सदुसष्ठ वर्षांपुर्वी आजच्या दिवशी भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आले. तेव्हा पासून माझ्या देशाने भरपूर प्रगती केली आहे हे काही वेगळे सांगायला नको आणि तो माझा आजचा विषय नाही.
आज दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर दिल्लीच्या राजपथावरील संचलनाची सुरुवात पाहून मग अन्य एका वाहिनीवर माझा आवडत्या "एल ओ सी कारगिल" या चित्रपटाची सुरुवात बघितली. हा चित्रपट मी कितीही वेळा पाहू शकतो!
असो.
संध्याकाळी महाराष्ट्र सेवासंघ मुलुंड पश्चिम येथे ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि अभिनेत्री सई परांजपे यांची, आणि ज्येष्ठ हिन्दी चित्रपट अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची मुलाखत होती. नाट्यकर्मी शफाअत खान यांनी घेतली होती मुलाखत.
नसिरुद्दीन यांनी "And Then One Day" हे आत्मचरित्र लिहिले आहे ज्याचा सई परांजपे यांनी मराठी अनुवाद केला आहे "आणि मग एक दिवस" या नावाने. ही पुस्तके तिथे विकायलाही होती. या मुलाखतीत त्या पुस्तकातले काही किस्से दोघांनीही सांगितले. अतिशय परखड वक्तव्यासाठी नसीरुद्दीन शहा प्रसिद्ध आहेतच. "शोले" चित्रपट कसा अन्य कुठल्या चित्रपटाची नक्कल आहे, त्या चित्रपटाबद्दल कशी जास्त हवा केली गेली हे त्यांनी या आत्मचरित्रात लिहिले आहे.
सई परांजपे यांनी भाषांतर केले नाही तर हे पुस्तक मराठीत येणार नाही असा नसिरुद्दीन यांचा आग्रह होता. 'कथा', 'स्पर्श' अशा काही कालातीत चित्रपटांमध्ये या दोन दिग्गजांनी एकत्र काम केले आहे हे मी वेगळे सांगायला नकोच! आणि कदाचित यामुळेच नसिरुद्दीन यांचा असा आग्रह असावा की सई परांजपे यांनीच या पुस्तकाचे मराठी भाषांतर करावे.
कोणाही अभिनेत्याची नाव न घेता नसिरुद्दीन म्हणाले की अभिनेत्याने त्याचा अभिनय किती महान आहे ते सांगायला वजन वाढवणे, कमी करणे, टक्कल करणे असे करायची गरज नसते. पटकथेला पूर्ण न्याय देणे आणि दिग्दर्शकाला काय अपेक्षित आहे ते पडद्यावर साकारणे हे महत्वाचे असते. हे त्यांचे विधान कोणाबद्दल आहे हे जाणकारांनी ओळखले असेलच!
आत्मचरित्राच्या नावावरून असे वाटते की नसिरुद्दीन यांच्या आयुष्याला एखादा दिवस असा आला असावा ज्यामुळे ते जे काही आज आहेत ते आहेत. त्यांनी ते तसे बोलूनही दाखवले आजच्या मुलाखतीत.
अशा दिग्गजांना ऐकणे हाच एक वेगळा अनुभव आहे. जेव्हा मला कळले या कार्यक्रमाबद्दल तेव्हाच ठरवले होते जाण्याचे. महाराष्ट्र सेवासंघात असे कार्यक्रम नेहमीच होत असतात आणि अशा कार्यक्रमांची माहिती भ्रमणध्वनी संदेशाद्वारे रसिकांना देण्याची संघाची व्यवस्था आहे, थोडे शुल्क आकारून. ती सेवा घ्यावी असा विचार करत आहे.
तर आजचा आठवड्याच्या मध्येच आलेला सुट्टीचा दिवस बऱ्यापैकी कारणी लागला असे वाटते.
दिवस सव्वीसावा पान सव्वीसावे.
No comments:
Post a Comment