Friday 11 January 2019

"हाऊ इज द जोश?" "हाय सर!"


गेली अनेक दशके भारतीय हिंदी चित्रपटांमधले व्हिलन हे डाकू तरी असायचे किंवा कोणी तरी वाममार्गाने कमावलेल्या पैशाच्या जोरावर ताकदवान झालेली काल्पनिक व्यक्ती. पण गेल्या १५ २० वर्षांतल्या चित्रपटांकडे पाहिले तर आपले शेजारी देश आणि त्यातील काही दुष्ट प्रवृत्तीची माणसे ही मुख्य व्हिलनच्या स्वरूपात दिसायला लागली होती. तरीही या चित्रपटांची कथानके काल्पनिकच असायची. मी कोणत्या चित्रपटांबद्दल लिहीत आहे आहे चतुर वाचकांच्या लक्षात आले असेलच! शेजारी देशांबरोबर झालेल्या प्रत्यक्ष युद्धावरचे, भारतात झालेल्या दहशदवादी हल्ल्यांवरचे किंवा विमान अपहरणाचे कथानक असलेले आणि इतर बराच मसाला भरलेले भरपूर चित्रपट आले आणि गाजलेही. परंतु नजीकच्या भूतकाळातील लक्षात राहिलेला दुर्दैवी हल्ला होता उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर १८/०९/२०१६ रोजी झालेला हल्ला. भारतीय लष्कराच्याच गणवेषात आलेल्या फक्त चार सशस्त्र हल्लेखोरांनी १९ भारतीय सैनिकांना ठार केले होते आणि त्यामुळे संपूर्ण देशाची भावना एकाच होती, प्रतिशोध! या सत्य घटनांवर आधारित आहे दिनांक ११/०१/२०१९ रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट उरी: द सर्जिकल स्ट्राईक. 

हा चित्रपट ज्या घटनांवर बेतलेला आहे, त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या संबंधित घटना व घडामोडी सर्व भारतीयांना माहीत आहेत असे गृहीत धरून या चित्रपटाची कथा सांगण्यात आपणा वाचकांचा वेळ वाया न घालवता या चित्रपटाच्या सादरीकरणाबद्दल जास्त लिहीन म्हणतो. कारण आपण सर्व सुजाण वाचक उरी: द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन पहालाच!

चित्रपट सुरू होतो तो ०४/०६/२०१५ रोजी मणिपूर राज्यातील चांदेल जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशदवादी हल्ल्याच्या घटनेने. बहुदा सर्वच युद्धपटांमध्ये, प्रवासात असताना सैनिक नेहमी आनंदात वीररसपूर्ण गाणी म्हणत जाताना दाखवले आहेत तसे या प्रसंगातही दाखवले आहे. त्या ताफ्यातल्या सगळ्यात पुढच्या बसचे टायर पंक्चर होते म्हणून चालक खाली उतरतो तेव्हा एखादा काटाकुटा घुसून टायर पंक्चर झाले नसावे, काहीतरी घातपात असावा हे त्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच प्रेक्षकांना कळते कारण त्या अभिनेत्यावर रोखलेला कॅमेरा बसच्या पुढच्या चाकाकडे रोखला जातो आणि प्रेक्षकांना रस्त्यात मुद्दाम टाकलेले खिळे दिसतात! हे हल्लेखोर आपल्या पूर्वेकडील शेजारी देशामधून भारतात आल्याचे नंतर भारतीय लष्कराला कळले होते आणि भारताने "दुसऱ्या देशात जाऊन केलेली पहिली दहशदवाद विरोधी कारवाई" जी संपूर्ण भारताने नंतर बातम्यांमधून पाहिली आणि वाचली तीसुद्धा या चित्रपटात खूपच प्रभावीपणे दाखवलेली आहे. काही मोजक्या सैनिकांची एक तुकडी घेऊन मेजर विहान शेरगील (चित्रपटातील नाव) दहशदवाद्यांच्या या तळावर हल्ला करून सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालून, त्यांची सर्व शस्त्रे आणि सामुग्री नष्ट करून, आणि विशेष म्हणजे एकही सैनिक न गमावता परत येतो आणि चांदेल हल्ल्याचा प्रतिशोध पूर्ण करतो असे दाखवले आहे.

