हा लेखनाचा उद्योग, हा ब्लॉग जरा जास्त मोठा झालाय. ४२ वर्षांचा मागोवा घ्यायचा म्हणजे लांबी वाढणारच. कृपया सयंमाने वाचावा ही विनंती!!
सन १९७५. दादर मुंबई.
त्या वर्षीचा दसरा होता. माझ्या बालमोहन विद्यामंदिर शाळेच्या प्रथेप्रमाणे वयाची अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच्या दसऱ्याला शाळेत प्रवेश घेतला होता. माझे बाबा याच शाळेचे विद्यार्थी. सहाजीकच माझी मोठी बहीण आणि मी, दोघेही बालमोहनमध्येच जाणार हे ठरलेलं होतं! पहिल्या दिवशी आई बाबा दोघेही आले होते मला शाळेत सोडायला. दसरा सण मोठा म्हणून जरा नव्यातले कपडे घालून गेल्याचं आणि शाळेसमोर शिवाजीउद्यानाच्या, नवीन प्रचलित नावानुसार 'शिवतिर्थाच्या' कट्ट्यावर बसून रडून झाल्याचं आज ४२ वर्षांनंतरही आठवतंय. शाळेच्या प्रथेप्रमाणे "छोटा शिशू" या वर्गात माझा प्रवेश झाला होता आणि एक नवं विश्व सामोरं आलं होतं.
ग म भ न गिरवायला सुरुवात झाली होती, "श्री"काराशी ओळख झाली होती, अक्षर ओळख व्हायला लागली होती. मधल्या सुट्टीत डब्यातला खाऊ खाणे हा एक नवा उद्योग मागे लागला. मला त्या वयात पोळीला भाजी लावून खाण्यात जास्त वेळ लागत असे. म्हणून आईने एक शक्कल लढवली. पोळीमध्ये भाजी भरून त्याचा रोल, गुंडाळी करून दिली डब्यात. त्यामुळे मधल्या सुट्टीत डबा पुर्ण संपून "ओता ओती" करायला वेळ शिल्लक राहू लागला. नाहीतर शिपाई वर्ग झाडायला आला तरी आमची स्वारी पोळी भाजीच खात असायची!
तर "ओता ओती" हा एक पाण्याशी खेळायचा प्रकार होता. एका बादलीत पाणी असे ते एका प्लास्टिकच्या तपेलीत घेऊन बाटलीत भरणे असा साधा खेळ होता. पण त्या तपेलीतले पाणी बाटलीत सरळ पडेल तर शप्पथ! थोडे पाणी बाटली ज्यावर ठेवलेली असे त्या लाकडी घडवंचीवर (स्टुल), थोडे जमीनीवर, थोडे अंगावर सांडून उरलेच तर बाटलीत पाणी जात असे. या खेळात एक साधी शिकवण होती. निमुळत्या तोंडाच्या बाटलीत पाणी भरायचं असेल तर बाटलीच्या तोंडात जाईल अशी नळी असलेलं आणि त्याचं स्वत:चं तोंड बाटलीच्या तोंडापेक्षा मोठं असेल असं काहीतरी पाहीजे. मग ताईंनी येऊन बाजूलाच असलेलं नरसाळं म्हणजे फनेल त्या बाटलीत अडकवायला सांगितलं. त्यानंतर या ओता ओतीच्या खेळात वेगळीच मजा यायला लागली. त्या नरसाळ्याची नळी बाटलीच्या तोंडापेक्षा लहान असल्यामुळे बाटलीतून परत बादलीत पाणी टाकताना नरसाळं बाटलीला उलटं लावून, म्हणजे नरसाळ्याची नळी बाहेर ठेवून बादलीत पाणी ओतायला सुरुवात केली. आणि अरुंद नळीतून जास्त जोरात पाणी येताना पाहून मजा यायला लागली! लहानपणी पाण्यात खेळायला मला खुप आवडत असे. मोठेपणी पाण्याशी संबंधितच काही काम करेन याचीच ती नांदी होती का? तर छोटा शिशू वर्गातून मोठा शिशू या वर्गात गेल्यावर बादलीही मोठी झाली आणि मग बाटलीच पाण्यात बुडवून भरायचा "शॉर्टकट" लक्षात आला!! आणि बाटली बादलीत बुडवून त्यात पाणी भरताना येणाऱ्या बुडबुड्यांच्या आवाजाची मजा यायची.
