्रपट याच घटनांवर बेतलेला होता रसिकांना आठवत असेलच. नसेल तर तशी आठवण करून देऊन आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो.
दिवस तीनशे त्रेचाळीसवा. पान तीनशे त्रेचाळीसवे.
मुलुंड मुंबई
०९/१२/२०१८
No comments:
Post a Comment