या प्रतिशोधाचे यश साजरे करण्यासाठी आयोजित केलेल्या समारंभात मेजर विहान शेरगील, सर्व सैनिक, अधिकारी आणि आणि लष्कर प्रमुख उपस्थित असतात. राष्ट्रीय सुरक्षा सलागारांबरोबर (रा सु स) माननीय पंतप्रधान या समारंभात जात आहेत हे दृष्य या दोन कलाकारांच्या मागे मागे कॅमेरा ठेवून चित्रित केले आहे. उजवीकडे रा. सु. स. च्या भूमिकेत अभिनेते परेश रावळ आणि डावीकडे माननीय पंतप्रधान चालत आहेत आणि ते माननीय पंतप्रधानांना या यशस्वी मोहिमेबद्दल माहिती देत आहेत असे हे दृष्य  आहे. या दृष्यात प्रेक्षकांना पंतप्रधानांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे पांढरे केस आणि दाढी दिसते, बाकीचा चेहरा नाही. म्हणून प्रेक्षकांना वाटते की माननीय पंतप्रधानांचा चेहरा दाखवणार नाहीत, जो या पूर्वीच्या काही अशा विषयांवरच्या चित्रपटांनी पाडलेला प्रघात होता. पण तसे न रहाता, रा. सु. स. आणि माननीय पंतप्रधान समारंभाच्या कक्षात आल्यावर बॉडी हार्नेसवर बांधलेला कॅमेरा या दोघांच्या समोर येतो आणि रजित कपूर हा अभिनेता माननीय पंतप्रधानांच्या भूमिकेत समोर येतो आणि हा प्रेक्षकांसाठी एक चांगला सुखद धक्का ठरतो! तरीही ते पंतप्रधान आहेत हा उल्लेख कुठेही केला नाहीये. त्यांना संबोधताना अन्य पात्रे, "सर" असेच म्हणताना दाखवले आहे. प्रेक्षकांनी समजून घ्यायचे की ते माननीय पंतप्रधान आहेत! या समारंभात अभिनेता योगेश सोमण हे तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या भूमिकेत दिसतात. गृह मंत्र्यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव कळू शकले नाही पण तो अभिनेता बराचसा सध्याच्या गृह मंत्र्यांसारखा दिसतो. किंबहुना तसे दिसणे हाच निकष असावा त्या अभिनेत्याचा निवडीचा असे वाटते. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावी लागेल. विक्रम गायकवाड यांनी सर्व अभिनेत्यांची रंगभूषा इतकी उत्तम केली आहे की तो कलाकार म्हणजे प्रत्यक्ष ती व्यक्तीच वाटावी!

सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट असला तरी सर्व त्या घटनांमधील सर्व व्यक्तींची नावे तशीच न ठेवता पात्रांना वेगळी नावे देणे हे बरेचदा गरजेचे ठरते आणि त्या अनुषंगाने मूळ घटनाक्रमात नसलेले काही प्रसंग चित्रपटाच्या कथानकात पेरावे लागतात. मेजर विहानच्या अल्झायमर झालेल्या आईची भूमिका स्वरूप संपत यांनी उत्तम वठवली आहे. तर वर उल्लेख केलेल्या या समारंभात, "आई मला पूर्णपणे विसरण्याआधी मी काही दिवस दिल्लीत तिच्या सोबत राहू इच्छितो." हे कारण सांगून मेजर विहान मुदतपूर्व निवृत्तीची मागणी करतो. त्यावर माननीय पंतप्रधान त्याची बदली दिल्लीतील मुख्यालयात करण्याची आणि आईसाठी एक पूर्णवेळ परिचारिका घरात ठेवण्याची सूचना करतात. अशाप्रकारे मेजर विहान कार्यरतही रहातो आणि दिल्लीत त्याच्या आईजवळही राहतो. तिथे असताना त्याच मुख्यालयात कार्यरत असलेल्या वायुदलातील एका महिला हेलिकॉप्टर पायलट सिरत हिच्याबरोबर त्याचा संपर्क येतो आणि प्रेक्षकांना वाटते की या दोघांमध्ये प्रेम संबध जुळले जाताना दाखवणार आहेत का? पण अशा वेगवान कथानकाच्या चित्रपटांमध्ये या गोष्टींना वेळ कुठे असतो? त्या पायलटवर एका बचाव मोहिमेत दिरंगाई दाखवल्याबद्दल "चौकशी" चालू असते म्हणून तिला कदाचित निलंबित न करता ती चौकशी पूर्ण होईपर्यंत दिल्लीतील मुख्यालयात कार्यरत ठेवलेले दाखवले आहे. आणि मेजर विहानच्या आईसाठी नियुक्त केलेली परिचारिका ही प्रत्यक्षात परिचारिका नसून एक कर्तबगार रॉ एजंट आहे हे रहस्य प्रेक्षाकांपासून फार काळ लपून राहात नाही. ज्या प्रसंगातून हे रहस्य उघड केले आहे तो प्रसंग सर्वच कलाकारांनी उत्तम वठवला आहे. यामी गौतम या गुणी अभिनेत्रीने पल्लवी शर्मा या रॉ एजंटची भूमिका व्यवस्थित निभावली आहे. 