या सगळ्या शिक्षणाबरोबर आणि खेळण्याबरोबर नवीन मित्र मैत्रीणीही बनत होते. त्यांच्याबरोबर खेळणे चालू होते. शाळा सुटल्यानंतर आई किंवा बाबा घरी न्यायला येईपर्यंत शाळेच्या इमारतीभोवतीच्या अंगणात पकडापकडी खेळण्यात वेळ मस्त जायचा. शाळेपासून लांब माहीम आणि वरळी या भागात रहाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था केली होती. बाकी शिवतिर्थाच्या आसपास रहाणारी माझ्यासारखी मुलं चालतच ये जा करत शाळेत, अर्थात आपापल्या पालकांसोबत! शाळा सुटल्यानंतर बसने जाणारी मुलं गेल्यावरही उरलेल्या मुलांचं खेळणं, त्यांचे पालक आल्यानंतरही चालूच असे.
आमच्या वर्गात एक टॉमबॉईश (याला मराठी प्रतिशब्द नाही मिळाला मला!) मुलगी होती, त्या वयातल्या मुलींच्या सरासरी उंची पेक्षा जरा जास्त उंच आणि मुलींचे कपडे न घालता मुलांसारखे कपडे घालणारी. शिक्षकांची बोलणी खाऊनही काहीही फरक पडत नसे त्यात! बालवर्गापर्यंत गणवेष नव्हता. पण पहिलीत गेल्यापासून गणवेष सक्तीचा झाल्यावर हा प्रकार बंद पडला.
इयत्ता पहिलीच्या आधीच्या वर्गांना आमच्या बालमोहन विद्यामंदिरात छोटा शिशू वर्ग, मोठा शिशू वर्ग आणि बालवर्ग असं म्हणतात. आणि हे वर्ग शिवतिर्थाच्या समोरच्या जुन्या इमारतीत होत असत. जिथे बालमोहन विद्यामंदिरचे संस्थापक आणि शिक्षण महर्षी कै. दादा रेगे याचं निवासस्थानही होतं तेव्हा. या इमारतीतल्या खोल्यांमध्ये काही तास होत असत तर काही तास अंगणात. इमारतीच्या कुंपणाला धरून काही वाफे होते ज्यात फुलझाडं होती. बालवर्गात असताना एकदा आमचा एक तास असाच त्या अंगणात होता. सगळी मुलं तीन रांगामधे शांतपणे बसून (हे अशक्य वाटत असलं तरी खरं आहे बरं का!) शिक्षकांची वाट पहात होती. नाही म्हणायला थोडी चुळबुळ चालू होती पण दंगा नव्हता. मी तेव्हा त्या वाफ्यांच्या सगळ्यात जवळ म्हणजे कुंपणाजवळ बसलो होतो आणि माझ्यापुढे तीन चार ओळी सोडून बसलेल्या एका मुलाकडे त्याच्या एका विचित्र कृतीमुळे माझं लक्ष गेलं. काही तरी चघळून तो बाजूच्या वाफ्यात थुंकला आणि त्या थुंकीचा रंग हिरवा होता. बहुदा बाजूच्या वाफ्यातल्या झाडाची पाने खाल्ली असावीत. मला हे तेव्हा काही कळलं नाही आणि मी त्यानंतर बराच वेळ हिरवी थुंकी काढायचा प्रयत्न करत बसलो होतो!
माझा जन्म गौरीपुजनाच्या दिवशीचा असल्यामुळे वाढदिवस गणेशोत्सवाच्या आसपासच येतो बरेचदा. तर बाल वर्गात असताना बहुदा ऋषीपंचमीला माझा वाढदिवस आला होता. नवीन कपडे घालून मी शाळेत गेलो होतो. गणेशोत्सव चालू असल्यामुळे रोजच्या प्रार्थने बरोबर गणपतीची आरती आणि नंतर "घालीन लोटांगण...." हे भजनही व्हायचं. मला आठवतंय, त्या दिवशी माझा वाढदिवस म्हणून आणि मी विनंती केली म्हणून या भजनातल्या शेवटच्या " हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे" या ओळी दोनदा म्हणण्याऐवजी तीन वेळा म्हटल्या गेल्या होत्या…...