काल्पनिक प्रसंगांचा आणि पात्रांचा उल्लेख आलाच आहे तर हेसुद्धा नमूद करावे लागेल की मोहित रैना या अभिनेत्याने साकारलेला कॅप्टन करण कश्यप हा मेजर विहानचा मेहुणा दाखवला आहे. सुट्टीनंतर परत कामावर रुजू झाल्यावर कॅप्टन करण त्याच्या पत्नीबरोबर म्हणजे मेजर विहानच्या बहिणीबरोबर व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून संपर्कात रहाताना दाखवले आहे, जेव्हा तो परत एकदा बाबा होणार आहे हे त्याला कळलेले दाखवले आहे. असे प्रसंग युद्धपटांमध्ये का घालतात हे मला अद्याप कळले नाहीये!
 
चित्रपाटाचे कथानक पुढे सरकताना, हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळावर ०२/०१/२०१६ रोजी झालेल्या हल्ल्याचे वार्तांकन वृत्तवाहिन्यांवर जसे दाखवले गेले होते तसे चित्रपटात दाखवले आहे. हा हल्ला चालू असताना सुरक्षा समितीच्या बैठकीत रा. सु. स., हे माननीय पंतप्रधान, आणि सुरक्षा समितीच्या अन्य सभासदांना सर्व माहिती पुरवतात आणि सशस्त्र दलांना कारवाईचे आदेश देतात असे दाखवले आहे. इथे एका विशेष तपशीलाकडे लक्ष दिले आहे आणि ते मला फार आवडले. मोबाईल फोनवर सुरक्षा विषयक कोणतीही माहिती अथवा बातमी आली, किंवा सशस्त्र दलांना मोबाईल फोनवरून सूचना देऊन झाली की रा. सु. स. तो मोबाईल हॅन्डसेट नष्ट करतात असे दाखवले आहे. काही वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेले फ्लिप फोन यासाठी वापरले आहेत. आजच्या सारखे स्मार्ट फोन्स नाहीत. आणि तो हॅण्डसेट नष्ट करताना सामान्य परिस्थितीत जशी त्याची घडी घातली जाते त्याच्या विरुद्ध दिशेने वळवून तो हॅण्डसेट तोडलेला दाखवला आहे. मग रा. सु. स. यांचा स्वीय सचिव त्यांना दुसरा हॅण्डसेट देतो असेही दाखवले आहे. असे किती हॅण्डसेट खर्ची घातलेत हे मोजायला हवे होते!

मग येतो चित्रपटाचा मुख्य प्रसंग, उरी येथील तळावर झालेला दहशवादी हल्ला. याही प्रसंगात सर्व बंदुका, रॉकेट लाऊंचर्स आणि त्यांनी केलेले स्फोट हे खोटे वाटत नाहीत. प्रेक्षागृहातली सराउंड साउंड सिस्टिम प्रेक्षकांना ऑन द एज ऑफ द सीट ठेवते. या हल्ल्याची दृष्ये खूपच परिणामकारक आहेत. बराकींमध्ये असलेले नि:शस्त्र सैनिक दहशतवाद्यांच्या गोळीबाराला बळी पडताना पाहून प्रेक्षक व्यथित झाले नाहीत तरच नवल. सैनिकांच्या  हल्ल्याला उत्तर देणाऱ्या जवानांचा एकमेकांमधला ताळमेळ फार उत्तम प्रकारे दर्शवला आहे. आणि तो इथे वाचण्यापेक्षा मोठ्या पडद्यावरच पाहावा! या हल्ल्यात कॅप्टन करण हुतात्मा होतो असे दाखवले आहे.