अशी धमाल मस्ती करत बालवर्गातून पहिलीत आलो आणि वर्गातल्या मुलांबरोबर मैत्री अधिकच घट्ट व्हायला लागली होती. पहीलीपासून दहावीपर्यंतचे वर्ग मधुकर राऊत मार्गावरच्या नवीन इमारतीत भरतात. या इमारतीला मोठी शाळा म्हणत आणि शिवतिर्थासमोरील इमारतीला छोटी शाळा म्हणत. ही मोठी शाळा घरापासून थोडी जवळ होती छोट्या शाळेपेक्षा. माझा वर्ग आणि माझ्या मोठ्या बहिणीचा वर्ग भरण्याची आणि सुटण्याची वेळ एकच असे मग आम्ही एकत्र चालत शाळेत जात येत असू. आमच्या बरोबरच आमच्याच इमारतीत रहाणारी माझी एक बालमैत्रीणही शाळेत जात येत असे. त्यामुळे आमच्या आईबरोबरच तिच्या आईचाही आम्हाला शाळेत नेण्या आणण्याचा त्रास वाचला होता.
पहीलीत असताना सतरंजीवर बसून समोरच्या बाकाचं झाकण उघडून त्याच्या आत दप्तर आणि डबा ठेवायची पद्धत होती. काही वर्गमित्र दप्तरात खाऊचा डबा आणि पाण्याची बाटली घेऊन येण्याऐवजी हातात धरायची छोटी कडी असलेल्या प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत (आज आपण ज्याला कॅरी बॅग म्हणतो तशी पिशवी नव्हे) डबा बाटली आणत असत. ते बघून मी आईकडे तशीच एक बास्केट मागितली आणि ती लगेच मिळाल्या मुळे मीही खुश झालो होतो. तर मधल्या सुट्टीत या बास्केट मधून डबा काढून खाण्याची मजा वाटत असे आणि डबा खाण्याचा वेगही थोडा वाढला होता. त्यामुळे पोळी भाजीची गुंडाळी बंद झाली होती. मित्र मैत्रीणींमध्ये डबा वाटून खाणं सुरू झालं होतं. एखाद्या मित्राला किंवा मैत्रीणीला एखादी भाजी आवडते म्हणून ती भाजी दुसऱ्या कोणी डब्यात आणायची असंही कधीकधी होत असे. डबा खाताना एकदा एका मित्राशी वाद झाला होता पोळी कोणती आणि चपाती कशाला म्हणायचं या वर! डबा खाऊन झाल्यावर खेळायला जाण्यात मात्र काहीही फरक पडला नव्हता. असंच एकदा मधल्या सुट्टीत मी आणि एक मित्र भिंतीवर रंगवलेल्या भारताच्या नकाशासमोर उभे होतो. त्याने "गया" या शहराच्या नावाकडे बोट केले आणि तो तिथून निघून गेला! बहुदा "मैं यहांसे गया!" असं सांगायचं होतं त्याला. तो मित्र तिथून गेला तो चार वर्षांपूर्वी भेटला एकदम!!
एकदा शाळा सुटताना माझ्या बुटाची नाडी सुटली होती आणि मला ती व्यवस्थित बांधता येत नव्हती. तेव्हा एका मित्राने ती बांधून दिली. त्याने नाडी इतकी विचित्र प्रकारे बांधली की घरी आल्यावर नाडी सोडवण्यात बराच वेळ आणि शक्ती खर्ची पडली होती!
दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास आणि त्यासाठीची खास वही हा दिवाळीतल्या फटाक्यांइतकाच आकर्षणाचा विषय असे. दिलेला अभ्यास करणे आणि त्या जोडीला ती वही छान छान नक्षी काढून आणि काही रंगीत चित्रे चिकटवून सजवणे हा प्रकारच अभ्यासापेक्षा जास्त आवडत होता. एकमेकांच्या वह्या आणि त्यांची सजावट पहाणे हा सुट्टीनंतर शाळा परत चालू झाल्यावरच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम ठरलेला असे.
शाळेची वार्षिक सहल (जी आम्ही वर्ग मित्र मैत्रीणी अजूनही आयोजित करतो) ही म्हणजे एक पर्वणीच असे. शाळेच्याच बसमधून ही सहल जात असे. दुसरीतली सहल गेटवे ऑफ इंडियाला गेली होती आणि माझं नशीब थोर म्हणून जाताना दादासाहेब रेग्यांच्या शेजारी बसायची संधी मिळाली होती! त्यांचा शेजारी बसण्याचा आनंद वर्णन करायाचा नसतो, फक्त अनुभवायचा असतो!! आमच्या पिढीचं नशीब महान म्हणूनच आम्हाला त्यांच्यासारखे मुख्याध्यापक मिळाले!!! ज्या बसमध्ये दादा असत त्यातली सगळी मुलं आणि मुली एकदम चिडीचुप. बाकीच्या बसमधल्या मुलांना बडबड करायला बऱ्यापैकी मोकळीक असे. गेटवेला पोहोचल्यावर समुद्राकडे बघून, "केवढा मोठा समुद्र. पाणीच पाणी. अबब किती हे पाणी!" हे दादांचे शब्द अजूनही कानात घुमतायत!! त्या सहलीत एका मित्राला प्रश्न पडला होता, "भाऊचा धक्का कुठे आहे?" गेटवेच्या जवळ जो दिपस्तंभ आहे समुद्रात त्याच्याकडे हात करून दिले ठोकून, " तो बघ भाऊचा धक्का." वास्तविक भाऊचा धक्का म्हणजे काय आणि तो गेटवेवरून दिसतो का नाही हे मला तेव्हा काहीही माहीत नव्हते!
उन्हाळी सुट्टीच्या आधी कैरीचं पन्हं आणि कलिंगडाची फोड, श्रावणी सोमवारी चणे फुटाणे विद्यार्थ्यांना देण्याच्या काही छान प्रथा आहेत शाळेच्या! शाळेच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक स्वत:च्या मुलांप्रमाणेच वागवत असत. आज या आठवणींनीही भरून येतं!
सन १९८०. दादर मुंबई
दुसरीतून तिसरीत जाताना काही कारणास्तव आम्ही मुंबई सोडून गेलो. तेव्हा हे सगळे मित्र मैत्रीणी परत कधी भेटतील का? कुठे भेटतील? नवी शाळा कशी असेल? तिथेही असेच मस्त मित्र मैत्रीणी मिळतील का? असे प्रश्न पडण्याचं आणि त्यांची उत्तरं शोधण्याचं ते वय नव्हतं. आई बाबांनी नेलं तिथे आम्ही गेलो!
चौथीत असताना एकदा दादरला एका लग्नाला आलो होतो. तेव्हा शाळेत गेलो असताना चौथीच्या वर्गाच्या दारात उभा राहीलो. एका मित्राने लगेच ओळखलं मला, "हा चेतन आपटे, दुसरीत होता वर्गात!" त्या तासाच्या ताईंनी वर्गात बोलवण्याआधीच मी तिथून धूम ठोकली होती.
मी पुण्यातल्या भावे हायस्कूलमधे शिकत मोठा होत होतो आणि हे बालमोहनचे बालमित्र मुंबईत मोठे होत होते. सातवीत का आठवीत असताना एकदा अचानक बालमोहनची एक बालमैत्रीण पुण्यात भेटली होती. काय बोललो तिच्याबरोबर हे आता एवढं आठवत नाही पण आनंद नक्कीच झाला होता!!
मी इंजिनिअर झालो, कारकिर्दीत स्थिरावलो, तसे हे सगळे बालमित्रमैत्रीणीही आपापल्या व्यावसायिक आयुष्यात स्थिरस्थावर झाले, कोणी परदेशी गेले. पण मी मुंबईत नसल्याने माझा संपर्क तुटल्यातच जमा होता यांच्याशी. पण काही नावं मला आठवत होती. एक मैत्रीण मधुकर राऊत मार्गावरच्या शाळेच्या इमारतीशेजारील दुसऱ्या एका इमारतीत रहात असे. आमचे पुण्यातील एक स्नेही आणि शेजारी त्यांच्या नोकरीनिमित्त दादरला मधुकर राऊत मार्गावरच अन्य एका इमारतीत रहात असत. त्यांना भेटायला गेलं असताना या मैत्रीणीची आठवण आली. ती मैत्रिण त्यावेळेसही तिथेच रहात असे हे काही तेव्हा माहीत नव्हतं. लहानपणी तिच्याकडे खेळायलाही गेलो होतो अनेकदा.