आता सुरू होते ती प्रतिशोधाची तयारी. पुन्हा एक सुरक्षा समितीची बैठक, पुन्हा थोडी चर्चा आणि मग ठरते प्रतिशोधाची पद्धत - सर्जिकल स्ट्राईक! रा. सु. स.च्या भूमिकेत परेश रावल यांनी जीव ओतलाय असे म्हणणे वावगे ठरू नये. "ये नया हिंदोस्ता है, ये अंदर घुसेगाभी और मारेगा भी!" असं म्हणताना आपले सैनिक गमावल्याचे दु:ख आणि एलिट फोर्सचे हे सैनिक हा प्रतीशोध यशस्वी करतीलच हा सार्थ आत्मविश्वास परेश रावल यांनी उत्तम प्रकारे दर्शवला आहे. सर्जन म्हणजे शल्यविशारद, एक असा डॉक्टर जो रुग्णाच्या शरीरात त्याच्या हत्यारांनिशी योग्य ठिकाणी पोहोचतो, दुखापत झालेल्या किंवा रोगी अवयवावर योग्य ते उपचार करतो, रोग पसरू नये याचे खबरदारी घेऊन शस्त्रक्रिया झालेला शरीराचा भाग पूर्ण बंद करून रुग्ण संपूर्ण बरा होईल याची खबरदारी घेतो. यात एखादी छोटीशी चूक रुग्णाच्या तब्येतीच्या दृष्टीने महाग पडू शकते. म्हणूनच अशा सर्जिकल प्रिसिजनने केलेल्या हल्ल्याला सर्जिकल स्ट्राईक हे किती सार्थ नाव आहे ना?

ज्या दोन रेजिमेंट्सचे सैनिक उरी येथील हल्ल्यात बळी पडले होते त्याच डोगरा आणि बिहार रेजिमेंट्सच्याच सैनिकांना या सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार केलेले दाखवले आहे. प्रत्यक्षात तसेच घडले होते का हा सिनेमॅटिक लिबर्टीचा भाग आहे हा संशोधनाचा विषय आहे. २० सैनिकांची एक अशा ४ तुकड्या करून त्यांना अल्फा, ब्राव्हो, चार्ली आणि डेल्टा अशी नावे दिली जातात. पैकी ब्राव्हो, चार्ली आणि डेल्टा या तीन तुकड्या तीन वेगवेगळ्या हेलिकॉप्टर्समधून पुढे जातात आणि अल्फा टीम थोड्या विलंबाने निघते. या हेलिकॉप्टरची पायलट असते तीच मुख्यालयात ओळख झालेली कॅप्टन सिरत! अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिने ही छोटीशी भूमिका छान सादर केली आहे. आता या मुख्य सर्जिकल स्ट्राईक्सची दृष्ये चित्रित करणे हे लेखक दिग्दर्शक आदित्य धर यांच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून होते आणि त्यात कुठेही कमतरता दिसली नाहीये. हे सर्व ८० सैनिक साकारणारे कलाकार हे खरोखरचे सैनिकच वाटतात!

या सर्जिकल स्ट्राईकची योजना ठरताना मेजर विहान शेरगील हा दिल्लीतील मुख्यालयात रुजू असतो. त्याला एवढेच कळते की उरी हल्ल्याच्या प्रतिशोधाची तयारी केली जात आहे. तो लगेच लष्कर प्रमुखांकडे जाऊन त्याला या मोहिमेत समाविष्ट करण्याची विनंती करतो आणि सर्व सैनिकांना जिवंत परत आणायचे आश्वासन लष्कर प्रमुखांना देतो. मोहिमेच्या आधीच्या शेवटच्या बैठकीत माननीय पंतप्रधान या वचनाचा उल्लेख करतात तेव्हा मेजर विहान त्यांना म्हणतो, "विथ युअर परमिशन सर, आय अँड माय टीम वूड लाईक टू हॅव डिनर विथ यु आफ्टर वी  कम बॅक!" आणि असं म्हणतानाचा विकी कौशल या कलाकाराचा कायिक आणि वाचिक अभिनय फारच छान झाला आहे. चित्रपट संपतो तो या डिनर पार्टीच्याच प्रसंगाने! चित्रपटात इतर अनेक तपशील दाखवले आहेत, कधी विस्ताराने तर कधी सूचकपणे, पण ते सगळे इथे लिहीत बसलो तर या लेखाचा विस्तार अजून वाढेल. शिवाय ते सांगून वाचकांचा रसभंग नको व्हायला! कारण ते सारे तपशील आणि दोन भन्नाट सरप्राईज एलिमेंट्स  हे सारे चित्रपटगृहातच जाऊन पहावेत असेच आहेत.