नोव्हेंबर २००७, पुणे.
असं सगळं सुरळीत चालू असताना मी नोकरीसाठी पुन्हा मुंबईत आलो. तेव्हाही काही कल्पना नव्हती की या बालमित्र मैत्रीणींबरोबर परत संपर्क साधला जाईल.
इंटरनेटवरील समाज माध्यमे भारतीय जनमानसात रुढ आणि प्रचलित होण्याचा तो काळ होता. त्यामुळे आपल्यापासून दूर असणाऱ्या आपल्या स्नेहीजनांशी या समाज माध्यमांतून संपर्क साधणे सोपे होत होते. याचाच फायदा घेत मी पुण्याच्या भावे हायस्कूलमधल्या आणि मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिरातल्या सवंगड्यांपैकी बहुतेकांना शोधून काढलं.
जुन २०१३, मुंबई
बहुतेकांची चाळीशी ओलांडली होती किंवा काही महीने बाकी होते. त्यावर्षी आम्हाला दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन २५ वर्षे झाली होती. समाज माध्यमांतून पुन्हा ओळख झालेल्या एका मैत्रीणीने (तीच, पुण्यात भेटलेली) मला दूरध्वनी करून सांगितलं की आपल्या दहावीच्या वर्गाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाबद्दल स्नेहसंमेलन आयोजित केलंय. त्याची जागा आणि वेळ तिने मला सांगितली आणि मी लगेच होकार भरला. ते स्नेहसंमेलन अविस्मरणीय होतं! प्रचंड मोठ्या कालावधीनंतर परत एकदा जुन्या सवंगड्यांबरोबर संपर्क साधला जात होता. परत एकदा नवे स्नेहबंध निर्माण होत होते. परदेशी असलेले, मुंबईबाहेर स्थायिक झालेले बरेच वर्गमित्र या कार्यक्रमासाठी खास मुंबईत आले होते.
बहुतेकांसाठी ती २५ वर्षानंतरची पहिली भेट होती पण माझ्यासाठी ती भेट ३३ वर्षांनंतरची होती. मला आश्चर्य वाटलं की एवढ्या काळानंतरही आमच्या आठवणी पुसट झाल्या नव्हत्या. पहिलीत असताना शाळेत वह्या नसत. रोजचा अभ्यास पाटीवर होत असे शाळेत. बहुतेकांच्या पाट्या काळ्या रंगाच्या होत्या पण माझी पाटी हिरवी असल्याची (जे माझ्याच लक्षात नव्हतं) आठवण याच स्नेहसंमेलनात अनेकांनी सांगितली. दुसरीतला भाऊच्या धक्क्याचा किस्सा मी सांगितल्यावर सगळ्यांना मजा वाटली!
हे समेंलन फक्त आमच्या वर्गाचे होते. पण लगेच महिनाभरात सन १९८८ मध्ये बालमोहनमधून दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व तुकड्यांचे एक मोठे समेंलन झाले, ज्यात अनेक शिक्षकही आले होते. तोही एक सुंदर अनुभव होता. सर्व शिक्षकांप्रति आदर व्यक्त करण्याची ती एक सुंदर संधी होती! काही जणांनी कला आणि अभिनय क्षेत्रातही नाव कमावलंय हेही तेव्हा समजलं.
एक मित्र त्याच्या लहानपणी पुण्यात भावे हायस्कूलला होता, तो मुंबईत बालमोहनला आला आणि त्याच वर्षी मी भावे हायस्कूलला प्रवेश घेतला. पण गमंत म्हणजे त्याच्याशी भेट तेव्हा न होता या समेंलनांमध्ये झाली. दुसऱ्या एका मित्राचा डहाणूला कुक्कुटपालन व्यवसाय आहे. या दोन समेंलनांनंतर त्याच्या कुक्कुटपालन केंद्राजवळच्या घरी सहल झाली दोन दिवसांची. तेव्हा त्याने त्याच्या व्यवसायाची आणि हे केंद्र कसं चालवलं जातं याची भरपूर माहीती दिली. ज्याला आपण एक्झॉटिक व्हेजिटेबल्स म्हणतो अशा भाज्या वितरणाचा एका मित्राचा व्यवसाय आहे. तो शाकाहारी मित्रांसाठी काही भाज्या घेऊन आला होता डहाणूला.
जुलै २०१४ मुंबई
रौप्यमहोत्सवी स्नेहसमेंलनाला काही खास नाव नव्हतं. पण एक वर्षानंतर झालेल्या समेंलनाचं जल्लोष असं बारसं झालं होतं. या जल्लोषच्या आयोजनात माझा खारीच्या वाट्यापेक्षाही छोटा वाटा होता! या जल्लोषचं स्वरूप जरा वेगळं होतं. बहुतेक मित्रांनी आपल्या कला सादर केल्या. गाण्याचे, समुह नृत्याचे आणि एकल नृत्याचे कार्यक्रम झाले. एकाने हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या नकलांचा कार्यक्रम केला. याच मित्राने पुण्याजवळ वडगांवला एक घर विकत घेतलं त्याच सुमारास. पुढच्या महिन्यात तिकडे दोन दिवसांची सहल झाली.
जुलै २०१६ वसई
जल्लोष हे सर्व तुकड्यांमधल्या मित्र मंडळींचं समेंलन होतं. त्या ऐवजी एका मित्राने पुढाकार घेऊन वसईला एके ठिकाणी एक सहल आयोजित केली. आपण ज्याला इव्हेंट मॅनेजमेन्ट म्हणतो तोच या मित्राचा व्यवसाय आहे! त्यामुळे सहलीचं ठिकाण आणि तिथली व्यवस्था उत्तमच असणार यात काही शंका नव्हती!
अशा खुप सहली आणि सणांच्या वेळच्या भेटीगाठींमधून ही बालमैत्री अधीकच घट्ट झाली आहे! शाळेत प्रवेश दसऱ्याला झाला म्हणून असेल कदाचित, पण दर वर्षी दसऱ्याच्या दिवशी शाळेत जाणे, दहावीच्या वर्गात जाऊन थोडा वेळ काढणे हा एक वार्षिक नित्यक्रम झाला आहे. शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी आहे! माझ्यासाठी हे चौथं वर्षं आहे. दिवाळीच्या आधीही एकत्र भेटण्याची प्रथा आहे. गेल्या वर्षी या दिवाळी भेटीगाठी मी आयोजित केल्या होत्या आणि त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला होता.
ही मैत्री आता खुप दृढ झाली आहे. किंबहुना या सगळ्यांबरोबर नुसती मैत्री न रहाता सगळे एकमेकांचे "मैत्र जीवाचे" झाले आहेत. एकमेकांच्या सुख दु:खाच्या प्रसंगी ही दृढता, ही मैत्रीची घट्ट विण प्रकर्षाने दिसून आली आहे. आणि मला खात्री आहे की ही मैत्री अशीच कायम राहील. आता मैत्री आहे म्हणजे मनमुटाव, रुसवे, अबोला किंवा लहानपणीच्या भाषेत सांगायचं तर कट्टी करणं हे ही आलंच ओघानं! तेव्हा, "कट्टी तर कट्टी, बारं बट्टी बारा महीने बोलू नकोस, लिंबाचा पाला तोडू नकोस!" असं जरी सांगितलं असलं तरी "एक वर्षानंतर परत न विसरता बोलायला ये!" हा संदेशही असे त्यात. पण सुदैवाने असा अबोला धरायची वेळ गेल्या चार वर्षात आली नाहीये. आणि या पुढेही अशी वेळ न येवो ही सदिच्छा व्यक्त करून हा लेखनाचा उद्योग आता पुरता थांबवतो!
दिवस दोनशेचारावा पान दोनशेचारावे!
२३/०७/२०१७
मुलुंड, मुंबई