संपूर्ण चित्रपटाचेच चित्रिकरण उत्तम आहे. चित्रपटात वापरलेली सर्व शस्त्रे खरी असावीत अशीच वाटतात. त्यांच्या वापराने होणारे स्फोट आणि त्या स्फोटाने होणारे नुकसान हे अन्य चित्रपटांमधल्या अशाप्रकारच्या गोळीबाराच्या किंवा युद्धप्रसंगांपेक्षा अनेक पटींनी प्रभावीपणे चित्रित केले आहेत. आजकाल सर्व चित्रपटगृहांमध्ये सराउंड साउंड सिस्टीम असतेच. गोळीबाराचे आणि स्फोटांचे या सिस्टीममार्फत ऐकू येणारे आवाज या प्रसंगांची परिणामकारकता कैक पटींनी वाढवतात. जिथे हा सर्जिकल स्ट्राईक करायचाय त्या भागाच्या उपग्रह प्रतिमा संरक्षण विभागाकडे थेट प्रक्षेपित होण्याची व्यवस्था कशी केली गेली, वॉर रूममधल्या सर्व तांत्रिक गोष्टी, संगणकावर दिसणाऱ्या उपग्रह प्रतिमा मोठ्या पडद्यांवर दिसणे या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आतापर्यंतच्या भारतीय युद्धपटांमध्ये फार क्वचित दिसल्या होत्या त्या इथे दिसतात, आणि या चित्रपटाची निर्मिती मूल्ये किती उच्च आहेत याची साक्ष देतात. तसेच त्या प्रतिमांचा उपयोग करून दहशतवाद्यांची लाँच पॅड्स कशी ओळखली आणि त्या जागांचे कोऑर्डिनेट्स त्या चारही टीम्सकडे कसे पोहोचवले, मगाशी उल्लेख केलेले सरप्राईज एलिमेंट्स  काय आहेत आणि त्याचा कसा उपयोग केला आहे हे बघणे हा एक उत्कृष्ठ अनुभव आहे. एकंदरीत या चित्रपटाचा प्रभाव चित्रपटगृहातून बाहेर आल्यावर बराच वेळ राहातो. आधुनिक काळातला हा सर्वोत्कृष्ठ युद्धपट ठरेल. हो युद्धपटच, कारण असे दहशवादी हल्ले हे प्रॉक्सी वॉरच असतात!

मोहिमेवर जाताना आणि मोहीम यशस्वी करून परत आल्यावर मेजर विहान आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी नेहमी म्हणत असतो, "हाऊ इज द जोश?" ज्यावर सारे सैनिक, "हाय सर!" असे म्हणजे 'आमचा जोश, उत्साह हा उच्च आहे' असे उत्तर देत असतात! म्हणूनच हा चित्रपट पाहून भारतीय सैन्यात आणि जनमानसात निर्माण झालेला जोश तसाच कायम राहावा आणि ज्या कारणासाठी हा सर्जिकल स्ट्राईक करावा लागला, तशी कारणेच पुन्हा उद्भवू नयेत ही इच्छा व्यक्त करून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो. जय हिंद!

दिवस अकरावा पान अकरावे
११/०१/२०१८
मुलुंड मुंबई
 
ता. क.:

अचानक या चित्रपटाचे केलेले रसग्रहण वाचल्यावर अनेकांनी टिपण्णी केली होती की प्रमुख कलाकारांची नावे आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका, दिग्दर्शक यांची यादी लिहावी. ती पुढील प्रमाणे:

मेजर विहान शेरगील: विकी कौशल
कॅप्टन कारण कश्यप: मोहित रैना (पदार्पण)
वायुदलातील कॅप्टन सिरत: कीर्ती कुल्हारी
रॉ एजंट पल्लवी शर्मा: यामी गौतम
पंतप्रधान: रजित कपूर
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार: परेश रावळ
संरक्षण मंत्री: योगेश सोमण
मेजर विहानची आई: स्वरूप संपत

लेखक आणि दिग्दर्शक: आदित्य धर
निर्माते: रॉनी स्क्रूवाला
निर्मिती संस्था: आर एस व्ही पी
संगीत: शैशव सचदेव
चित्रीकरण प्रमुख: मितेश मिरचंदानी
संकलन: शिवकुमार पाणीककर
रंगभूषा: विक्रम गायकवाड

चुकीची दुरूस्ती: आज दिनांक २५/०१/२०१९ रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट पहाताना 'करण कश्यप'चा लष्करातला दर्जा कॅप्टन नसून मेजर आहे हे लक्षात आले. मुळ लेखात बदल न करता तळटिप म्हणून ही दुरुस्ती केली आहे. चुकी बद्दल क्षमस्व!


















5 comments: